पुलंच्या ‘ती फुलराणी’तील ‘फुलराणी’ काळानुरूप बदलत गेली. भक्ती बर्वे, प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष अशा चौघींनी ‘फुलराणी’ उभी केली. अनिल क्षीरसागर यांनी या चौघींसोबत सहनायक ‘प्रोफेसर विसुभाऊ’ साकारला. योगायोग असा की, नाटकात शुद्ध वाणी असलेला आणि प्रसंगी अशुद्धतेलाही समजून घेऊ शकणारा ‘विसुभाऊ’ साकारणाऱ्या अनिल क्षीरसागर यांना प्रत्यक्ष जीवनातही वाणीचा वरदहस्तच लाभला होता. अखेरच्या श्वासापर्यंत हा वरदहस्त कायम होता.

मधुकर तोरडमल, सदाशिव अमरापूरकर या दिग्गजांपाठोपाठ अनिल क्षीरसागर यांनी व्यावसायिक मराठी रंगभूमीवर नगरचा ठसा उमटवला. रंगभूमीवर विशेषत: नगरच्या नाटय़ व सांस्कृतिक चळवळीत ‘बालीकाका’ या नावाने क्षीरसागर परिचित होते. शालेय वयातच नाटकांमध्ये छोटी-मोठी कामे केल्यानंतर बालीकाकांनी नगर हेच कार्यक्षेत्र ठेवून हौशी रंगभूमी गाजवली. राज्य नाटय़ स्पर्धेत गाजलेल्या ‘धुरकट’ आणि ‘मसिहा’ या दोन नाटकांनी त्यांचा व्यावसायिक रंगभूमीवरील प्रवेश सुलभ केला. ‘निष्पाप’ या नाटकाद्वारे १९८३ मध्ये त्यांचे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण झाले. या पहिल्याच नाटकाने त्यांना राज्यभर प्रसिद्धी मिळवून दिली. या आणि पुढच्याच ‘चीत्कार’ या नाटकातही त्यांची सहनायिका होती, सविता प्रभुणे. या दोन्ही नाटकांत ही जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली. ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद देशपांडे यांच्या निधनानंतर त्यांना ‘विसुभाऊ’ची भूमिका मिळाली. चार ‘फुलराणीं’सह मोहन जोशी, सदाशिव अमरापूरकर व संजय मोने अशा तिघांसमवेत बालीकाकांनी सहनायक उभा केला. पुढे ओम पुरींसमवेत ‘नासूर’, नाना पाटेकर यांच्यासमवेत ‘मोहरे’, तसेच ‘अनुभूती’ या हिंदी आणि ‘वारसा लक्ष्मीचा’ या मराठी चित्रपटांत त्यांनी छाप पाडली. त्यांचा ओढा नाटकाकडेच होता. त्यासाठीच त्यांनी एसटीच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्तीही स्वीकारली. मात्र या क्षेत्रातील मुंबईची दादागिरी आणि नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे बालीकाकांना रंगभूमीवरून काहीशी लवकरच एग्झिट घ्यावी लागली. बालीकाका या रूढ नावाबरोबरच अगदी आतल्या गोटात ‘गुलाबजाम’ असे त्यांना म्हणत, कारण केवळ बोलण्यातच नव्हे तर, आचार-विचारातही कमालीचा मधाळपणा आणि आत्मीयता. त्यांच्या निधनाने नगरच्या नाटय़ आणि सांस्कृतिक क्षेत्रातील हा नैसर्गिक गोडवा संपला आहे..