विज्ञानाबाबत लोकांमध्ये रुची निर्माण करणे हे अवघड काम आहे. एकीकडे सोप्या भाषेत संकल्पना स्पष्ट करायच्या व दुसरीकडे अचूकताही सोडायची नाही अशी कसरत त्यात करावी लागते. विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी (विज्ञानप्रसार व शिक्षण) दिला जाणारा युनेस्कोचा कलिंग पुरस्कार यावर्षी (२०१५) र्अजेटिनाचे प्राध्यापक दिएगो आंद्रे गोलोम्बेक यांना बुडापेस्ट येथील जागतिक विज्ञान मंचाच्या अधिवेशनात प्रदान करण्यात आला. जे किचकट, तांत्रिक भाषेत सांगितले जाते ते सोपे करण्याचे काम विज्ञान प्रसारकाला करावे लागते. गोलोम्बेक यांनी विज्ञान व कला यांचा संगम साधणारे विज्ञान सांस्कृतिक केंद्र त्यांनी ब्युनोस आयर्स येथे सुरू केले. त्याचा हेतू विज्ञानाला कलेची जोड देऊन ते रंजक, पण अचूक अशा भाषेत सांगणारी वेगवेगळी साधने व आकृतिबंध तयार करणे हा आहे.

प्रा. गोलोम्बेक हे शिक्षक, संशोधक व लेखक आहेत. जीवशास्त्र विषयात त्यांनी विद्यावाचस्पती पदवी घेतली असून ते संगीतात पदवीधर आहेत. त्यामुळेच ते विज्ञानातही कलेचे मोती शोधू शकले. न्यूरो-केमिस्ट्रीच्या (मेंदूतील रसायनांच्या अभ्यासाचे विज्ञान) मदतीने त्यांनी सस्तन प्राण्यांतील ‘जैविक घडय़ाळा’चा वेध घेतला. आपल्या शरीरातील जैविक क्रियेत सूरताल असतात ते त्यांनी शोधले आहेत. मेलॅटोनिन या संप्रेरकामुळे आपल्याला रात्री झोप येते. ते मेंदूतून अंधारात स्रवते. त्याचा सस्तन प्राण्यात वेगवेगळ्या काळात नेमका काय परिणाम दिसतो हे त्यांनी दाखवून दिले. गोलोम्बेक हे क्विलमेस विद्यापीठाच्या क्रोनोबायोलॉजी प्रयोगशाळेचे प्रमुखही आहेत. क्रोनोबायोलॉजी याचा अर्थ जीवनचक्रातील घटनाक्रम किंवा सुसंगतता शोधणे असा आहे. त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध असून विज्ञानावर सामान्य लोकांना समजतील, अशा भाषेत त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. ‘ला नॅसिऑन’ या साप्ताहिकात ते विज्ञानविषयक स्तंभलेखन करतात.
कलिंग पुरस्कार हा २० हजार डॉलर्सचा पुरस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर दिला जात असला तरी तो कलिंग फाऊंडेशन ट्रस्टचे संस्थापक बिजू पटनायक यांनी दिलेल्या देणगीतून १९५१ पासून देण्यात येतो. त्यात भारत सरकार तसेच विज्ञान-तंत्रज्ञान विभाग, ओडिशा सरकार यांनी आर्थिक भर टाकली आहे. विज्ञान लेखक, प्राध्यापक, रेडिओ व दूरचित्रवाणी कार्यक्रम संचालक, चित्रपट निर्माते अशांना विज्ञान लोकप्रियतेच्या कामासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. भारतातील वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर, गोकुळानंद महापात्रा, बसंतकुमार बेहुरा, त्रिलोचन प्रधान, जगजित सिंग, यशपाल आदी मान्यवरांना या पुरस्काराने यापूर्वी गौरवण्यात आले आहे.