मुंबईहून भुसावळकडे जाणाऱ्या पवन एक्स्प्रेसमध्ये एका बिहारी तरूणाची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांना पकडण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चाळीसगांव येथून दोघांना अटक केली. त्यांना मनमाड शहर न्यायालयाने ११ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुख्य संशयिताला पुणे रेल्वे स्थानकात ताब्यात घेण्यात आले.
पवन एक्स्प्रेसमधील घटनेप्रकरणी यांना पोलिसांनी चाळीसगाव मधून अटक केली. त्यांना आज मंगळवारी मनमाड शहर न्यायालयापुढे हजर केले असता ११ मे पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली. यातील मुख्य संशयित आरोपीला पुणे रेल्वे स्थानकात अटक केली. २९ एप्रिल रोजी महेशकुमार साफी आणि सुनीलकुमार साफी हे दोघेही (मुळचे बिहार येथील परंतु मुक्काम नाशिक) पवन एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यातून विहारकडे जाण्यासाठी नाशिकरोडहून निघाले होते. मनमाडच्या पुढे तीन जणांनी चाकूचा धाक दाखवत डब्यात लूटमार सुरू केली. महेश व सुनील यांच्याकडील ४५०० रुपयांची रोकड त्यांनी हिसकावून घेतली. प्रतिकार करणाऱ्या सुनीलकुमारच्या छातीवर चाकूने वार केले. नांदगाव रेल्वे स्थानकाजवळ हल्लेखोर गाडीतून उडय़ा मारत पसार झाले. गंभीर जखमी सुनीलकुमारचा या हल्ल्यात मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्वरीत तपास सुरू केला. तपासात पोलिसांना संजय पवार (२६), सचिन पाटील (२३, दोघे रा. चाळीसगाव) यांची माहिती मिळाली. पोलिसांनी चाळीसगाव येथे दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून या घटनेतील मुख्य संशयिताची माहिती व नाव पोलिसांना मिळाले. मुख्य संशयित पोलिसांना गुंगारा देत उस्मानाबाद येथे पळाला. तेथून पुणे येथे तो आला असता पुणे रेल्वे स्थानकात पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक देसले, के. एस. जांभळे, सहाय्यक निरीक्षक सुरसे व लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. पवन एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडण्यापूर्वी तिघेही संशयित नांदगाव येथे एकत्र आले होते. दरम्यान, संशयित ताब्यात आल्याने इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता लोहमार्ग पोलीस निरीक्षक के. एस. जांभळे यांनी व्यक्त केली.