चित्रपटसृष्टीत प्रत्येकाच्या वाटेला यशापयश येतच असते. एखाद्या निर्मात्याचे सर्वच चित्रपट लोकप्रिय होत नाहीत. तेलुगू चित्रपट निर्माते एडिडा नागेश्वर राव हे त्याला अपवाद होते. त्यांनी केलेले सर्वच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. रंगभूमी कलाकार, चित्रपट अभिनेते व निर्माते अशी त्यांची ओळख होती. त्यांचे नुकतेच निधन झाले.

त्यांचा ‘शंकराभरणम’ हा चित्रपट सर्वात जास्त गाजला होता. ‘सिरी सिरी मुवा’ हा पहिला चित्रपट त्यांनी १९७८ मध्ये काढला. तो यशस्वी ठरला, ते सातत्य त्यांनी कायम ठेवले. दिग्दर्शक के. विश्वनाथ यांच्यासमवेत त्यांनी ‘पूर्णोदय मुव्ही क्रिएशन्स’ ही कंपनी स्थापन केली होती. तयारम्मा बंगरय्या (१९७९), शंकराभरणम (१९७९), सीताकोका चिलुका (१९८१), सागरसंगमम (१९८३), सितारा ( १९८४), स्वामिमुत्यम (१९८६), स्वयमकृषी (१९८७), अपटबंधवुडू (१९९१) हे चित्रपट त्यांनी केले; त्यात ‘शंकराभरणम’सह चार चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यांच्या निवासस्थानाचे नावही ‘शंकराभरणम निवास’ असेच होते.

राव यांचा जन्म २४ एप्रिल १९३४ रोजी पूर्व गोदावरी जिल्हय़ात कोठा पेटा येथे झाला. त्यांचे शिक्षण पीठापूरम राजा महाविद्यालयात झाले, तेथेच त्यांनी प्रथम नाटय़ क्षेत्रात पदार्पण केले. त्यांचे मित्र व्ही. बी. राजेंद्र प्रसाद, हरनाथ राजू यांनी त्यांना नाटय़ क्षेत्रात येण्यास उत्तेजन दिले. या तिघांनी ‘राघव कला समिती’ स्थापन करून १९५० च्या सुमारास ‘एनजीओ’, ‘कप्पालू’ यांसारखी नाटके सादर केली. त्यानंतर व्ही. बी. राजेंद्र प्रसाद चित्रपटसृष्टीत आले व नंतर त्यांनी नागेश्वर राव यांनाही चंदेरी दुनियेचा दरवाजा खुला केला. राव यांनी १९६२ मध्ये ‘आराधना’ चित्रपटात पहिली भूमिका केली, पण त्यांचे मन अभिनयात रमले नाही. १४ वर्षांत १० चित्रपटच त्यांनी केले, पण रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. त्यांचा ‘स्वातीमुटायम’ हा चित्रपट परदेशी चित्रपट गटात ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. ‘सिरी सिरी मुवा’ व ‘स्वातीमुटायम’ हे दोन चित्रपट मॉस्को चित्रपट महोत्सवात दाखवले गेले होते. के. विश्वनाथ दिग्दर्शित ‘शंकराभरणम’ या चित्रपटाने त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. त्या चित्रपटात त्यांनी शिशुर्वेत्ति पशुर्वेत्ति गानरसं फणि.. या सुभाषिताने सुरुवात केली आहे. लहान बाळापासून प्राण्यांपर्यंत सर्वानाच संगीत प्रिय असते असा त्याचा मथितार्थ. कर्नाटकी संगीताने झपाटलेले शंकरशास्त्री नावाचे गायक संगीताची जीवनधारा या चित्रपटात एका कथेच्या माध्यमातून चित्ररसिकांसमोर उलगडतात. त्यांच्या निधनाने टॉलीवूडचे मोठे नुकसान झाले आहे.