सारंगी या वाद्याला एके काळी असलेले सांस्कृतिक महत्त्व पुन्हा प्राप्त करून देणाऱ्या कलावंतांमध्ये पंडित रामनारायण यांचे योगदान फारच मोलाचे आहे. अस्सल भारतीय वाद्य म्हणून सारंगीची साऱ्या देशाला ओळख. ब्रिटिशांनी येथे व्हायोलिन हे वाद्य आणण्यापूर्वी सारंगीने रसिकांच्या मनात घर करून ठेवले होते. दरबारी संगीतात या वाद्याला प्रतिष्ठाही प्राप्त झाली होती. गायक कलावंतांना साथ करण्यासाठी सारंगी हे वाद्य अधिक उपयोगात आणले जाई, कारण या वाद्यातून गळ्याशी साधम्र्य असणारे स्वर येऊ शकतात.
वाजवण्यास अतिशय अवघड परंतु तरीही कानाला अतिशय गोड असणाऱ्या या वाद्यावर रामनारायण यांनी लहान वयातच प्रभुत्व मिळवले. वडील दिलरूबा हे वाद्य वाजवत असत. साहजिकच पहिले धडे त्यांच्याकडून मिळणे स्वाभाविकच होते. वडिलांनी तारांवर बोटे फिरवण्याची स्वत:ची पद्धत विकसित केली होती, पण ती रामनारायण यांच्या मेहबूब खान या गुरूंना मान्य नव्हती. शेवटी आजोबा आणि वडिलांच्या आग्रहावरून शाळेला रामराम करत त्यांनी स्वत:च सारंगीवर स्वार होण्याचे ठरवले. माधव प्रसाद या गायक कलावंताकडे गंडाबंध शिष्य म्हणून तालीम घ्यायला सुरुवातही केली. ध्रुपदानंतर ख्यालाचे शिक्षण मिळाल्याने रामनारायण यांनी या दोन्ही शैलीत स्वत:चे वेगळेपण सिद्ध केले. साथीच्या या वाद्याला स्वरमंचाच्या मध्यभागी विराजमान करण्याचे मोठे कार्य त्यांच्यामुळे घडून आले. भारताबाहेरील जगाला या वाद्याची ओळखही पहिल्यांना त्यांनीच करून दिली. ओंकारनाथ ठाकूर, बडे गुलाम अली खाँ यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर त्यांनी केलेल्या बहारीच्या संगतीमुळे त्यांचे नाव सर्वदूर झाले. पण आपली ओळख संगतकार अशी राहता कामा नये, असा ध्यास घेतल्याने स्वातंत्र्यानंतर त्यांनी थेट मुंबईत येऊन चित्रपटांच्या दुनियेत प्रवेश केला. त्या वेळच्या एचएमव्ही कंपनीसाठी त्यांनी सारंगीच्या तीन रेकॉर्डस् दिल्या आणि त्यांची नवी ओळख पटू लागली. ओ. पी. नय्यर यांचा लाडका वादक अशी त्यांची ख्याती झाली आणि त्यांच्या अनेक गीतांना या सारंगीने चार चाँद लावले. अमेरिका आणि युरोपचा दौरा करून या भारतीय वाद्याला जागतिक संगीतात स्थानापन्न करण्यासाठी रामनारायण यांनी सत्तरच्या दशकात खूप दौरे केले. वाद्यावरील प्रभुत्व आणि त्याला सर्जनशीलतेची जोड मिळाल्यामुळे त्यांचे वादन अभिजाततेच्या दर्जाचे होते. आज वयाच्या नव्वदीतही त्यांचा वादनाचा हुरूप थक्क करणारा आहे. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कारासाठी त्यांची झालेली निवड म्हणूनच सार्थ ठरली आहे. हार्मोनियमच्या आगमनानंतर भारतीय संगीतात मागे पडलेल्या या वाद्याचे पुनरुज्जीवन करून त्याला पुन्हा एकदा दिमाख मिळवून देण्याचे त्यांचे प्रयत्न अभिनंदनीय आहेत. सारंगी या वाद्याशी अतूटपणे जोडल्या गेलेल्या रामनारायण यांना हा पुरस्कार मिळणे भारतीय अभिजात संगीतासाठी म्हणूनच महत्त्वाचे आहे.