खरे तर त्या अमेरिकेतील एक चांगल्या दंतवैद्य आहेत, पण कालांतराने त्यांनी कर्करोगावर केलेल्या संशोधनाकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. त्यातूनच त्यांना अलीकडे अमेरिकेत सस्टेनिंग आऊटस्टॅण्डिंग अचिव्हमेंटअंतर्गत ५२.७३ कोटी रुपयांचा अनुदान स्वरूपातील पुरस्कार कर्करोगावरील संशोधनासाठी मिळाला आहे. त्यांचे नाव डॉ. निशा डिसिल्वा. त्या भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक आहेत. मान व डोक्याच्या कर्करोगाने मरण पावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी त्या संशोधन करीत आहेत, त्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. या रकमेतून त्या आणखी परिणामकारक उपचाराच्या दृष्टीनेकाम करू शकतील.

अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात त्या वैज्ञानिक म्हणून सध्या काम करतात. मानेचा किंवा डोक्याचा कर्करोग हा काही रेणवीय मार्गिकांतील बिघाडामुळे पुन:पुन्हा डोके वर काढतो, त्यामुळे तो घातक असतो. कुठल्याही कर्करोगात रुग्णांचे मरण्याचे प्रमाण जास्त असते याचे कारण म्हणजे त्यात रोगनिदान लवकर होत नाही. त्यामुळे डिसिल्वा यांच्या संशोधनाचा भर हा रोगनिदानाच्या नवीन पद्धती शोधण्यावर असणार आहे. उपचाराच्या नवीन पद्धती विकसित करण्यासाठी त्यांना आठ वर्षांत ही रक्कम दिली जाणार असून कर्करोगातील काही आव्हानात्मक प्रश्नांची उत्तरे त्या शोधणार आहेत.

मानेचा व डोक्याचा कर्करोग जगात दरवर्षी सहा लाख लोकांना होतो, त्यामुळे त्याचे रोगनिदान व उपचार यावर भर देणे गरजेचे होते. जगातील हा सर्वत्र आढळणारा सहाव्या प्रकारचा कर्करोग आहे. कर्करोगाच्या पेशींचा डोके व मानेतील शिरकाव हा धोकादायक असतो. मेंदूत तर या पेशी न्यूरॉन्सभोवती फिरत राहतात, त्यामुळे त्याचे रूप अधिक उग्र होत जाते. डिसिल्वा या मिशिगन विद्यापीठात प्राध्यापक असून मान व डोक्याच्या कर्करोगातील काही बाबी माहिती असल्या तरी त्याविरोधात वैद्यकीय पातळीवर नेमकी कशी उपाययोजना करता येईल यावर त्यांचा भर आहे. जास्त फलदायी असे संशोधन करण्यासाठी एनआयडीसीआर संस्थेकडून हे पुरस्काररूपातील अनुदान दिले जात असते.

डिसिल्वा या बीडीएस, एमएसडी व पीएच.डी. आहेत. रोगनिदानशास्त्राच्या ख्यातनाम प्राध्यापक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्याच्या जोडीला त्या कर्करोग जीवशास्त्रज्ञही आहेत. मिशिगन विद्यापीठातील कर्करोग संशोधन केंद्राच्या त्या सदस्य असून त्यांनी बायोमार्कर्स व रेणवीय रचनांच्या माध्यमातून कर्करोगाच्या गाठीची वाटचाल कशी होते व उपचारांना कर्करोग का दाद देत नाही यावर संशोधन केले आहे. त्यांना यापूर्वी मौखिक आरोग्य, रोगनिदान संशोधन यात रॉड कॉसन पुरस्कार मिळाला होता व विज्ञान- अभियांत्रिकी क्षेत्रातील कामगिरीसाठी क्रॉसबी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दंतवैद्यकात त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली. नंतर त्या अमेरिकेला गेल्या. तेथे इंडियाना विद्यापीठातून पीएच.डी. केली. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या संशोधनातून जे फलित हाती येईल त्यातून मान व डोक्याच्या कर्करोगावर प्रभावी उपचार कालांतराने शक्य होतील यात शंका नाही.

वैद्यकातीलच एका शाखेकडून दुसऱ्या शाखेकडे त्या वळल्या आहेत, तरी त्यांनी मौखिक आरोग्यासाठीच्या दंतवैद्यकाकडेही दुर्लक्ष केलेले नाही. सामान्य लोकांचे दंतआरोग्य सुधारण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले; त्या विषयातील एका अध्यासनाच्या त्या सहप्रमुख आहेत. कर्करोगाच्या पेशी शरीरात नेमक्या कशा पद्धतीने काम करतात याचे कोडे उलगडले तर त्यावर उपचार करण्यासाठी कुठल्या प्रकारची वैद्यकीय पद्धत वापरायची हे ठरवता येते, त्यावरच त्यांच्या संशोधनाचा भर आहे.