प्रसारमाध्यमांमध्ये अनेक महिला पत्रकारांनी अगदी शोध पत्रकारितेतही नाव कमावलेले आहे, पण नेहमीच्या चाकोरीबद्ध पत्रकारितेच्या परिघाबाहेर काम करणाऱ्या काही पत्रकार आहेत त्यातील एक मालिनी सुब्रमणियम. त्यांना अलीकडेच न्यूयॉर्कचा ‘इंटरनॅशनल प्रेस फ्रीडम’ पुरस्कार जाहीर झाला आहे. संघर्षांत प्रसंगी जीव धोक्यात घालून समाजापर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार दिला जातो. त्यासाठी त्यांची निवड अगदी योग्यच आहे, हे त्यांचे छत्तीसगडमधील बस्तर भागातील काम पाहिल्यानंतर लक्षात येते.

[jwplayer 1G6YlsuX]

२०१६ पर्यंत तरी बस्तर जिल्हा माओवादी व सुरक्षा दले यांच्यातील संघर्षांचा केंद्रबिंदू होता. तेथे पोलीस व सुरक्षा दलांनी महिला व मुलांवर केलेले अत्याचार, कायद्याची चौकट मोडून केलेल्या हत्या अशी प्रकरणे स्क्रोल या संकेतस्थळासाठी माहिती देणाऱ्या सुब्रमणियम यांनी हाताळली. या भागातील पत्रकारिता म्हणजे सुळावरची पोळी आहे, पण तरीही जीव धोक्यात घालून मालिनी यांनी तेथे खरी माहिती बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. त्यात त्यांनी मानवाधिकार उल्लंघन व राजकारण यांचा संबंध जोडून दाखवला. पोलिसांनी त्यांना माओवाद्यांच्या हस्तक संबोधून त्यांचे प्रतिमाहनन केले, पण जगाने मात्र त्यांच्या या कार्याचा सन्मान केला आहे. अनेकदा पोलिसांनी त्यांचे जाबजबाब घेऊन त्यांचा छळही केला पण त्यामुळे त्यांनी हार मानली नाही. नक्षलविरोधी सक्रिय गटाने सुब्रमणियम यांच्या घरासमोर फेब्रुवारी २०१६ मध्ये निदर्शने करताना ‘डेथ टू मालिनी’ अशा घोषणा दिल्या, शेजारच्या लोकांना त्यांच्यावर हल्ला करण्यास भडकावले. मध्यरात्री लोकांनी त्यांच्या घरावर दगडफेक केली, जिथे त्या मुलीसह राहत होत्या. पोलिसांनी सुरुवातीला त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही; नंतर जी तक्रार घेतली ती गुळमुळीत होती. नंतरच्या काळात त्यांच्यावर बस्तर सोडण्याची वेळ आली. बीबीसी प्रतिनिधी व अटक केलेल्या पत्रकारांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनाही पलायन करावे लागले. त्यांच्या ‘द ट्रथ बिहाइंड छत्तीसगड्स रिसेंट माओइस्ट सरेंडर’ या त्यांच्या वृत्ताला ‘आशियन सेंटर फॉर जर्नालिझम’ पुरस्कार मिळाला होता. छत्तीसगडचा फिअरलेस र्पिोटिंग पुरस्कार, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीजचा पुरस्कारही त्यांना मिळाला.

नेहमीची बातमीदारी व प्रवाहाविरोधात जाऊन सत्य सांगण्यासाठी केलेली बातमीदारी यात फरक असतो. सत्य बाहेर काढणे हे पत्रकारितेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रसंगी प्राणावर उदार होणाऱ्या मोजक्या पत्रकारांपैकी एक असलेल्या मालिनी यांची पत्रकारिता साहसाचेच प्रतीक आहे. माझी या पुरस्काराची निवड म्हणजे येथील सरकारवर जगाची नजर असल्याचेच द्योतक आहे, असे मालिनी यांनी म्हटले आहे.

[jwplayer UyWFIua2]