सामान्य व अभिजन वर्गात ज्यांच्या चित्रपटांना मान्यता मिळाली होती, ते कन्नड चित्रपट निर्माते किक्केरी शमाण्णा लक्ष्मीनरसिंहा स्वामी यांच्या निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीतील चतुरस्र व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांची ओळख निर्माते एवढीच नव्हती तर ते अभिनेते, दिग्दर्शक तसेच पाश्र्वगायकही होते. ते ‘रावी’ या लाडक्या नावाने ओळखले जात होते.
तत्कालीन म्हैसूर संस्थानातील किक्केरी (जि. मंडय़ा) येथे १९३८ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. म्हैसूर विद्यापीठातून ते विज्ञान विषयात पदवीधर झाले पण नंतर म्हैसूरच्या दसरा महोत्सवातील सांस्कृतिक प्रदर्शनांमध्ये काम करीत असताना त्यांची पावले कलेकडे वळली. छोटय़ा व मोठय़ा पडद्यावरील एक उत्साही व प्रेक्षकांना प्रिय असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची चित्रपट कारकीर्द जी. व्ही. अय्यर व एम. आर. विठ्ठल यांचे सहायक म्हणून कमी वयातच सुरू झाली होती. १९६६ मधील ‘थोगुडीपा’ हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. त्यांनी ३७ चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. त्यांचे गांधीनगरा, भाग्य ज्योती, मलय मरूथा हे चित्रपट यशस्वी ठरले. जंबो सावरी या चित्रपटाने त्यांना नाव मिळवून दिले, या चित्रपटास उत्कृष्ट बाल चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांना डॉ. बी. सरोजादेवी राष्ट्रीय पुरस्कार व पद्मभूषण सन्मान मिळाला होता. गायक म्हणून त्यांचे ‘सुर्यागू चंद्रांगू’ हे ‘शुभमंगल’ चित्रपटातील गाणे गाजले. ‘सँडलवूड’ चित्रपटसृष्टीतील (कन्नड चित्रपट सृष्टी) किमान ५० वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी चित्रपटांमध्ये अनेक प्रयोग केले, त्यांनी दोन्ही प्रकारचे चित्रपट केले असले, तरी अभिजात चित्रपटांनी त्यांना यशाच्या शिखरावर नेले होते. त्यांच्या लग्न पत्रिके, गांधीनगरा, ड्रायव्हर हनुमंथा, हुली हेज्जे या चित्रपटांना प्रेक्षकांची दाद मिळाली. सरतेशेवटी ते अद्वैत वेदान्ताचे पुरस्कर्ते आदि शंकरा यांच्यावर ‘श्रीशंकरा दिग्विजयम’ ही मालिका तयार करीत असतानाच त्यांचे निधन झाले, त्यांनी कन्नड दूरचित्रवाणीवर वैशाली कसारवल्ली दिग्दर्शित मूडाला माने व मुथिना थोराना या दोन गाजलेल्या मालिकांत मुख्य भूमिका केल्या होत्या. त्यांचा पार्थिवदेह एम. एस. रामय्या या बंगळुरूतील रुग्णालयात दान करण्यात आला तर डोळे नारायण नेत्रालयास दान करण्यात आले. मृत्यूनंतरही त्यांनी मोठे सामाजिक कार्य केले आहे.
या सगळ्या वाटचालीत त्यांच्या सहधर्मचारिणी असलेल्या अभिनेत्री बी. व्ही. राधा यांनी त्यांना मनापासून साथ दिली, त्यामुळेच ते यशाची शिखरे पादाक्रांत करू शकले.