वार्ताहराने कसे असायला हवे, याचे विसाव्या शतकातील एक ठसठशीत आदर्श ठरणारे उदाहरण म्हणजे क्लेअर हॉलिंगवर्थ. सन १९३९च्या ऑगस्टमध्ये नुकतीच ‘द टेलिग्राफ’ या दैनिकात नोकरीस लागलेली सुमारे २७ वर्षांची तरुणी पोलंडमध्ये जाण्याचा प्रयत्न करते, तिथे जाता येत नाही म्हणून थेट ब्रिटिश वाणिज्यदूताची मोटारगाडी मिळवते आणि जर्मनव्याप्त पोलिश भूमीत शिरून शंभरावर रणगाडे पाहाते.. काय होणार आहे याचा तिला अंदाज येतो, कॅमेरा नसल्याने ती रणगाडय़ांचेच जमिनीवर पडलेले भाग जमवते आणि बातमी देते : जर्मनी मोठय़ा आक्रमणाच्या तयारीत!

‘सनसनाटी’ म्हणून वार्ताहरांच्या कष्टांना हिणवण्याची रीत तेव्हाही होती, पण तेव्हाचीही वृत्तपत्रे अशा लोकभावनेपेक्षा वार्ताहरांवरच विश्वास ठेवत, म्हणून घडत्या इतिहासाची ही पहिली खूण तातडीने ब्रिटिशांपर्यंत पोहोचू शकली. ही बातमी अर्थातच खरी ठरली, तेव्हा क्लेअर हॉलिंगवर्थ मात्र जर्मनव्याप्त ऑस्ट्रियात अडकल्या होत्या. ही एवढी एकच बातमी देऊन जरी त्या १०५ वर्षे जगल्या असत्या, मग १० जानेवारीच्या मंगळवारी हाँगकाँगहून त्यांची निधनवार्ता आली असती.. तरीही पत्रकारितेवर प्रेम करणारे हळहळलेच असते. निधनवार्ता आली, पण क्लेअर हॉलिंगवर्थ यांनी केवळ त्या एका बातमीपुरते काम केले नव्हते.. त्यांचे काम इतके की, जगाने त्यांच्या कर्तृत्वाकडे मागे वळून पाहाताना अचंबित व्हावे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्या बुखारेस्टला होत्या. सर्वच पत्रकारांवर र्निबध होते. ते डावलून ब्रिटनला बातम्या पाठवणे क्लेअर यांनी आरंभले. सुगावा लागून हंगेरीचे पोलीस अटकेसाठी आल्यावर हिने काही चपळ कृती केल्या आणि म्हणाली : मी विवस्त्र आहे, तुम्ही मला अटक करूच शकत नाही. अखेर पोलिसांनी ब्लँकेट टाकून क्लेअर यांना ताब्यात घेतले खरे, पण या अटकेनंतर ‘अटकेलाही घाबरायचे नाही’ हेच क्लेअर शिकल्या! युद्ध संपल्यावर आधी जेरुसलेमला, मग कैरोत आणि अखेर फ्रान्सला, पॅरिस शहरातच त्यांना पाठवण्यात आले, तर तिथून त्या सारख्या अल्जेरियात जाऊ लागल्या.. फ्रान्सशी त्या देशाचा स्वातंत्र्यलढा ऐन हिंसेच्या भरात असताना, अल्जेरियाच्या केवळ राजधानीत नव्हे तर लहान गावांमध्ये फिरून फ्रान्सची दडपशाही कशी सर्वदूर आहे, याचे वृत्तान्त देऊ लागल्या. ‘स्वस्थ बसायचे नाहीच’ हे वार्ताहराचे ब्रीद त्या जगत होत्या.

ब्रिटिश शासकांच्या मर्जीबाहेर काम न केल्याचा संशय त्यांच्या इथवरच्या कारकीर्दीवर घेतला जाऊ शकला असता, ती शक्यताही क्लेअर यांच्या एका बातमीमुळे धुडकावली गेली. ब्रिटिश हेर किम फिल्बी हे क्लेअर यांच्या परिचयाचे; पण ‘फिल्बी बहुधा केजीबीसाठीही छुपेपणाने काम करीत असावेत’ ही शंका पहिल्यांदा बातमीद्वारे नोंदवली ती क्लेअर यांनीच. तिचा इन्कार तत्कालीन पंतप्रधानांनी केला. पण अखेर अनेकांच्या पाठपुराव्यानंतर, बातमी खरी ठरली व फिल्बींना कबुली द्यावी लागली.

एखादी विशिष्ट श्रेणी मानून त्या श्रेणीत आलेली ‘पहिली महिला’ वगैरे बिरुदे क्लेअर यांना मिळत होतीच, पण महिला असण्याचे त्यांना काही विशेष वाटत नसे. ‘फ्रंट लाइन’ हे त्यांच्या आठवणींचे पुस्तक प्रकाशित झाले. उत्तरायुष्यात – म्हणजे नव्वदीपार गेल्यानंतर – त्या हाँगकाँगमध्ये राहू लागल्या होत्या.. हाँगकाँगमधील इंग्रजी भाषकांचे प्रेम त्यांना लाभले, फेसबुकवर क्लेअर हॉलिंगवर्थ चाहतेमंडळ स्थापन झाले, या मंडळातर्फे गेल्याच १० ऑक्टोबरला त्यांचा १०५वा वाढदिवस साजरा झाला होता. जिवंतपणी मानवी मर्यादा ओलांडणाऱ्या, इतिहासाच्या ठसठसत्या नसांवर अचूक बोट ठेवणाऱ्या या पत्रकाराने मृत्यूचीही  ‘डेडलाइन’ जणू थोपवून ठेवली होती.. अखेर ही डेडलाइन त्यांना पाळावी लागली.