रॉक हा संगीताचा प्रकार श्रोत्यांना शांतिमग्न बनवत नाही, तर त्यांच्यातल्या अंत:प्रेरणांना थिरकण्याचे आव्हान देतो. रॉक संगीताला विश्वश्रोत्यांच्या कोशात प्रथम स्थान मिळवून दिले ते एलविस प्रेस्ले या अमेरिकी अवलियाने. परंतु त्याचसोबत नर्तनचेष्टेसह या संगीताला खऱ्या अर्थाने सादर केले ते चक बेरी या संगीत-गीतकार आणि गायकाने. आपल्याकडे शम्मी कपूर यांच्या पन्नास वर्षांपूर्वीच्या गाण्यांतील नर्तनचेष्टा ज्यांनी पाहायला असतील, त्यांना चक बेरीच्या संगीताची जातकुळी स्पष्ट होईल. मुळात पन्नास-साठ दशकातली युद्धोत्तर अमेरिका युद्धाने पोळली होती. परंतु त्याच नैराश्यगर्तेत सर्वच गोष्टींमध्ये नव्याचे स्वागत केले जात होते. चक बेरी यांनी गिटारच्या सहापैकी दोन तारांना एकाच वेळी स्लाइड करण्याची कला आत्मसात करून त्या काळात संगीत जलसे गाजविलेच नाही तर एकटय़ाच्या बळावर अविस्मरणीय बनवून टाकले. त्यामुळे रॉक अ‍ॅण्ड रोल संगीताच्या प्रवर्तकांमध्ये चक  बेरी यांचे नाव सन्मानाने घेतले जाते. गिटार स्लायडिंगची त्यांची शैली ‘चक बेरी लिक’ या नावाने ओळखली जात होती. ती मूळची त्यांची नव्हती. टेक्सासमधील टी बोन वॉकर या संगीतकाराने ती विकसित केली होती. चक बेरी यांनी ती नुसती आत्मसातच केली नाही, तर सभागृह दणाणून सोडण्याची हुकमत त्यावर मिळविली. मिसुरी येथील मध्यमवर्गीय आफ्रिकी-अमेरिकी कुटुंबात जन्मलेल्या बेरी यांचे लहानपण संगीतामुळे तेथील इतर कृष्णवंशीयांपेक्षा बरे गेले असले, तरीही वयाच्या विशिष्ट टप्प्यात संगतीपरिणामामुळे चोरी आणि दरोडय़ाच्या गुन्ह्य़ात त्यांनी तीन वर्षांची शिक्षा भोगली. ही शिक्षा पूर्ण होताच त्यांनी ‘वाल्मीकी’मार्ग पत्करत लग्न केले आणि संगीताच्या प्रयोगामध्ये स्वत:ला बुडवून टाकले. चक बेरी हे नाव लोकप्रिय होण्यामागे त्यांनी लिहिलेली गाणी सर्वात महत्त्वपूर्ण होती. ‘स्वीट लिटिल सिक्स्टिन’, ‘यू काण्ट कॅच मी’, ‘जॉनी बी गुड’,‘ टू मच मंकी बिझनेस’ या गाण्यांमध्ये अमेरिकेतील प्रवर्तनशील काळावर तिरकस दृष्टिकोन मांडलेला दिसतो.

तत्कालीन अमेरिकी तरुणांच्या मनाचा वेध घेत त्यांच्या सुखापेक्षा दु:खावर आणि राजकीय नेत्यांच्या फोलपणावर, कुटुंबसंस्थेचा आणि व्यवस्थेचा ऱ्हास होताना पाहणाऱ्या पहिल्या पिढीच्या मनातली ही गाणी होती. आर अ‍ॅण्ड बी म्हणजेच ऱ्हिदम अ‍ॅण्ड ब्लू संगीताच्या मुशीत घडूनही त्यांनी रॉक अ‍ॅण्ड रोलचा अंगीकार केला. तत्कालीन कण्ट्री म्युझिकचा प्रवाहही त्यांनी आपल्या संगीतामध्ये राबवून पाहिला. सुरुवातीला संगीतत्रयीमध्ये गायक आणि वादक म्हणून सुरुवात करून त्यांनी अमेरिकेतील शहरांतील तरुणाईला जिंकले. मग गाण्यांचे अल्बम बनवत आणि आपल्या रॉक अ‍ॅण्ड रोल संगीताला अख्ख्या दुनियेत प्रसिद्ध केले. सत्तर ते १९९०च्या बहुतांश रॉक बॅण्ड्समधील कलाकारांनी चक बेरी यांची गिटारशैली आत्मसात केली. पन्नासच्या दशकापासून अगदी अलीकडेपर्यंत त्यांचे लाइव्ह कन्सर्ट होत होते. खऱ्या अर्थाने आद्य रॉकस्टार म्हणता येईल अशा या कलाकाराच्या निधनाची हळहळ संगीतजगतात मोठी आहे.