आबेल पुरस्कार हा दरवर्षी निव्वळ गणिती सिद्धांत मांडणाऱ्यांना दिला जातो, पण या वेळी तो सिद्धांत व उपयोजन असा दोन्हींचा संगम असलेल्या गणिती संशोधनासाठी फ्रान्सचे गणितज्ञ यीव्ह्ज मेयर यांना जाहीर झाला आहे. मेयर यांचे काम ‘वेव्हलेट सिद्धांता’बाबत असून त्याचा उपयोग कमी जागेत माहिती बसवणे, वैद्यकीय प्रतिमाचित्रण व गुरुत्वीय लहरी शोधणे यात होत आहे.

गणितातील नोबेल म्हणून ओळखला जाणारा हा पुरस्कार नॉर्वेजियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड लेटर्स या संस्थेच्या वतीने दिला जातो. पुरस्काराची रक्कम सहा लाख पौंड आहे. गेल्या वर्षी ब्रिटनचे अ‍ॅण्ड्रय़ू वाइल्स यांना फेरमॅट सिद्धांतासाठी हा पुरस्कार मिळाला होता. मेयर हे फ्रान्समधील सॅकले येथील एका संस्थेत मानद प्राध्यापक. गुंतागुंतीचे गणिती कूटप्रश्न सोडवण्यासाठी लागणारी ऊर्जा त्यांच्यात अफाट आहे. त्यांनी हार्मोनिक अ‍ॅनॅलिसिसमध्ये गुंतागुंतीचे घटक तरंगीय स्वरूपात विभाजित केले, त्यामुळे त्यांचे काम सोपे झाले. अवघड तरंगलहरींचे सोप्या पद्धतीने विभाजन करण्याचे तंत्र त्यांनी शोधले, त्यातूनच त्यांनी नंतर वेव्हलेट सिद्धांताकडे मोर्चा वळवला. वेव्हलेट सिद्धांतामुळे गुंतागुंतीचे संदेश गणितीय कणरूपात लघुरूपामध्ये मांडले जातात. त्या गणिती कणांना वेव्हलेट असे म्हणतात. यातून त्यांनी संगणक व माहिती तंत्रज्ञानात मोठी भर टाकली आहे. ध्वनी, प्रतिमा, दृश्यफीत यांचे आपण लघुकरण करून साठवण करतो, त्यात वेव्हलेट्सचा उपयोग होतो. शिवाय अर्धद्रवपदार्थाच्या वहनातील गणिती समस्या सोडवल्या आहेत.

त्यांचा जन्म १९३९ मध्ये झाला, ते फ्रेंच ज्यू आहेत. त्यांचे बालपण उत्तर आफ्रिकी किनारी भागात (तेव्हा शांत, रम्य असलेल्या!) टय़ुनिस शहरात गेले. १९५७ मध्ये ते पॅरिसमधील इकोल नास्योनाल संस्थेच्या प्रवेश परीक्षेत पहिले आले. तुम्हाला जर तुमचे आयुष्य ज्ञानास समर्पित करायचे असेल तरच या संस्थेत येणे श्रेयस्कर, असे ते सांगतात. पदवीधर झाल्यानंतर ते लष्कराच्या शाळेत शिक्षक होते, पण त्यात त्यांचे मन रमेना. १९६६ मध्ये ते सहायक शिक्षक म्हणून रुजू झाले, पण त्याच वर्षी त्यांनी जीन पिअर कहान यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. केली. नंतर ते सूद पॅरिस विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक झाले. डॉफिन व काचॅन येथील विद्यापीठांत गणित केंद्रात काम केले. हार्मोनिक अ‍ॅनॅलिसिसकडे ते वळले १९७० मध्ये.

इकोल पॉलिटेक्निकमधील कार्यक्रमात मेयर यांना या वेव्हलेट सिद्धांताबाबतचा संशोधन निबंध ग्रॉसमन व मोरलेट यांनी दिला. नंतर ते इनग्रिड डॉबिशिस, अ‍ॅलेक्स ग्रॉसमन व जीन मॉरलेट यांना मार्सेली येथे जाऊन भेटले तेव्हापासून त्यांच्या जीवनात गणितातील कल्पनारम्य कथेचा अध्याय सुरू झाला तो कायमचाच. १९८० नंतर त्यांनी डॉबिशिस व कोफमन यांच्याबरोबर काम करून वेव्हलेट्सचे एकात्म चित्र मांडले. अल्बटरे काल्डेरॉन, पिअर गिलिस, लेमारी रिसेट यांच्या मदतीने त्यांनी वेव्हलेट्सचा सिद्धांत आणखी पुढे नेला.

जेव्हा तुम्हाला एखाद्या क्षेत्रात तज्ज्ञ झालो, असे वाटते तेव्हा तुम्ही ते क्षेत्र सोडलेले बरे, असा त्यांचा सल्ला सर्वानाच अनुकरणीय. त्यांनी गणितज्ञांची एक पिढी घडवली. त्यांचे सहकारी स्टीफन मॅलट हे तर त्यांना द्रष्टे गणितज्ञ मानतात. गणितात कुठलेही संशोधन करताना आधी तुम्ही ज्ञानाचा प्रचंड खजिना आहे, पण तो आपल्याला सापडलेला नाही हे आधी मान्य करायला हवे, असे मेयर सांगतात, तोच त्यांच्या यशाचा मूलमंत्र आहे.