मातृभाषेसाठी ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी १९५२ सालच्या २०-२१ फेब्रुवारी रोजी पहिला एल्गार केला, त्यातून पेटलेले बांगलादेशमुक्तीचे अग्निकुंड पुढली सुमारे १८ वर्षे धगधगत राहिले आणि १९७१ मध्ये बांगलादेशाचा जन्म झाला. या मुक्तिलढय़ाची आठवण अवघ्या तीन मनुष्याकृतींमधून देणारे स्मारक-शिल्प म्हणजे ‘अपराजेय बांगला’.. बांगलादेशाचे अस्मिताचिन्हच ठरलेले हे शिल्प ज्यांनी घडविले, त्या शिल्पकार सय्यद अब्दुल्ला खालिद यांचे अलीकडेच निधन झाले. या शिल्पानंतर अन्य दोन स्मारकशिल्पेही त्यांनी केली होती आणि प्रचंड, अवाढव्य, खर्चीक वगैरे नसूनसुद्धा संवेदनशीलतेने स्मारकशिल्पे करता येतात, अशी शिल्पे घडविल्यास पाहणाऱ्याला ती प्रेरणाही देतात, याचा धडा बांगलादेशात खालिद यांनी घालून दिला होता.

खालिद १९४२ साली जन्मले, त्यामुळे फाळणीनंतर इच्छा असूनही त्यांना शांतिनिकेतनात शिकता आले नाही. त्या वेळच्या शांतिनिकेतनात शिल्पकार रामकिंकर बैज हे सिमेंट-काँक्रीटसारख्या (सर्वार्थाने) कठीण साधनानिशी ‘संथाळ फॅमिली’ किंवा ‘सुजाता’ यासारखी शिल्पे घडवून पाश्चात्त्य आधुनिकता आणि भारतीय उपखंडातील शिल्पकलेमध्ये अंगभूतच असलेले लय-तत्त्व यांची सांगड घालत होते. या साऱ्याचा अप्रत्यक्ष संस्कार, शांतिनिकेतनात शिकलेल्या काही प्राध्यापकांकरवी खालिद यांच्यावरही झाला. तेव्हाच्या ‘ईस्ट पाकिस्तान कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड क्राफ्ट्स’ (आता ढाका विद्यापीठाचा दृश्यकला विभाग)मधून १९६९ साली खालिद यांनी पदवी मिळवली, त्यानंतरची काही वर्षे मुक्तिलढय़ाच्या वावटळीतच गेली, पण बांगलादेश निर्मितीनंतर मात्र त्यांनी चित्तगाव येथील कला महाविद्यालयात अध्यापकाची नोकरी मिळवली. स्थिरस्थावर होण्याचे प्रयत्न सुरू असतानाच ढाका विद्यापीठातील ‘अपराजेय बांगला’ साकारण्याचे काम मिळाले! त्याचीही कथाच आहे..

मुक्तिलढय़ाच्या स्मारकशिल्पासाठी विद्यापीठाने सन १९७३ मध्ये खुल्या स्पर्धेद्वारे प्रस्ताव मागवले. त्यातून कला-अध्यापक खालिद यांची संकल्पना निवडली गेली. विद्यापीठातील ज्या चौकात पूर्वी सुमारे तीन फुटांचे एक शिल्प होते, ते हटवून तेथेच या स्मारकशिल्पाला जागा देण्यात आली. ‘मधोमध उंचापुरा ग्रामीण बांगला तरुण- त्याच्या खांद्यावर तीरकामठा, त्याच्या डाव्या बाजूला बंदूकधारी आणि शहरी कपडय़ांतला तरुण, तर उजव्या बाजूला निर्धाराने या दोघांसह चालणारी एक स्त्री- तिच्या खांद्यावर पर्ससारखीच लटकवलेली, पण पर्सपेक्षा मोठय़ा आकाराची प्रथमोपचार पेटी!’ अशी या शिल्पाची संकल्पना होती. काँक्रीट या साधनात, जास्तीत जास्त उंची ११ फूट असणाऱ्या या शिल्पाचे काम काहीशा सरकारी पद्धतीनेच सुरू झाले. त्या तीन मानवाकृतींसाठी हसीना अहमद, सय्यद हमीद मकसूद आणि बदरुल आलम बेनू या मित्रमंडळींचीच निवड खालिद यांनी केली. प्राथमिक काम पूर्णदेखील होत आले असतानाच, वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येमुळे १९७५ सालच्या ऑगस्टपासून काम थांबवण्यात आले. नवे सत्ताधारी आल्यावर कुलगुरूही नवे आले, त्यांनीही कामात फांदेबाजी करण्यामध्येच अधिक रस घेतला. अखेर १९७७ मध्ये या कामाच्या पुनरारंभाला मंजुरी मिळाली आणि १९७९ मध्ये अखेर या स्मारकाचे अनावरण झाले! या शिल्पाचे टपाल तिकीट (१९९१) आणि पुढे १९९८ मध्ये चांदीचे स्मृतिनाणेदेखील काढून बांगलादेश सरकारनेच ‘अपराजेय बांगला’ अजरामर केले. मात्र तोवर मूळ शिल्पाला तडे गेले होते! अखेर मूळ शिल्पाआधारे साचा तयार करून, त्याबरहुकूम तितक्याच मापांची त्रिमित प्रतिमा तयार करण्यात आली. सध्या दिसते ती ही दुय्यम प्रतिमा. या शिल्पानंतर खालिद देशभर पोहोचले. बांगलादेशी कलाजगत त्या वेळी छोटेखानीच, पण मानसन्मान मिळाले. अगदी अलीकडेच (२०१७) त्यांना ‘इकुशे पदक’ या राष्ट्रीय सन्मानाने गौरवण्यात आले.

पन्नाशीनंतर शिल्पकार खालिद यांनी कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक रंग वापरून चित्रेही रंगवणे सुरू केले. सन १९८८ पासून त्यांचे एकही प्रदर्शन मात्र भरले नव्हते. ते अखेर २०११ साली भरले, तेव्हा दोन दशकांतली ४० चित्रे त्यांनी मांडली होती. गेल्या काही वर्षांत त्यांना श्वसनविकार जडला. फुप्फुसाच्या याच आजाराने २० मे रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.