‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ चित्रमालिकेनंतर लोकप्रिय झालेल्या जॉनी डेपने ‘चार्ली अ‍ॅण्ड चॉकलेट फॅक्टरी’मधील विली वॉन्का हे प्रमुख पात्र पडद्यावर साकारले अगदीच अलीकडे. रोआल्ड डाल यांच्या या कादंबरीवर याआधी बेतलेल्या ‘विली वॉन्का अ‍ॅण्ड चॉकलेट फॅक्टरी’त जीन वाइल्डर यांच्या रूपाने तोवर ते बरीच वर्षे हॉलीवूडपट पाहणाऱ्यांच्या मनावर गोंदले गेले होते. लखलखत्या निळ्या डोळ्यांचा जीन वाइल्डर हॉलीवूडमधल्या प्रस्थापित विनोदी अभिनेत्यांना पर्याय म्हणून समोर आला. विनोदपटांचा रस्ता सोडून हॉलीवूडपट साठोत्तरी ते ऐंशीच्या दशकात संक्रमणावस्थेतून जात होते. हे संक्रमण फ्रेन्च न्यू वेव्हपासून जगभरातील घडामोडी घडवीत होते. त्या काळात जीन वाइल्डर अभिनीत विनोदी चित्रपट एकामागून एक येत होते आणि प्रायोगिक कलात्मकतेच्या नावाखाली ‘वृक्षो’त्तम सिनेलाटेवर उतारा ठरत होते. मंदीच्या दशकात अमेरिकी पांढरपेशा कुटुंबात जन्म झालेले वाइल्डर तेराव्या वर्षी आपल्या बहिणीच्या अभिनय शिक्षणाच्या तासाला जाऊन बसले. तेथे अभिनयदर्शनाने इतके भारावले की शिक्षकांना आपल्याला शिकविण्याची गळ त्यांनी घातली. अभिनय शिक्षणातून त्यांच्या बहिणीने फार गती घेतली नसली, तरी अचानकपणे या क्षेत्रात शिरकाव करणारे जीन वाइल्डर थेट ब्राडवेवर पोहोचले. आता तेथील परंपरेनुसार शेक्सपिअर घोटून झाल्यावर यांच्यातील अभिनयाची तीक्ष्ण धार आणि सुंदर डोळ्यांसोबत चेहऱ्याची तकाकी सिनेस्टुडिओंच्या पायऱ्यांपाशी त्यांना घेऊन गेली. इटुकल्या पिटुकल्या भूमिकांनंतर मेल ब्रूक्स यांच्या प्रोडय़ूसर्समध्ये त्यांची वर्णी लागली आणि हा गडी त्यासाठी थेट ऑस्करचे नामांकन मिळवून बसला. मेल ब्रूक्स आणि वूडी अ‍ॅलन यांच्या भरभराटकाळात अमेरिका सुखवस्तू आणि खदखदत्या अशा दोन्ही आवर्तनांतून जात होती. त्या काळातच ‘विली वॉन्का अ‍ॅण्ड चॉकलेट फॅक्टरी’ दाखल झाला. लॉटरीचे तिकीट लागलेल्या लहान मुलांना जगभराची सैर करून देणारे कथानक असलेला हा कुटुंबपट आजच्या ‘मेगा ब्लॉकबस्टर’शी तुलना होऊ शकेल इतका गाजला. ‘विली’च्या साऱ्या ऑस्कर बाहुल्या त्या वर्षी ‘फिडलर ऑन द रूफ’ या राजकीय रूपक असलेल्या चित्रपटाने पळविल्या; पण प्रचंड लोकप्रिय पुस्तकाने तयार केलेला विली वॉन्का हे पात्र जीन वाइल्डरच्या रूपाने विनोदप्रेमींच्या मनात रुजले. आपल्याकडे चॅनलक्रांती झाली त्या  सुरुवातीच्या पर्वामध्ये इंग्रजी चित्रवाहिन्यांवर ‘सी नो एव्हिल, हिअर नो एव्हिल’, ‘द वुमन इन रेड’ आणि जीन वाइल्डर अभिनीत कैक विनोदपटांचा रतीब सुरू असे. २००३ साली टीव्ही मालिकेमध्ये शेवटचे अभिनयदर्शन देणाऱ्या वाइल्डर यांना गेल्या काही वर्षांपासून स्मृतिभंशाने जखडले होते. हॉलीवूडच्या अविनोदी कालखंडातील हा विनोदी शिलेदार काळाचा पडदा छेदून मृत्युरूपात शिरला असला, तरी त्याच्या अभिनयाचा स्मृतिभ्रंश रसिकांना होणार नाही, इतका उरला.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न