गेल्या चार दशकांपासून राजकारणात सक्रिय असलेले आणि तत्त्वासाठी प्रसंगी पक्षनेतृत्वाशी वाद विकत घेणारे बनवारीलाल पुरोहित यांना राज्यपालपद देऊन भाजपने तब्बल १८ वर्षांनंतर त्यांचा सन्मान केला आहे.

सार्वजनिक जीवनात ‘बाबूजी’ या टोपणनावाने ओळखले जाणारे पुरोहित मूळचे नागपूरचे. विद्यार्थिदशेपासून स्वतंत्र विदर्भासाठीच्या चळवळीत सक्रिय असलेल्या या नेत्याने राजकारणाचे प्रारंभिक धडे काँग्रेसमध्ये गिरवले. १९७८ ला ते पूर्व नागपुरातून आमदार झाले व नंतर त्यांनी मागे वळून बघितलेच नाही. राज्याच्या राजकारणात असताना राज्यमंत्रिपद भूषवणाऱ्या पुरोहितांना काँग्रेसने लोकसभेत संधी दिली. या पक्षाकडून दोनदा खासदार झालेल्या पुरोहितांनी १९९१ मध्ये राममंदिराच्या मुद्दय़ावर पक्षत्याग केला व भाजपत जाण्याचा निर्णय जाहीर करून देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच वर्षी झालेल्या निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार झाले, पण राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर नागपूरला मतदान झाल्याने त्यांना अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले, त्यामुळे मंदिराच्या मुद्दय़ावरून ८४ खासदारांचा आकडा गाठणाऱ्या भाजपच्या संसदीय संघात पुरोहितांचाच समावेश होऊ शकला नाही. १९९६ ला ते भाजपचे खासदार झाले. तेव्हा सत्तेत असलेल्या वाजपेयी सरकारशी पुरोहितांनी उभा वाद विकत घेऊन पुन्हा देशाचे लक्ष वेधून घेतले. निमित्त होते भद्रावतीच्या आयुध निर्माणीजवळ खासगी कंपनीला कोळसा खाण देण्याचे. तेव्हा सरकारात क्रमांक दोनच्या स्थानावर असलेल्या प्रमोद महाजनांशी त्यांचा खटका उडाला, पण पुरोहित ही खाण रद्द करण्याच्या मुद्दय़ावर ठाम राहिले व न्यायालयातून त्यांनी हा लढा जिंकला, यामुळे पक्षनेतृत्व पुरोहितांवर नाराज झाले, पण त्यांनी त्याची पर्वा केली नाही. राज्यात युतीचे सरकार असताना अधिक जाडीचे सिमेंट रस्ते तयार करण्यावरूनही त्यांनी सरकारशी संघर्ष विकत घेतला. एकदा निवडणूक हरल्यावर त्यांनी ईव्हीएम मशीनच्या वैधतेलाच सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले व त्यांच्या या याचिकेनंतर या मशीनमध्ये पेपरट्रेल पद्धत सुरू झाली. निवडणूक आयोगाने देशात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू केल्यानंतर उमेदवार व पक्षाचा खर्च वेगवेगळा दाखवून पळवाट शोधण्याचा मुद्दासुद्धा त्यांनी न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून आयोगाच्या निदर्शनास आणून दिला व नंतर कायदाबदल करण्यास भाग पाडले. पुरोहितांची राजकीय कारकीर्द काँग्रेसमधून सुरू झाली असली तरी हिंदुत्ववादाचा पुरस्कार त्यांनी उघडपणे केला.  देशभर गाजलेल्या बोफोर्स तोफांच्या खरेदीविषयीचा पहिला प्रश्न पुरोहितांनी संसदेच्या संरक्षणविषयक सल्लागार समितीत विचारला आणि याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले गेले, अशी आठवण अरुण शौरी यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिली आहे. गोपाळकृष्ण गोखले यांनी सुरू केलेल्या ‘हितवाद’ या इंग्रजी दैनिकाचे संचालन करणारे पुरोहित शैक्षणिक, सामाजिक व क्रीडाक्षेत्रातसुद्धा तेवढेच सक्रिय आहेत.