मुंबईत राहायचे असेल तर तुम्हाला किमान विनोदबुद्धी हवी, सहनशक्ती हवी अन् आशावाद तर नक्कीच हवा, असे म्हणतात. भारतीय उद्योगपतीशी विवाहानंतर ब्रिटनमधून भारतात आलेल्या या महिलेच्या ठायी हे तीनही गुण आहेत, त्याच्या जोडीला या महिलेची ओळख आहे ती म्हणजे संवेदनशील मन, त्यातून उपजतच असलेली समाजसेवेची वृत्ती. सचिन तेंडुलकरच्या सासूबाई ही त्यांची आणखी वेगळी ओळख. त्यांना अलीकडेच ‘मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर’ म्हणजे ‘एमबीई’ हा सन्मान जाहीर झाला आहे. त्यांचे नाव अ‍ॅनाबेल मेहता. त्या ब्रिटिश नागरिक आहेत. लंडन येथे या वर्षी त्यांना बकिंगहॅम पॅलेस येथे हा सन्मान प्रदान केला जाईल.

अ‍ॅनाबेल यांनी मुंबईत ‘अपनालय’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून वंचित समाजातील लोकांसाठी मोठे काम केले आहे. समाजसेवेचे हे असीधारा व्रत त्यांनी चाळीस वष्रे अखंडपणे अंगीकारले आहे. गटारींच्या बाजूने घाणेरडे वास येत असताना, सगळीकडे घाणीचे साम्राज्य असताना एका उच्चभ्रू कुटुंबातील महिला तेथे जाते, लोकांना मदतीचा हात देते, हे सगळेच विलक्षण; पण कुठलाही अभिनिवेश न बाळगता मेहताबाईंनी ही सामाजिक जबाबदारी खांद्यावर घेतली. मुंबईच्या झोपडपट्टय़ांतील गरीब, गरजू लोकांच्या हक्कांसाठी त्या लढत आहेत. अ‍ॅनाबेल १९६६ मध्ये प्रथम मुंबईत आल्या, तेव्हा लोकसंख्या असावी चार कोटींच्या आसपास. सगळीकडे गोंगाट, अस्ताव्यस्त पसरलेले शहर, पण तरी त्यांना यातच आपले जीवनध्येय सापडले. त्या सांगतात की, सामाजिक कार्यातून मुंबईच्या झोपडपट्टय़ांतील अपंग मुलांसाठी काही तरी काम करता येईल असे तेव्हापासून वाटत होते. अपंगत्व हे पूर्वजन्मीचे पाप असावे असे लोक मानतात व मुलांना उभे करण्याची जिद्द सोडून देतात. मेहताबाईंनी या झोपडपट्टय़ांमधील लोकांना ती दिली. तेथील अनेक मुलांना हृदय शस्त्रक्रिया, इतर वैद्यकीय उपचारांसाठी मदत आवश्यक असते, मेहताबाईंनी ती मिळवून दिली. त्यांच्यावर मायेची पाखर घातली. अ‍ॅनाबेल यांचा जन्म बìमगहॅम येथे १९४० मध्ये झाला.  लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी ‘समाज प्रशासन’ या विषयात पदवी घेतली. तेथेच त्यांना आनंद मेहता यांच्या रूपात आयुष्यातील जोडीदार मिळाला. ब्रिटनमध्येही त्या ब्रायटन येथे मुलांसाठी बालगृह चालवत होत्या. साऊथ लंडन कौन्सिलमध्येही त्यांनी काम केले. मुंबईत त्यांच्या कामाची सुरुवात झोपडपट्टीतील गरीब मुलांच्या शिक्षण व आरोग्य तपासणीसाठी एका केंद्राच्या स्थापनेतून झाली, नंतर त्याचा वटवृक्ष होऊन ‘अपनालय’ अस्तित्वात आले. आज ते अनेक वंचित मुलांसाठी देवालय ठरले आहे.

जेव्हा सचिन व अंजलीचा विवाह झाला तेव्हा अंजलीने आईला विचारले होते की, एक मूल पुरस्कृत करायला किती पसे लागतात, त्यानंतर सचिनने अपनालयच्या किमान दोनशेहून अधिक मुलांना पुरस्कृत केले आहे.  एकीकडे खूप श्रीमंती, तर दुसरीकडे दारिद्रय़ अशा टोकाच्या परिस्थितीत अपनालयने केलेले काम संस्मरणीय आहे. अंजलीचा सचिनशी विवाह होण्याच्या आधी मेहताबाईंना क्रिकेटमध्ये मुळीच रस नव्हता, पण नंतर क्रिकेटचा देवच जावई झाल्यानंतर क्रिकेट ही त्यांची आवड ठरली. देवनार कचरा डेपोच्या बाजूला असलेल्या शिवाजीनगर झोपडपट्टीत त्यांनी अपनालयाच्या माध्यमातून २५ वष्रे काम केले. तेथे आरोग्य, शिक्षण, रोजीरोटी या सगळ्या प्रश्नांवर त्यांच्या संस्थेने काम केले. त्यांनी केवळ मिरवण्यासाठी समाजसेवा केली नाही तर ती त्यांची स्वप्रेरणा होती. त्यातून भारत व ब्रिटन यांच्यात एक वेगळेच नाते निर्माण झाले आहे. ‘गिव्ह इंडिया’ या ऑनलाइन डोनेशन संस्थेच्या मंडळावरही अ‍ॅनाबेल मेहता यांनी मुंबईच्या झोपडपट्टय़ांतील वंचितांसाठी दिलेले योगदान अजोड आहे यात शंका नाही.