एरिट्रिया हा आफ्रिकेतला एक नगण्य देश. तो गाजतो हुकूमशाही पद्धतीने पत्रकारांवर घातल्या जाणाऱ्या बंधनांमुळेच. अशा देशात २८ ऑक्टोबर १९६४ रोजी जन्मलेले, पुढे स्वीडनचे नागरिकत्व स्वीकारल्यानंतरही पुन्हा मायदेशी परतलेले, पण गेली कैक वर्षे कोणत्याही चौकशीविना कैदेत असलेले पत्रकार दावित इसाक हे अशा लढवय्या पत्रकारांपैकी एक. त्यांना अलीकडेच ‘युनेस्को- गुलिर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम अवॉर्ड’ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

इसाक हे नुसते पत्रकार नाहीत, तर ते नाटककार व लेखकही आहेत. त्यामुळे त्यांच्या या अभिव्यक्तीच्या लढय़ाला अनेक आयाम आहेत. ते १९८७ मध्ये स्वीडनला गेले व तेथील नागरिक बनले. एरिट्रिया स्वतंत्र झाल्यानंतर ते परत आले. ‘सेतित’ या स्वतंत्र वर्तमानपत्राची सुरुवात करण्यात त्यांनी मोठा वाटा उचलला. ते त्या वेळी बातमीदारीही करीत होते. सुधारणावादी आणि अध्यक्ष इसायास अफेवर्की यांच्या संघर्षांत सुधारणावाद्यांची बाजू घेणे, हीच त्यांची ‘चूक’. एरिट्रियन सरकारने त्यांना देशद्रोही ठरवून २००१ पासून तुरुंगात डांबले. त्यांच्यावर खटलाही चालवला गेला नाही. असमारा येथील निवासस्थानातून त्यांना अटक झाली, त्याच वेळी इतर दहा स्वतंत्र पत्रकार व अकरा सुधारणावादी राजकीय नेते यांना पकडण्यात आले. त्यांचा जी १५ गटच सत्ताधाऱ्यांच्या कारवाईत सापडला. मात्र या गटाने कुठलेही हिंसक कृत्य केले नव्हते.

त्यांचे नागरिकत्व स्वीडिश व एरिट्रियन असे दुहेरी असल्याने त्यांच्या सुटकेसाठी स्वीडनने शांततामय राजनयाचे प्रयत्न केले. १९ नोव्हेंबर २००५ रोजी त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले, पण केवळ डॉक्टरांची भेट घेण्यासाठी त्यांना दोन दिवसांचे स्वातंत्र्य दिले होते. पण नंतर परत त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. ते असमारा येथील कारशेली तुरुंगात असावेत असे बोलले जाते. दर आठवडय़ाला रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स व द नॅशनल प्रेस क्लब, स्वीडनचा दूतावास इसाक यांच्या सुटकेची मागणी करतात. दोन लाख नऊ हजार ९०० हून अधिक स्वाक्षऱ्यांची मोहीमदेखील यासाठी झाली. २७ मार्च २००९ रोजी स्वीडनच्या पाच वृत्तपत्रांनी त्यांच्या सुटकेची मागणी पहिल्या पानावर केली.

त्यांचा ठावठिकाणा कुणाला माहीत नाही. एप्रिल २००२ मध्ये ‘कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्स’ या संस्थेने इसाक यांना छळामुळे रुग्णालयात दाखल केल्याचे म्हटले होते. एरिट्रियन सरकारने छळाच्या आरोपाचा इन्कार केला व त्यांची भेट घेण्याची परवानगी कुणालाही दिली नाही. अनेकदा इसाक यांच्या मृत्यूची बातमी पसरवण्यात आली. तुरुंगात असतानाच, त्यांना २००९ मध्ये ‘पेन’ लेखक-संघटनेच्या स्वीडन शाखेने कर्ट-तुकोलस्की स्मृती-पुरस्कार दिला. २०१० मध्ये नॉर्वे या देशातील अभिव्यक्तिस्वातंत्र्य पुरस्कार त्यांना जाहीर झाला. यापेक्षाही प्रतिष्ठेचा पुरस्कार युनेस्कोचा. तो कोलंबियन पत्रकार गुलिर्मो कॅनो इसाझा यांच्या स्मृत्यर्थ १९९७ मध्ये सुरू झाला.  पुरस्कार २५००० डॉलर्सचा असून त्याचा पैसा कोलंबियातील कॅनो फाउंडेशन व फिनलंडचे हेलसिंगिन सनोमत फाउंडेशन देत असते.

प्रत्येक पुरस्कारानंतर जगभरातून इसाक यांना सोडा अशी मागणी होते. पण आम्ही इसाकवर खटला चालवणार नाही व त्याला सोडणार नाही, अशी उर्मट भाषा एरिट्रिया कायम ठेवते. एरिट्रियाशी शांततामय राजनय करणे चुकीचे असून त्यांना खडसावणेच योग्य आहे असे स्वीडिश माध्यमांना वाटते. अल्बानियन अमेरिकन वैमानिक जेम्स बेरिशा यांच्या सुटकेनंतर कोसोवेचे उपपंतप्रधान बेजेट पाकोली यांनी एरिट्रियातून इसाकला सोडवण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यांची सुटका करण्यात  यश आले तरच तो खरा त्यांच्यासाठी पुरस्कार ठरेल.