अमेरिकेत रेजेनेरॉन सायन्स टॅलेंट सर्च ही गणित व विज्ञानावर आधारित स्पर्धा १९४२ पासून भरवली जाते.  विज्ञानातील ज्युनियर नोबेल असे या पुरस्काराचे वर्णन केले जाते. विशेष म्हणजे किशोरवयात हा पुरस्कार मिळालेल्यांपैकी १२ जणांना पुढे मोठय़ांसाठीचे खरे नोबेल मिळाले आहे. हा पुरस्कार यंदा तीन जणांना मिळाला असून त्यात पहिला पुरस्कार भारतीय वंशाच्या इंद्राणी दास हिने पटकावला आहे. तिच्या पुरस्काराची रक्कम आहे अडीच लाख डॉलर. म्हणजे भारतीय चलनात १.६३ कोटी रुपये!

इंद्राणी ही न्यूजर्सी येथील असून ती हॅकनसॅक येथील बर्जन अ‍ॅकॅडमीजची विद्यार्थिनी आहे. किशोरवय हे तसे विचार भटकण्याचे वय. बरेच जण या वयात गोंधळात पडतात, पण इंद्राणीचे तसे नाही. तिचे उद्देश व लक्ष्य ठरलेले आहे, ते म्हणजे मेंदूतील क्रियांचे संशोधन. त्यासाठीच तिला हा पुरस्कार मिळाला आहे. मेंदूला मार लागल्यानंतर न्यूरॉनचा ऱ्हास होऊन ते मरतात. न्यूरॉन्स वाचण्याची शक्यता कशी वाढवता येईल यावर तिचे संशोधन आहे. न्यूरॉन म्हणजे मेंदूतील पेशी, त्या अ‍ॅस्ट्रोग्लिऑसिसमुळे मरतात. यात अ‍ॅस्ट्रॉसाइट्स नावाच्या पेशी मेंदूला मार लागल्यानंतर वाढतात, विभाजित होतात व ग्लुटामेटचे ग्रहण करण्याचे प्रमाण कमी होते. खरे तर जास्त ग्लुटामेट हे न्यूरॉन्सना हानीकारक असते. इंद्राणीने उंदरांवरील प्रयोगात असे दाखवले की, अ‍ॅस्ट्रॉसाइटपासून वेगळे काढलेले एक्सोसोम्स तपासले असता ग्लुटामेटचे प्रमाण कमी दिसून आले, त्यामुळे न्यूरॉन वाचण्याची शक्यता वाढते.    इंद्राणीने तीन वर्षांपूर्वी विज्ञान प्रकल्पाबाबत तिच्या शिक्षिका डोना लिओनार्दी यांच्याशी चर्चा केली होती. वैद्यक क्षेत्रातील आव्हान तिला स्वीकारायचे होते. जो रोग बरा होत नाही त्यावर मी उपाय शोधून काढीन, अशी तिची जिद्द. शिक्षिका लिओनार्दी यांनी इंद्राणीला सांगितले की, माझी एक मैत्रीण आहे, तिला घातक रोग असून त्यात मेंदूतील पेशी मरतात. त्यातून इंद्राणीने मेंदूला इजा झाल्यानंतर त्यातील पेशी का मरतात याचे कारण शोधण्याचे ठरवले.

मेंदूत न्यूरॉन्स नावाच्या पेशी असतात. त्याबरोबर अ‍ॅस्ट्रोसाइट्स या पेशीही असतात. त्या जखमी न्यूरॉन्सभोवती फिरत असतात. त्यांनी न्यूरॉन्सचे आणखी नुकसान होऊ नये याची दक्षता घ्यायची असते, पण काही वेळा परिस्थिती बिघडते. या पेशी जखमी न्यूरॉन्सशी संबंधित सिनॅप्सेसमधील रासायनिक कचरा निपटू शकत नाहीत, त्यामुळे न्यूरॉन्स मरतात. कारण हा रासायनिक कचरा न्यूरॉन्सना विषबाधित करीत असतो, त्यामुळे न्यूरॉन्स मरण्याचे प्रमाण वाढते. ग्लुटामेट हा असा रेणू आहे जो मेंदूतील पेशींदरम्यान संदेशवहनाचे काम करतो. मेंदूला जखमा झाल्यास न्यूरॉनच्या बाहेर ग्लुटामेट साठल्याने ते मरतात. त्यावर इंद्राणीने ग्लुटामेटला खेचणारी पोकळी म्हणून काम करणाऱ्या रेणूवर काम सुरू केले. ही पोकळी अ‍ॅस्ट्रोसाइटसवर असते. तिने अ‍ॅस्ट्रोसाइटमध्ये एक जनुक टाकले, त्यामुळे या पेशींनी त्यांची ग्लुटामेट पोकळी त्यांच्या पृष्ठभागावर आणली. त्यामुळे अ‍ॅस्ट्रोसाइट्स पेशींनी आजूबाजूच्या न्यूरॉनला वाचवता यावे यासाठी ग्लुटामेट शोषून घेणे सुरू केले. अपघातात मेंदूला मार लागतो तेव्हा अ‍ॅस्ट्रोसाइट्सवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे तिला वाटते. इंद्राणी ही आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ आहे. मला हे काम करायला आवडते, असे ती सांगते. तिच्या या संशोधनातून मेंदूरोगावर नवीन उपचारांची आशा वाढली आहे.