भारतीय माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपाखाली सुनावलेल्या देहदंडाच्या शिक्षेला नेदरलॅण्ड्समधील द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली. त्या न्यायालयातील १५ न्यायाधीशांपैकी एक नाव होते न्या. दलवीर भंडारी यांचे. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील ते भारतीय न्यायाधीश. या पंधरा न्यायाधीशांची संयुक्त राष्ट्रे आणि त्यांच्या सुरक्षा परिषदेतर्फे ९ वर्षांसाठी नेमणूक होते. भंडारी यांचा सध्याचा कार्यकाल ५ फेब्रुवारी २०१८ रोजी संपत आहे. तत्पूर्वी भारताने या पदावरील फेरनियुक्तीसाठी त्यांचे पुन्हा नामांकन जाहीर केले आहे. पण न्या. भंडारी यांची ही एकमेव ओळख नव्हे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कामकाजात भाग घेताना त्यांनी ११ महत्त्वाच्या खटल्यांत त्यांचे स्वतंत्र मत व्यक्त केले आहे. त्यात सागरी हद्दीचे वाद, अंटाक्र्टिकामधून व्हेलची शिकार, कॉन्टिनेंटल शेल्फची पुनर्रचना, आण्विक नि:शस्त्रीकरण, दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा आणि देशांच्या सार्वभौम अधिकारांचे उल्लंघन अशा विषयांवर महत्त्वाचे निकाल दिले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी जसा आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे तसाच भारतीय न्यायव्यवस्थेवरही त्यांची मोठी छाप आहे. त्यांच्या निर्णयांमुळे देशाच्या अनेक क्षेत्रांत बदल घडून आला आहे. भंडारी यांनी केलेल्या सूचनेमुळे १९५५ च्या हिंदू विवाह कायद्यात सुधारणा होऊन नात्यांतील सुधारणेपलीकडील दुरावा हा घटस्फोटासाठी पायाभूत घटक मानला जाऊ लागला. त्यांनी दिलेल्या निकालामुळेच दारिद्रय़रेषेखालील घटकांना सरकारकडून मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात वाढ झाली, देशभरात बेघर मुलांसाठी रात्रीचे निवारे उभारण्यात आले. बालकांना मुफ्त आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याच्या अधिकारासंबंधी पायाभूत निर्णय त्यांनी दिले होते. त्यामुळेच देशभरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये मुलांसाठी प्राथमिक सुविधा निर्माण करण्यात आल्या.

भंडारी यांच्या कुटुंबात वकिलीची मोठी परंपरा आहे. त्यांचे आजोबा बी. सी. भंडारी आणि वडील महावीर चंद भंडारी हे राजस्थानच्या बारचे सदस्य होते. दलवीर बंडारी यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४७ चा. राजस्थानमधील जोधपूर विद्यापीठातून त्यांनी मानव्यशास्त्र आणि कायद्याची पदवी घेतली. १९६८ ते १९७० या काळात त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयात वकिली केली. अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल येथून कायद्यातील पदव्युत्तर पदवी मिळवली. शिकागो येथे काही काळ वकिलीही केली.

अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांनी १९७३ ते १९७६ या काळात राजस्थान उच्च न्यायालयात वकिली केली. १९७७ साली ते दिल्ली उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी गेले. या क्षेत्रातील २३ वर्षांच्या अनुभवानंतर १९९१ साली त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नेमणूक झाली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. ऑक्टोबर २००५ मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली. तेथील उल्लेखनीय कामगिरीनंतर भंडारी यांची १९ जून २०१२ रोजी द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात निवड झाली. इंटरनॅशनल लॉ असोसिएशनच्या भारतीय शाखेचे कार्यकारी सदस्य म्हणून भंडारी यांची १९९४ सालापासून निवड झाली. २००७ साली त्यांची इंडिया इंटरनॅशनल लॉ फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. अद्याप ते पद त्यांच्याकडे आहे.

भंडारी यांना २०१४ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कर्नाटकामधील टुमकूर विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी बहाल केली आहे. कोटा येथील वर्धमान महावीर ओपन युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी बहाल केली आहे.