न्यूजवीकची मालकी बदलली तेव्हा निशीद हाजरी यांना ती संधी वाटली. त्यांनी पत्रकारितेतील चाकोरीबद्ध कामातून बाजूला होऊन पुस्तक लिहिण्याचे ठरवले. त्यात ते कमालीचे यशस्वी झाले, त्यांच्या या पुस्तकाचे नाव मिडनाईट फ्युरीज- द डेडली लीगसी ऑफ इंडियाज पार्टशिन. या पुस्तकाला विल्यम कोल्बी पुरस्कार जाहीर झाला आहे. सीआयएचे माजी संचालक असलेल्या कोल्बी यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो.
हाजरी न्यूजवीकमध्ये काम करीत असताना ते परदेशी घडामोडी विभागाचे संपादक होते व उपखंडातील सर्व माहिती त्यासाठी आवश्यक होतीच. ९/११ नंतरच्या घडामोडीत अफगाणिस्तानात ज्या प्रतिक्रिया उमटत होत्या त्यावर हाजरी यांना बारकाईने लक्ष ठेवावे लागत होते, पण जेव्हा केव्हा गप्पा-चर्चा होत तेव्हा लोक त्यांना नेहमी विचारायचे की, या सगळ्यात पाकिस्तानची भूमिका काय.. लोकांच्या त्या प्रश्नात त्यांना रुची वाटत होती. पाकिस्तान असे का करतो.. तेव्हा भारत व पाकिस्तान यांची फाळणी झाली होती त्याची एक वेगळी गोष्ट आहे, ती तुम्हाला माहिती नाही असे सांगून ते वेळ मारून नेत असत. पण पुढे त्यांनी फाळणीचा अभ्यास करण्याचे ठरवले, आतापर्यंत फाळणीवर जेवढी पुस्तके लिहिली गेली त्यातील एक सर्वोत्तम पुस्तक म्हणून गणले जाईल असे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. निशीद हे सिंगापूरला असतात. त्यांचे कुटुंबीय मूळ मुंबईचे आहेत. भारत-पाकिस्तान यांची फाळणी व आजची परिस्थिती यांचा काही तरी संबंध आहे, त्यामुळे भारत व पाकिस्तानच्या क्रमिक पुस्तकात शिकवली जाते ती फाळणीची कथा तेथून बाहेर काढून जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी हा या पुस्तकामागचा त्यांचा उद्देश. इतिहासाचे पुनल्रेखन करता येते व त्यात अनेक एरवी न दिसणारे दुवे दिसू लागतात तेच निशीद यांनी या पुस्तकातून सांधले आहेत.
हाजरी सध्या ब्लुमबर्ग व्ह्य़ूमध्ये आशियाविषयक संपादक म्हणून काम करतात. सियाटल, हाँगकाँग, नवी दिल्ली व लंडन अशा महानगरांतला त्यांचा प्रवास त्यांना बरेच शिकवून गेला. सध्याच्या स्थितीत फक्त पाकिस्तानी लष्कर व भारतीय वाहिन्या हे दोनच घटक काम करीत आहेत अशी टिप्पणी ते करतात. नेहरूंना अखंड भारत राखण्यासाठी समझोत्याच्या अनेक संधी होत्या, नेहरू व जीना यांच्या व्यक्तित्वात काही साम्यस्थळे होती, तितक्याच टोकाच्या विरुद्ध बाबीही होत्या, अशी निरीक्षणे मांडल्याने त्यांच्या या पुस्तकावर टीका झाली पण त्यापेक्षा जास्त कौतुक झाले. त्यांनी फाळणीला नेहरू व जीना दोघेही जबाबदार होते असे म्हटले आहे. रिइमॅजिनिग इंडिया- अनलॉकिंग द पोटेन्शियल ऑफ आशियाज नेक्स्ट सुपरपॉवर या लेखसंग्रहाच्या संपादनात त्यांचा मोठा वाटा आहे.