अमेरिकेच्या नासा या अंतराळ संस्थेने १९६९ ते १९७२ या काळात ज्या चांद्रमोहिमा राबवल्या, त्यात अपोलो १७ ही शेवटची मोहीम. या मोहिमेत अवकाशवीरांमध्ये एक भूगर्भशास्त्रज्ञही सहभागी होते. त्यांचे नाव जॅक श्मिड. त्यांना चंद्रावर गेल्यानंतर नेमक्या कुठल्या बाबी तपासायच्या याचा सल्ला देणाऱ्यांमध्ये प्रा. लॅरी (लॉरेन्स) टेलर यांचा समावेश होता. एक प्रकारे पडद्याआड राहूनही महत्त्वाचे काम करणारे ते संशोधक. चंद्रावरच्या धुळीवर आतापर्यंत जे संशोधन झाले त्यामागचे प्रेरणास्थान असलेल्या टेलर यांचे नुकतेच निधन झाले.

टेनेसी विद्यापीठाच्या ग्रहीय भूगर्भविज्ञान संस्थेचे ते संचालक होते. चंद्रावरची धूळ ही पिठासारखी अगदी बारीक, पण तेवढीच रखरखीत, त्यामुळे अवकाशवीरांना ‘ल्यूनर हे फीवर’ या समस्येला तोंड द्यावे लागते. चंद्रावरील धुळीची वादळेही तेथे पोहोचलेल्या अवकाशयानांना हानीकारक होती, त्यामुळे त्या वेळी लॅरी टेलर यांनी दिलेले सल्ले फार मोलाचे ठरले होते. अपोलो १७ मोहिमेत जेव्हा हॅरिसन ऊर्फ जॅक श्मिड व जीन केरनन हे चंद्रावर उतरले, तेव्हा ही धूळ स्पेससूटमध्ये साठल्याने त्यांना हातपाय हलवणेही जड जात होते. या समस्येवर लॅरी टेलर यांनी डस्ट सकर म्हणजे धूळशोषक उपकरणे तयार केली. या धुळीत लोह असल्याने चुंबकांचा वापर करून ही धूळ ओढून घेता येते, हे टेलर यांनी प्रथम सांगितले. आता अजूनही चंद्राचे मानवाला असलेले आकर्षण संपलेले नाही. त्यामुळे कधी तरी चांद्रमोहिमा सुरू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, त्या वेळी स्पेससूट व इतर यंत्रणा तयार करताना टेलर यांच्या संशोधनाचा उपयोग होणार आहे.

टेलर हे मूळचे न्यूयॉर्कचे. त्यांनी रसायनशास्त्रात पदवी तर भूगर्भशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली होती. वॉशिंग्टनच्या कार्नेगी संस्थेच्या भूभौतिक प्रयोगशाळेत असताना त्यांनी मोलाचे संशोधन केले. जर्मनीत, हायडेलबर्गच्या मॅक्स प्लांक संस्थेत काम केल्यानंतर ते दोन वर्षे परडय़ू विद्यापीठात प्राध्यापक होते. चंद्रावरून जे खडक व धुळीचे नमुने पृथ्वीवर आणले गेले तो त्यांच्या संशोधनाचा विषय होता. चंद्रावर शेवटी गेलेले श्मिड यांच्याशी त्यांची चांगली मैत्री होती. नासाच्या मदतीने टेलर यांना चंद्रावरील खडक व मातीचे नमुने मिळत गेले व ‘मी संशोधन करीत गेलो, त्यामुळे मी खरोखर ‘ल्युनॅटिक’ (चंद्रवेडा) बनलो’ असे ते गमतीने सांगत.

अलीकडे त्यांनी उल्कापाषाणांचे संशोधन सुरू केले होते. अंटाक्र्टिक व विषुववृत्तीय वाळवंटात सापडलेले उल्कापाषाण त्यांना संशोधनासाठी देण्यात आले होते. या भागात चंद्र व मंगळावरून पडलेले उल्कापाषाण सापडले. त्यातून त्यांच्या ग्रहीय खनिज व भूरचनेबाबत माहिती मिळणे सोपे झाले. सायबेरियातील याकुटिया येथे काही खडक सापडले; त्यापासून हिरे तयार करता येतात, याबाबतही त्यांचे संशोधन होते. त्यातून हिऱ्यांची उत्पत्ती किंवा मूळ कशात आहे यावर प्रकाश पडतो. ग्रहीय भूगर्भशास्त्र संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी केलेले कामही मोलाचे होते. नासापुरस्कृत योजनांतून सहा ते बारा वयोगटातील १० ते १२ हजार विद्यार्थ्यांना आकाशदर्शन व इतर कार्यक्रमांत त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी एकूण ३०० शोधनिबंध लिहिले. एकूणच लॅरी टेलर यांनी चांद्रमोहिमेत पडद्याआडून पार पाडलेली भूमिका व पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राच्या अभ्यासात महत्त्वाची आहेच, शिवाय त्यातून पृथ्वी व चंद्रावरील खनिजे तसेच इतर साम्यस्थळांबाबत नवीन माहिती हाती आली आहे. त्यांच्या निधनाने एक व्यासंगी संशोधक काळाच्या पडद्याआड गेला आहे.