तरुण मुला-मुलींसाठी त्या आदर्श होत्या, एरवी पुरुषांच्या वर्चस्वाचा प्रांत असलेल्या हवाई उड्डाणकलेत त्या पारंगत होत्या. उत्तराखंडमध्ये २०१३मध्ये जो प्रलय झाला त्या वेळी त्यांनी हेलिपॅड नसताना प्रतिकूल हवामानातही नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ माऊंटेनीअिरगचे पहिले पथक घटनास्थळी पोहोचवून मोठी कामगिरी केली होती. त्यांचे नाव कॅप्टन सुमिता विजयन. वैष्णोदेवी येथे हेलिकॉप्टरचा जो अपघात झाला त्यात त्यांचा अकाली मृत्यू झाला.
विमानोड्डाणात आता स्त्रियाही आहेत, पण त्या एक निष्णात वैमानिक होत्या. ज्या उंचीवर कुणी जाण्याचे धाडस करीत नाही ते त्या नेहमी करीत होत्या. कटरा येथे वैष्णोदेवीच्या पायथ्याला जो अपघात झाला त्यात खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर अडचणीत आले होते. ते दाट लोकवस्तीत कोसळू शकत होते, पण सुमिता यांनी शेवटचे प्रयत्न म्हणून ते किरकोळ लोकवस्तीच्या भागात नेले. त्यामुळे प्राणहानी कमी झाली. मरण समोर दिसत असतानाही दुसऱ्यांचा विचार त्यांच्या मनात होता. त्या केरळमधील तिरुअनंतपुरम जिल्ह्य़ातील अवनावनचेरी (कडक्कवुरनजीक) येथील होत्या. नालनशिरा येथील इव्हानिऑस महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर हैदराबादच्या हवाई दल अकादमीत त्यांनी प्रशिक्षण घेतले. कॅप्टन सुमिता या भारतीय हवाई दलातील अशा पहिल्या वैमानिक होत्या, ज्यांनी भटिंडा , हैदराबाद व बागडोगरा अशा तीनही ठिकाणी काम केले होते. हेलिकॉप्टर चालवण्यास जास्त कसब लागते. कॅप्टन सुमिता या देशातील सर्वात अनुभवी हेलिकॉप्टरचालक होत्या. कठोर परिश्रम हेच त्यांच्या यशाचे गमक होते, त्या हवाई दलातून लवकर निवृत्त झाल्यानंतर त्यांनी हिमालयन हेली सíव्हसेस प्रा.लि. या कंपनीत त्यांनी २००५ मध्ये नोकरी स्वीकारली. तेथे त्या मुख्य वैमानिक होत्या. अविवाहित असलेल्या सुमिता द्वारका येथे एकटय़ाच राहत होत्या, त्यांची आई सिलिगुडी येथे राहते, तर वडील एन. विजयन दोन वर्षांपूर्वीच वारले. १९९७ मध्ये त्या हवाई दलात रुजू झाल्या, त्यानंतर २००३ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली त्या वेळी त्या स्क्वाड्रन लीडर होत्या, त्यांना हवाई उड्डाणाचा ८००० तासांचा अनुभव होता. त्यांनी वयाच्या ४५व्या वर्षी त्यांच्यापेक्षा वयाने अधिक असलेल्या वैमानिकांचे नेतृत्व केले, पण तेवढीच त्या सहकाऱ्यांची काळजीही घेतली होती. सर्व व्यवस्था असलेल्या शहरांच्या दरम्यानची हवाई वाहतूक वेगळी आणि दुर्गम भागात हेलिकॉप्टर चालवणे वेगळे, जिद्दी स्वभावाला अनुकूल अशी ही अवघड वाट त्यांनी पत्करली होती. आता हा प्रवास संपला आहे..