माणिकताई भिडे आणि किशोरीताई आमोणकर हे समीकरण कौतुकास्पद वाटावे असे असले, तरीही अभिजात संगीताच्या क्षेत्रातील प्रत्येकाला या दोघींमधील स्वरसंवाद कायमच गूढ वाटत राहिला. माणिकताई स्वभावाने अतिशय सौम्य, तर किशोरीताई बाह्य़ांगाने उग्र आणि अंतरंगाने अतिशयच मऊ. किशोरीताईंच्या या बाह्य़ांग रूपाबद्दल संगीतविश्वात सतत चर्चा होत राहिली, पण माणिकताईंनी त्यांची सावली बनून राहण्याचा ध्यास कधीच सोडला नाही. किशोरीताई ज्या काळात आपली गायकी विविध पद्धतींनी खुलवू पाहात होत्या, त्या काळातील प्रत्येक मैफिलीत माणिकताईंची स्वरसंगत त्यांना लाभली. माहेर कोल्हापूरचे म्हणजे जयपूर घराण्याच्या जन्मगावाचे. उस्ताद अल्लादिया खाँ यांच्यासारख्या या घराण्याच्या अध्वर्यूच्या वास्तव्याने सगळ्या कोल्हापूरलाच स्वरसाज चढला होता.

घरात गाण्याचे वातावरण असल्याने माणिकताईंची तालीम मधुकरराव सडोलीकर या जयपूर घराण्याच्या गुरूंकडे सुरू झाली. लग्न झाले ते गोविंदराव भिडे यांच्या घरातही संगीताचे वातावरण. गानप्रेमी सासरी नव्या सुनेने गाणेच करावे, असा हट्ट. कौटुंबिक मित्र असलेले चार्टर्ड अकाऊन्टन्ट आणि ज्येष्ठ संगीत आस्वादक-लेखक वामनराव देशपांडे तेव्हा मोगुबाई कुर्डीकर यांच्याकडे गाणे शिकत होते. साहजिकच मोगुबाईंच्या पायावर घालण्यासाठी वामनराव माणिकबाईंना घेऊन त्यांच्या घरी गेले आणि तिथे किशोरीताईंचीच गाठ पडली. तालीम सुरू झाली आणि माणिकताईंच्या स्वरजीवनात एका नव्या अध्यायाला प्रारंभ झाला.

siddharth chandekar shares post for chinmay mandlekar
“जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत…”, सिद्धार्थ चांदेकर ट्रोलर्सवर संतापला; चिन्मय मांडलेकरला केली विनंती
Chinmay Mandlekar take big decision to not play the role of Chhatrapati Shivaji Maharaj
“ट्रोलिंगमुळे किती गोष्टी…”, छत्रपती शिवरायांच्या भूमिकेची चिन्मय मांडलेकरने घेतली रजा, मृण्मयी देशपांडे म्हणाली…
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”

जयपूर घराण्याच्या गायकीमध्ये स्वरलयीला असलेले महत्त्व आणि लयीचे भान सांभाळता सांभाळताही स्वरातून भाव व्यक्त करण्यासाठीची सर्जनशीलता अंगी बाणवणे हे कुणाही नवख्यास फार म्हणजे फारच अवघड. किशोरीताई मोगुबाईंच्या तालमीत कसून तयार झालेल्या.   किशोरीताईंना मिळालेली अस्सल तालीम त्यांनी माणिकताईंच्या गळ्यात उतरवलीच, पण त्याहीपुढे जाऊन ज्या नव्या आविष्काराचा शोध त्या घेत होत्या, त्यामध्ये सहभागीही करून घेतले. अभिजात संगीताच्या क्षेत्रात किशोरीताईंच्या या नव्या शैलीने दिपून जाण्याचे भाग्य त्या वेळच्या रसिकांना अपरंपार मिळाले. त्या काळातील जी ध्वनिमुद्रणे आजही उपलब्ध आहेत, त्यातील किशोरीताईंचे गाणे तेवढय़ाच ताकदीने गाऊ शकणाऱ्या माणिकताईंची स्वरसंगत खरोखरीच लक्ष्यवेधी ठरते. स्वरलयीच्या मिलाफात भावसौंदर्याच्या खुणा शोधणाऱ्या किशोरीताईंचे गाणे माणिकताईंनी अतिशय कष्टपूर्वक साध्य केले. त्यामुळे मैफिलीत माणिकताईच हव्यात असा हट्ट किशोरीताई सातत्याने करीत. माणिकताईंनी  उत्तम मैफिली सजवल्या आणि स्वत:ची कलावंत म्हणून ओळखही सिद्ध केली. शांत आणि कोमल स्वभावाच्या माणिकताईंना किशोरीताईंबरोबरच्या सहवासात अनेक कटू प्रसंगांना तोंड द्यावे लागले. ताईंच्या सहवासात राहण्याची तपश्चर्या किती घोर होती, हे केवळ माणिकताईंनाच माहीत. त्यामुळे या गुरू-शिष्येचे संबंध दुरावलेले, त्यांच्या परिघातील सगळ्यांनाच क्लेशकारक वाटणारे होते. किशोरीताईंच्या शेवटच्या काळात हे पुनर्मीलन घडून आले, ही माणिकताईंसाठी सर्वात आनंदाची बाब असेल. त्यांची कन्या अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या गायनातून आजही माणिकताई सतत सगळ्यांसमोर उभ्या असतात. त्यांना राज्य शासनाने जाहीर केलेला भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कार हे आयुष्यभराच्या तपश्चर्येचे संचितच आहे, असे म्हटले पाहिजे.