जागतिक बॅडमिंटन क्षेत्रात एके काळी चीनची मक्तेदारी होती. अन्य देशांमधील खेळाडू त्यांना दबकून असत. मात्र गेल्या सात-आठ वर्षांमध्ये परिस्थिती बदलली आहे. आता चीनचेच खेळाडू अन्य देशांच्या खेळाडूंचा धसका घेऊ लागले आहेत. या कालावधीत भारताच्या अनेक खेळाडूंनी जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण केला आहे. प्रकाश पदुकोन व पुल्लेला गोपीचंद यांनी ऑल इंग्लंड स्पर्धेसारखी प्रतिष्ठेची स्पर्धाजिंकून आपल्या देशात अपेक्षेइतके बॅडिमटन युग निर्माण करण्यात त्यांना यश मिळाले नव्हते. मात्र सायना नेहवाल हिने ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदकांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धामध्ये विजेतीपदे मिळविली. केवळ बॅडमिंटनमधील नव्हे तर अन्य खेळांमधील नवोदित खेळाडूंसाठी ती प्रेरणास्थान झाली. तिच्याकडून स्फूर्ती घेत बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू, अजय जयराम, एच. एस. प्रणोय, आर. एम. व्ही. साईप्रणीत, पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत यांच्यासह अनेक खेळाडूंनी गेल्या सात वर्षांमध्ये जागतिक स्तरावर आपला ठसा उमटविला आहे.

गोपीचंद यांच्या अकादमीत सराव करणाऱ्या श्रीकांत याने नुकतीच इंडोनेशियन सुपरसीरिज स्पर्धा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ग्रां. प्रि. सुवर्णचषक, सुपरसीरिज प्रीमिअर व सुपरसीरिज अशा तीनही स्पर्धा जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. श्रीकांत याने आपला मोठा भाऊ नंद गोपाळ याच्याकडून प्रेरणा घेत बॅडमिंटनमध्ये करिअर करण्यास सुरुवात केली. गोपाळ याला अपेक्षेइतके एकेरीत यश मिळाले नसले तरीही त्याने दुहेरीत घवघवीत यश मिळविले आहे. श्रीकांत याची कारकीर्द घडविण्यात त्याचाही सिंहाचा वाटा आहे. श्रीकांत याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आशियाई, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद, राष्ट्रकुल युवा स्पर्धा आदी अनेक स्पर्धामध्ये पदकांची लयलूट केली आहे. ही पदके मिळविताना त्याने ऑलिम्पिक व विश्वविजेता लिन दान याच्यासह जागतिक क्रमवारीतील अव्वल दर्जाच्या अनेक खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला आहे. तसेच त्याने भारतास सांघिक स्पर्धामध्ये चमकदार यश मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये सनसनाटी विजय नोंदवीत असले तरीही ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ते विनाकारण मानसिक दडपण घेतात. श्रीकांत याच्याबाबतही असेच घडले आहे. खुद्द त्यानेच याबाबत कबुली दिली होती. रिओ येथे गतवर्षी झालेल्या स्पर्धेत त्याला पदक मिळविण्यात अपयश आले. ऑलिम्पिकचे वातावरण खूप वेगळे असते. चीन, मलेशिया, इंडोनेशिया आदी देशांचे खेळाडू तेथील लढती खूप गांभीर्याने घेताना मनोधैर्य उंच राहील याची काळजी घेत असतात. हा अपवाद वगळता श्रीकांत याने अन्य स्पर्धामध्ये सकारात्मक वृत्ती व भक्कम आत्मविश्वास ठेवीत सर्वोच्च यश मिळविले आहे. संयमी वृत्ती हा त्याचा स्थायीभाव आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूला पाठीराख्यांकडून सतत प्रोत्साहन मिळत असले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याची वृत्ती श्रीकांत याच्याकडे आहे. यंदाच्या मोसमात त्याला सिंगापूर ओपन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आपण तेथे विजेतेपद मिळवू शकलो नाही याची खंत मनात ठेवीत त्याने या सामन्याचा बारकाईने अभ्यास केला. आपल्या खेळातील चुका कशा कमी होतील याचाच त्याने विचार केला. त्या आत्मपरीक्षणाचा फायदा त्याला इंडोनेशियन सुपरसीरिजमध्ये विजेता होण्यासाठी झाला. आगामी जागतिक स्पर्धेपूर्वी हे विजेतेपद त्याच्यासाठी खूप प्रेरणादायक आहे. आपण जागतिक स्तरावर जिंकू शकतो असा आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण झाला आहे. जागतिक स्पर्धेतही त्याने विजेतेपद मिळवावे व ऐतिहासिक कामगिरी करावी अशीच त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.