आपण एखाद्या गोष्टीवर बरीच चर्चा करीत असतो, पण संशोधनात भावनेच्या आहारी जाऊन चालत नाही तेथे तुम्हाला तथ्यच मांडावे लागते, असे प्रसिद्ध िहदी साहित्यिक व समीक्षक डॉ. कमल किशोर गोयंका म्हणतात, ते खरेच आहे. कारण एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर संशोधन करून सत्य माहिती सांगण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात. अलीकडेच गोयंका यांना बिर्ला फाऊंडेशनचा व्यास सन्मान प्रदान करण्यात आला. डॉ. गोयंका हे िहदीत प्रेमचंदतज्ज्ञ म्हणूनच ओळखले जातात. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून िहदीत एमए व नंतर प्रेमचंद यांच्यावरील संशोधनातून पीएच.डी. या पदव्या घेतल्या आहेत.
त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे ११ ऑक्टोबर १९३८ रोजी झाला. साहित्य अकादमीच्या प्रेमचंद ग्रंथावली संपादनात गोयंका यांचा मोठा वाटा आहे. ‘प्रेमचंद की कहानियों का कालक्रमानुसार अध्ययन’ या त्यांच्या ग्रंथाला व्यास सन्मान मिळाला आहे. प्रेमचंद यांच्या कथा वाचल्या तर ते आíथकदृष्टय़ा गरीब होते असा समज होतो, पण तो गोयंका यांनी पुराव्यानिशी खोडून काढला आहे. डॉ. गोयंका यांनी प्रेमचंद विश्वकोशाचे एकूण पाच खंड लिहिण्याचे काम हाती घेतले असून त्यातील दोन लिहून पूर्ण केले आहेत. प्रेमचंद यांच्या जीवनाचे त्यांच्याइतके साक्षेपी संशोधन कुणीही केलेले नाही. विशेष म्हणजे त्यांच्याकडे प्रेमचंद यांची सगळी मूळ कागदपत्रे (प्रेमचंद अनेकदा उर्दू लिपीमध्ये लिहीत), रोजनिशी, बँक पासबुक इतर ३००० वस्तू आहेत. गोयंका यांनी एकंदर ५०पेक्षा अधिक पुस्तके लिहिली वा संपादित केली असून त्यांनी हायकू प्रकारात िहदीतून काव्यरचनाही केल्या आहेत. गोयंका हे संघपरिवाराशी जवळचे असले तरी अन्य विचारसरणीच्या लोकांशी त्यांचे वैचारिक आदानप्रदान सुरू असते. स्वत:त बदल घडवणे हे विद्रोहापेक्षा कठीण असते, असे सांगणाऱ्या प्रेमचंदांच्या भारतीयतेचा अभ्यास करतानाच, गोयंकांनी अनिवासी भारतीयांपकी ४४ कथाकारांच्या कथांचा संग्रहदेखील संपादित केला आहे. गोयंका यांच्यावर एक आरोप अनेकांनी केला आहे की, त्यांनी प्रेमचंद यांना िहदुत्ववादी बनवले, प्रेमचंदांनी मुलीच्या लग्नात हुंडा दिला होता असा शोध गोयंकांनी लावून त्यांची सुधारकी प्रतिमा मलिन केली. पण या गोष्टींमुळे प्रेमचंद हे कथा-कादंबरी सम्राट होते या त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होत नाही, असे उत्तर गोयंका यांनी दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamal kishor goenka profile
First published on: 25-09-2015 at 00:40 IST