शहरात अलीकडे वाढलेल्या गुन्ह्यांच्या पाश्र्वभूमीवर काही राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने पोलिसांविरोधात आंदोलन करण्यात येत असताना शहर युवक काँग्रेसने पोलिसांना पाटबळ देण्याची भूमिका घेतली असून पोलिसांचे मनोधैर्य कमी करणाऱ्यांच्या विरोधात आपण असून पोलिसांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
  शहर युवक काँग्रेसच्या वतीने यासंदर्भात आयुक्त कुलवंत कुमार सरंगल यांची भेट घेण्यात येऊन भूमिका मांडण्यात आली. अलीकडे शहरात घरफोडय़ा, दरोडा, लुटमार, हाणामाऱ्या, खून अशा विविध स्वरुपाच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली आहे. आयुक्तांनी तीन वर्षांत गुन्हेगारी कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे नाशिकमधील गुन्हेगारी पूर्वीपेक्षा निम्याहूनही कमी झाली आहे. परंतु गुन्हेगारी वाढत असल्याने महिनाभरात काही पक्ष, संघटना यांनी आंदोलन करून पोलिसांचा निषेध नोंदविला आहे. त्यामुळे पोलिसांचे मानसिक मनोधैर्य कमी होत असून त्याविरोधात आपण असल्याचे नाशिक शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी मानसिक स्वास्थ्य बिघडू न देता गुन्हेगारांवर वचक बसविण्याचे काम कठोरपणे सुरूच ठेवण्याचे निवेदन शहर युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळातर्फे उपाध्यक्ष तुषार जगताप यांनी आयुक्तांना दिले.
पोलिसांनी नाशिककरांशी संवाद साधण्याची गरज आहे. त्यामुळे स्वच्छ प्रतिमेचे लोक पोलिसांच्या मदतीसाठी नक्कीच पुढे येतील, असा आशावादही व्यक्त करण्यात आला आहे. या लोकांना पोलिासांचे मोबाईल नंबर द्यावेत, शहरात युवकांचे छोटे छोटे गट तयार करून ‘पोलीस मित्र’ म्हणून त्यांची ओळख निर्माण करावी. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढेल. त्याचा परिणाम शहरातील गुन्हेगारी कमी होण्यात होईल. केवळ उत्सव काळातच आयोजित होणारी शांतता समितीची बैठक, मोहल्ला बैठक महिन्यातून दोन वेळा आयोजित केल्यास पोलिसांना त्याचा नक्कीच फायदा होईल, असे निवेदनात म्हटले आहे. तुषार जगतापसह विरेंद्र भुसारे, गणेश राजपूत, योगेश कापसे, जगदीश बोडके आदी उपस्थित होते.