पदवीधर झाल्यानंतर मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीप्रमाणे अनुराधा वैद्य यांचाही विवाह झाला. औरंगाबादसारख्या ठिकाणी एकरभर जागेतील टुमदार बंगला, आजूबाजूला ऐसपैस मोकळी जागा, विस्तीर्ण बाग आणि घरी कुत्रा, मांजर, हरीण, कासव, ससा, पोपट यांसारखे पशुपक्षी. त्यामुळे विवाहानंतरची त्यांची दहा वर्षे कुटुंबीय, प्रवास, वाचन, संगीत, नाटय़ चळवळ यांसोबतच गेली. वयाची तिशी पार केल्यानंतर अनुराधा वैद्य यांनी ‘वनवास हा सुखाचा’ ही पहिली कथा लिहिली ती आपल्या आवडत्या पशुपक्ष्यांवर. त्या काळी ई-मेल वा फेसबुकसारखी माध्यमे नसतानाही त्यांच्या या कथेला उदंड प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून त्यांनी जी लेखणी हाती धरली ती गेल्या आठवडय़ात त्यांनी अखेरचा श्वास घेतला तोपर्यंत त्यांच्या नावावर ४५ पुस्तके जमा होती, अनेक पुरस्कार आणि पहिल्या मराठवाडा लेखिका संमेलनाच्या अध्यक्षपदासारखा सन्मानही!

पहिलीच कथा लोकप्रिय झाल्याने ‘मोहिनी’, ‘श्यामसुंदर’, ‘माहेर’, ‘जत्रा’ यांसारख्या विविध नियतकालिकांत त्यांनी कथा लिहिण्यास सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात त्यांनी विनोदी कथा अधिक लिहिल्या. या कथांचा संग्रह निघाला ‘अजुनी नाद खुळा’ या नावाने. त्याला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला. काही निकटवर्तीयांनी अन्यविषयांवरही लिहीत जा, अशी सूचना केल्याने मग त्या सामाजिक प्रश्नांवरही लिहू लागल्या. आपल्याला मूल होणार नाही हे उमगल्याने पत्नीवर अन्याय होऊ नये म्हणून घटस्फोट घेणारा पती, ध्येयवादी डॉक्टरचेही काळाच्या ओघात कसे अध:पतन होते यांसारख्या विषयांवरील कथा असणारा ‘मनुष्यहाट’ हा वैद्य यांचा कथासंग्रह वाचकप्रिय ठरला. नंतर ‘अस्तित्वरेषा’, ‘अंतर’, ‘काजळ’, ‘गारुडगुंफण’ यांसारख्या भावस्पर्शी आणि तितक्याच सशक्त कथांचे संग्रह त्यांचे निघाले.  ‘माझी चिंध्यांची बाहुली’ ही गद्यकाव्य रूपातील त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली आणि खूप लोकप्रिय झाली. समीक्षकांनीही त्याची दखल घेतली. दत्तक आई-मुलीची ती काव्यकथा होती. आपणहून स्वीकारलेले नाते रक्ताच्या नात्यापेक्षाही कसे दृढ असते हे वैद्य यांनी यातून सांगितले होते. काव्य आणि कादंबरी असे त्याचे रूप असल्याने त्यांनी त्याला नाव दिले ‘काव्यांबरी’! हा एक नवाच साहित्य प्रकार त्यांनी मराठीत आणला.

Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…
Fire at Shop in Chhatrapati SambahjiNagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये कापड दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू
Cheistha Kochhar Accident
लंडनमध्ये PHD करणाऱ्या भारतीय विद्यार्थिनी चेइस्ता कोचर यांना ट्रकने चिरडलं, अपघातात मृत्यू
78-year-old women died due to corona in Nagpur before Holi and Lok Sabha elections
होळीवर करोनाचे सावट! वृद्धेचा मृत्यू; लोकसभा निवडणुकीवरही संक्रमनाचा धोका

कौटुंबिक आयुष्यात त्यांना संघर्ष करावा लागला. पती अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना  स्मृतिभ्रंश झाला.  हे दु:ख पचवूनही त्या लेखन करीत राहिल्या. मराठवाडा लेखिका संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना चंगळवाद, माणसामाणसांच्या स्नेहभावात येत चाललेले अंतराय, पर्यावरणाचे ढळते संतुलन व त्याचे शेतकरी जीवनावर होणारे दुष्परिणाम यावर त्यांनी प्रांजळपणे मते मांडली होती. या अनुषंगाने लिखाण करण्याचे त्यांनी ठरवले होते. अजून खूप काही लिहिण्याची क्षमता असलेल्या या लेखिकेला दुर्दैवाने प्रकृतीची साथ न लाभल्याने मराठी साहित्याचे नुकसान झाले असेच म्हणावे लागेल..