भारतीय परराष्ट्र सेवेतील कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आणि कोणत्याही पेचातून मार्ग काढण्याची क्षमता असलेल्या मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये विजय गोखले, गौतम बंबवाले आणि अजय बिसारिया यांचा समावेश होतो. केंद्र सरकारने गुरुवारी या सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये फेरबदल केले. ज्येष्ठ अधिकारी आणि भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त गौतम बंबवाले यांची चीनचे राजदूत म्हणून नियुक्ती केली, तर बंबवाले यांच्या जागी अजय बिसारिया यांना पाकिस्तानात पाठवण्यात आले.

या तीनही अधिकाऱ्यांचे परराष्ट्र सचिव जयशंकर यांच्याशी सौहार्दाचे संबंध असल्याने या अधिकाऱ्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. परराष्ट्र खात्यातील आर्थिक संबंधविषयक विभागाचे सचिव म्हणून विजय गोखले यांची नियुक्ती करण्यात आली. चीनचे राजदूत या नात्याने डोकलाममधील परिस्थिती त्यांनी कौशल्याने हाताळली होती. गौतम बंबवाले हे पुण्याच्या गोखले इन्स्टिटय़ूटचे विद्यार्थी.  १९८४ साली भारतीय परराष्ट्र सेवेत प्रवेश त्यांनी प्रवेश केला. जर्मनी, हाँगकाँग, चीन आदी ठिकाणी त्यांनी विविध पदे भूषवली आहेत.  पाकिस्तानचे उच्चायुक्त असताना कुलभूषण जाधव यांच्या अटकेवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमकी झडल्या. जाधव हे निवृत्त नौदल अधिकारी आहेत. आता ते व्यवसाय करीत असून त्यानिमित्ताने ते विविध देशांमध्ये जातात, असे भारताचे म्हणणे होते. तर पाकिस्तानने मात्र जाधव हे भारतासाठी हेरगिरी करतात, असा आरोप सातत्याने केला होता. नंतर जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षाही सुनावली होती. पण आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या माध्यमातून पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर उघड करून जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळाली. या पूर्ण प्रकरणात बंबवाले यांचेही योगदान महत्त्वाचे होते. परराष्ट्र सेवेत रुजू होतानाच प्रत्येक अधिकाऱ्याला कोणती परकीय भाषा शिकण्याची इच्छा आहे ते सांगावे लागते. बंबवाले यांनी तेव्हाच चिनी भाषा निवडली होती. भारत-चीन संबंधांचा त्यांचा गाढा अभ्यास असून त्यांच्या या नियुक्तीने उभय देशांतील संबंध दृढ होण्यास मदतच होईल.

पाकिस्तानात उच्चायुक्त म्हणून जात असलेले अजय बिसारिया हेही परराष्ट्र सेवेच्या १९८४ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. अतिशय बुद्धिमान अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात ब्रजेश मिश्र यांनी त्यांना थेट पंतप्रधान कार्यालयात आणले होते. वाजपेयी यांचे खासगी सचिव व नंतर विशेष अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. संरक्षण, आर्थिक आणि परराष्ट्रविषयक धोरणे ठरवण्यात त्यांनी तेव्हा मोलाची कामगिरी बजावली होती. रशियन भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. मध्य आशियासाठी भारतीय धोरणाची रूपरेषा ठरवण्यात बिसारिया यांची भूमिका महत्त्वाची होती. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांमुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध कायम तणावाचे असतात. अशा काळात बिसारिया यांना आता इस्लामाबादला जावे लागणार आहे. ही नियुक्ती त्यांची सत्त्वपरीक्षा पाहणारीच ठरणार आहे.