नामवंत चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते लेख टंडन यांचे जगणे कलेच्या अंगाने सर्वार्थाने समृद्ध होते. वयाच्या अठ्ठय़ाऐंशीव्या वर्षीपर्यंत निर्मितीपासून ते दिग्दर्शनापर्यंत आणि लेखनापासून ते अभिनयापर्यंत सगळ्या क्षेत्रांत त्यांनी काम केले. त्यांना मृत्यू येईपर्यंत सतत कार्यरत राहता आले, ही त्यांच्यासाठी समाधानाची बाब असेल.

कृष्णधवल चित्रपटाच्या जमान्यापासून ते दूरचित्रवाणी या नव्याने अवतरलेल्या माध्यमापर्यंत टंडन यांनी मुशाफिरी केली. त्यात काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून कलेचा आनंदही मिळवला. वयानुसार काळाच्या पडद्याआड जाता जाता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर येण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यामुळे ‘स्वदेस’, ‘रंग दे बसंती’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या अलीकडच्या चित्रपटांतूनही त्यांचे दर्शन झाले. एवढा कमी काळ पडद्यावर राहूनही ते सगळ्यांच्या लक्षात राहिले, याचे कारण अभिनय आणि दिग्दर्शन ही त्यांची जगण्याची मूलभूत प्रेरणा होती. टंडन तारुण्यात पदार्पण करत असताना भारतीय चित्रपटांची दुनिया बहरत होती. या नव्या माध्यमातून अनेक नवे प्रयोग पडद्यावर साकारत होते. चित्रपट हे माध्यम नवे असले, तरीही त्यात जीव ओतून काही सर्जनशील करण्याच्या प्रयत्नात त्या काळातील, म्हणजे चाळीसच्या दशकातील, अनेक भारतीय कलावंत होते. टंडन यांची जडणघडण या कृष्णधवल चित्रपटयुगात झाली. वडील फकीरचंद टंडन हे पृथ्वीराज कपूर यांचे सहाध्यायी. त्यामुळे भारतीय चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळातील या महत्त्वाच्या कलाकाराकडून चित्रपटक्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळणे स्वाभाविक होते. पण त्यानंतरच्या काळात स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी लेख टंडन यांनी जिवाचे अक्षरश: रान केले. त्यातून ‘प्रोफेसर’, ‘आम्रपाली’, ‘झुक गया आसमान’, ‘प्रिन्स’ असे चित्रपट साकार झाले. दशकानंतर त्यांचे ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’, ‘खुदा कसम’, ‘अगर तुम ना होते’ हे चित्रपट पडद्यावर झळकले आणि लोकांनी त्यांना भरभरून दाद दिली. शम्मी कपूर, राजेंद्रकुमार, शशी कपूर, हेमा मालिनी, शबाना आझमी यांच्यासारख्या कलावंतांना घेऊन त्यांनी दिग्दर्शित केलेले हे चित्रपट त्यामुळे चित्रपटगृहांत बराच काळ टिकून राहिले. ऐंशीच्या दशकात भारतात पदार्पण केलेल्या दूरदर्शन या सरकारी वाहिनीने मनोरंजनाच्या क्षेत्रात हळूहळू बदल करण्यास सुरुवात केली. त्या काळातील चित्रपटक्षेत्रातील अनेकांनी या माध्यमाकडे लक्ष देण्याचे टाळले. पण लेख टंडन यांच्यासारख्या कलावंताला या नव्या माध्यमाचे भान होते. त्यामुळे त्यांनी दूरचित्रवाणीच्या माध्यमातून वेगळे प्रयोग केले. ‘दिल दरिया’, ‘फिर वही तलाश’ यांसारख्या मालिका ही त्यांची निर्मिती त्या काळात खूपच लोकप्रिय ठरली. लेख टंडन यांचे पहिले प्रेम दिग्दर्शनावर होते. अभिनय हा अनुषंगाने जीवनात आलेला भाग होता. त्यामुळे त्यांनी अभिनयासाठी एकाही निर्मात्याकडून कधीच मानधन घेतले नाही. आपल्या जीवनानंदात मश्गूल राहण्यात टंडन यांना अधिक आनंद होता. त्यामुळे चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेत राहूनही सतत चर्चेत राहण्यात त्यांना रस नव्हता. ‘गेले ते दिवस’, असे कढ त्यांनी कधी काढले नाहीत. भारतीय चित्रपटसृष्टीतील सुमारे सहा दशकांमधील सगळी स्थित्यंतरे जवळून पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले. या बदलाच्या काळात त्या क्षेत्रात काम करता आले आणि समाधानही मिळवता आले. शाहरुख खान याच्या दूरचित्रवाणीवरील पहिल्या पदार्पणाचे श्रेय टंडन यांच्याकडे जाते. आपल्या कामात गुंतून राहणे त्यांना अधिक आवडत असे. त्यामुळेच निवृत्तीची भाषा न करताही ते काळाबरोबर राहिले आणि हे सगळे वेगाने होणारे बदल सहजपणे स्वीकारत राहिले. त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महत्त्वाच्या कलावंताचा अंत झाला आहे.