भारतीय वंशाचे असलेले अहमद कथराडा यांनी दक्षिण आफ्रिकेतील वर्णविद्वेषविरोधी चळवळीत नेल्सन मंडेला यांना साथ देत मोठे काम केले. दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यलढय़ातील सेनानी, राजद्रोहाच्या खटल्यात मंडेलांपेक्षा एकच वर्ष कमी शिक्षा भोगणारे आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते व खासदार अशी त्यांची ओळख. त्यांना अलीकडेच दरबान युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने सन्माननीय डॉक्टरेट दिली आहे. त्यांना याआधी मसॅच्युसेट्स, मिशिगन व केंटकी या अमेरिकेतील तर दरबान-बेस्टविले या दक्षिण आफ्रिकेतील विद्यापीठांच्या  मानद डॉक्टरेट मिळालेल्या आहेतच, २००५ मध्ये त्यांना प्रवासी भारतीय सन्मानही मिळाला होता. पण आताची डॉक्टरेट त्यांच्या साहित्यिक कामगिरीसाठी आहे!

मानवी हक्क, सामाजिक न्याय व साहित्य या तीनही क्षेत्रांत गती असल्याने त्यांनी स्वातंत्र्यलढय़ातील अनुभव साहित्यातून जिवंत केले. वयाच्या बाराव्या वर्षांपासून त्यांना साहित्याची गोडी लागली. रॉबिन बेट व पोल्समूर तुरुंगातील आठवणी असोत की तुरुंगातून त्यांच्या भाचीला लिहिलेली पत्रे, त्यांच्या शब्दांना चिरंतन साहित्यमूल्य आहे. नेल्सन मंडेला तुरुंगात असतानाच त्यांचे आत्मचरित्र लिहिले जात होते त्यात कथराडा यांच्या साहित्य कौशल्यांचा मोठा वाटा होता. कथराडा यांचे नाव अहमद महंमद कथराडा, ते कॅथी या नावाने ओळखले जातात. सुरतहून त्यांचे आईवडील आफ्रिकेत स्थलांतरित झाले होते. त्यांची दोन पुस्तके वर्णविद्वेषाविरोधातील लढा रेखाटणारी आहेत. वयाच्या बाराव्या वर्षी ते यंग कम्युनिस्ट लीग ऑफ साउथ आफ्रिका या संघटनेत सामील झाले. दुसऱ्या महायुद्धाविरोधी आघाडीत  काम करताना १९४० मध्ये त्यांची भेट वॉल्टर सिसुलू, नेल्सन मंडेला यांच्याशी झाली. वयाच्या १७ व्या वर्षी ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. १९५१ मध्ये ते ट्रान्सवाल इंडियन यूथ काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९५५ मध्ये भारतीय शाळा जोहान्सबर्गच्या बाहेर हलवण्यात आल्या तेव्हा त्यांनी पालकांची संघटना उभारून त्याला विरोध केला होता. १९५६ मध्ये १५६ जणांवर राजद्रोहाचा खटला भरला होता, त्यात ते होते. पोलिसांनी अनन्वित छळ करूनही ते हटले नाहीत. १९६३ मध्ये रिव्होनिया येथे लिलीलीफ शेतात पोलिसांनी छापा टाकला, त्यात त्यांना जन्मठेप झाली. १९८२ मध्ये त्यांना पॉल्समूर तुरुंगात हलवण्यात आले. तेथे मंडेला, सिसुलू, म्हालबा, मलागनी यांचा सहवास त्यांना लाभला. वयाच्या साठाव्या वर्षी ते २६ वर्षांच्या तुरुंगवासातून सुटले. तुरुंगातूनच त्यांनी इतिहास व गुन्हेशास्त्रात बीए केले. दक्षिण आफ्रिका विद्यापीठातून आफ्रिकी राजकारण व इतिहासात आणखी दोन पदव्या मिळवल्या. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसवरची बंदी १९९० मध्ये उठल्यानंतर त्यांनी अनेक पदे भूषवली. ते खासदारही होते. १९९९ मध्ये त्यांनी राजकारण सोडले. त्यांच्या पत्नी बार्बरा होगन या सध्या सार्वजनिक उद्योगमंत्री आहेत.