इबोला, झिका यांसारख्या नवीन आजारांवर संशोधन हे गरजेचे आहे, कारण त्यांचा मुकाबला करणे हे सध्या मानवजातीपुढचे आव्हान आहे. भारतात या आजारांचे प्रमाण नगण्य असले, तरी झिकाने ब्राझील व अमेरिकेला चांगलाच फटका दिला होता. या सगळ्या विषाणुजन्य रोगांचे संशोधन करणारे डॉ. डॉगबी ख्रिस न्यान यांना यंदा मानाचा आफ्रिका नवसंशोधन पुरस्कार जाहीर झाला आहे.

साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाकडून त्यांना ईमेल आला होता. त्यात असे म्हटले होते, की तुमचे नाव, बँक खाते, दूरध्वनी व इतर व्यक्तिगत माहिती पाठवून द्या. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाचा हा ईमेल होता, त्यांनी लावलेल्या विषाणू ओळखण्याच्या नव्या चाचणीसाठी त्यांना भरपूर स्वामित्व धन द्यायला ही संस्था तयार होती. त्यांच्या नावावर काही कोटींची रक्कम तरी जमा झाली असती, पण त्यांनी अमेरिकेचा हा प्रस्ताव धुडकावला व मला तुमचे स्वामित्व धन नको. मी शोधलेल्या चाचणीवर माझाच अधिकार राहील, अशी भूमिका त्यांनी घेतली. थोडक्यात, अमेरिकेने त्यांचे संशोधन चोरले होते व त्यावर पांघरूण घालण्यासाठी त्यांना पैसे देऊन गप्प बसवण्याचा तो प्रयत्न होता. बौद्धिक संपदा अशी कवडीमोलाने विकली जात नाही, हे या खमक्या संशोधकाने अमेरिकेला दाखवून दिले. त्यांना आफ्रिकेचा हा नोबेलच्या तोडीचा पुरस्कार देण्याचे कारण म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या रोगांचे विषाणू शोधून निदान करण्याची शोधलेली चाचणी. त्यात अवघ्या एक तासात विषाणू कुठल्या रोगाचा आहे ते समजते. ही चाचणी सोपी व कमी खर्चीक आहे. त्यामुळे अप्रगत देशांना तिचा वापर करता यावा यासाठी त्यांनी अमेरिकेला नकार देण्याचे धारिष्टय़ दाखवले. आता आफ्रिकेतील दूरस्थ भागातील लोकांसाठी या चाचणीचा वापर केला जात आहे.

बर्लिनमधील हुम्बोल्ट विद्यापीठातून डॉ. न्यान यांनी वैद्यक शाखेची पदवी घेतली. नंतर ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ’ या संस्थेतून त्यांनी वैज्ञानिक म्हणून प्रशिक्षण घेतले. संसर्गजन्य रोगातील निदानात ते निष्णात मानले जातात. रक्तातील संसर्गातून एचआयव्ही, हेपॅटिटिस बी, हेपॅटिटिस सी, हेपॅटिटिस इ, डेंग्यूचा विषाणू, नाईल विषाणू, चिकुनगुनिया विषाणू पसरतात. ते सगळे विषाणू ओळखण्याची एकच सर्वसमावेशक चाचणी त्यांनी शोधून काढली. त्यांनी हेपॅटिटिस बी विषाणूच्या निदानावर केलेले संशोधन ‘क्लिनिकल इन्फेक्शियस डिसीजेस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. लायबेरियात इबोलाचा उद्रेक झाला तेव्हा तेथील इबोला आपत्कालीन प्रतिसाद पथकाचे ते प्रमुख होते. आफ्रिकेतील अनेक देशांत पिवळा ताप, विषमज्वर, मलेरिया, इबोला यांसारखे अनेक रोगांचे निदान होण्यापूर्वीच अनेक लोक उपचाराविना मरतात. एखाद्या रुग्णाला कोणत्या विषाणूची बाधा झाली आहे, हे समजणे तर फार कठीण; पण त्यांनी तयार केलेल्या एकाच चाचणीत रोगनिदान अचूक होते. आफ्रिकेतील नवप्रवर्तक संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वित्र्झलडमधील दानशूर उद्योजक जीन क्लॉद बॅस्टॉस द मोराइस यांनी आफ्रिकन इनोव्हेशन फाऊंडेशनची स्थापना केली. त्या संस्थेचा पुरस्कार आता त्यांना मिळाला आहे. आफ्रिका व जगाच्या आरोग्य कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर आरोग्य सेवेत झाला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या विषाणूशोधन चाचणीचा व्यावसायिक वापर सुरू होईल, तेव्हा ती रोगनिदानातील मोठी क्रांती असेल.