भारतातील एका प्रसिद्ध मासिकाने २००० मध्ये पाकिस्तानमधील ‘आयएसआय’ या गुप्तचर संस्थेशी संबंधित असलेल्या नेपाळमधील नेत्यांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये सुशील कोईराला यांचेही नाव होते. कोईराला यांच्यावरील आरोप म्हणजे भारतातील प्रचारतंत्राचा एक भाग आहे, असे गृहीत धरून नेपाळमधील विरोधकांनीही कोईराला यांच्याविरोधात भूमिका घेण्याची हिंमत केली नव्हती. कोईराला नेपाळचे पंतप्रधान होण्यापूर्वीची ही घटना. यावरूनच नेपाळचे आधुनिकतावादी नेते आणि माजी पंतप्रधान सुशील कोईराला याच्या स्वच्छ प्रतिमेचा प्रत्यय येतो.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोईराला यांचा साधेपणा आणि राजकीय जीवनातील त्यांची तत्त्वे यांचा गौरव केला होता. तसेच १९९० ते २०१५ या कालावधीत भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे नेपाळमधील अनेक पंतप्रधान दिल्ली दौऱ्यावर येऊ शकले नाहीत. यामध्ये कोईराला यांचाही समावेश असल्याबाबत मोदी यांनी नाराजी व्यक्त केली होती. नेपाळी काँग्रेसच्या सामाजिक आणि लोकशाही तत्त्वांमुळे प्रभावित झालेल्या कोईराला यांनी १९५४ मध्ये राजकारणात प्रवेश केला. नेपाळी काँग्रेसचे नेते आणि मंत्री तुलसी गिरी यांचे साहाय्यक म्हणून कोईराला यांच्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ झाला. मात्र, गिरी यांच्यासमवेत मतभेद झाल्यामुळे कोईराला यांना साहाय्यकाची जबाबदारी सोडावी लागली. त्याच वेळी नेपाळचे राजे महेंद्र यांनी मंत्रिमंडळ बरखास्त करताना तत्कालीन मंत्रिमंडळाचे नेते बी. पी. कोईराला, सुशील कोईराला यांच्यासह काही नेपाळी काँग्रेसच्या नेत्यांना तुरुंगवास घडविला. त्यानंतर त्यांना नेपाळमधूनही हद्दपार करण्यात आले. या काळात कोईराला यांनी भारतात आश्रय घेतला. १९७३ मध्ये कोईराला आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर नेपाळ एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करून लूट केल्याप्रकरणी भारतात खटला दाखल करण्यात आला होता. हा खटला मागे घेण्यात आल्यावर कोईराला मायदेशी परतले. १९९० मध्ये नेपाळमधील राजसत्ता संपुष्टात आल्यावर १९९१ मध्ये जी. पी. कोईराला यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या हंगामी सरकारमध्ये सुशील कोईराला हे प्रभावशाली नेते ठरले. २००२ मध्ये सुशील कोईराला यांची पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी थोडक्यात हुकली. दरम्यान,२०१० मध्ये ते नेपाळी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यानंतर २०१४ मध्ये कोईराला यांना पंतप्रधानपद मिळविता आले. पंतप्रधानपद मिळाल्यावर भारताशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्यावर त्यांचा भर होता. राज्यघटनेचा पहिला मसुदा जाहीर झाल्यावर नेपाळमध्ये मधेशी समाजाने समान हक्कांच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. दरम्यानच्या काळात कोईराला यांना पंतप्रधानपद गमवावे लागले. मात्र, त्याच वेळी नेपाळमध्ये लोकशाही तत्त्वांनुसार राज्यघटना निर्मितीच्या प्रयत्नांमध्ये कोईराला यांची भूमिका महत्त्वाची होती. कर्करोगाशी लढा देणाऱ्या कोईराला यांचे ९ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे नेपाळने एक उत्तुंग राजकीय व्यक्तिमत्त्व गमावले आहे हे नक्की.