जगभरच्या सिनेमासृष्टीत नुसतेच तोंडदाखल अभिनेते-कलावंत आणि जातीचे कलावंत असा भेद नेहमीच होतो. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना कैफात आणि नसताना त्यासाठी हपापलेल्या अवस्थेत सतत असमाधानाच्या टोकावर जगणाऱ्या नटसम्राटयुगात डॅनियल डे लुईससारखे अस्सल जातिवंत कलावंत विरळाच. परवा त्यांचे नाव समाजमाध्यमांवरून मोठय़ा प्रमाणात कौतुकले जाण्याचे कारण ठरले, त्यांनी अभिनय क्षेत्रातून साठाव्या वर्षी घेतलेल्या निवृत्तीचे. आधीच कमी चित्रपटांतील भूमिका घ्यायच्या, त्या भूमिकांचा सूक्ष्मलक्ष्यी अभ्यास करून त्या जिवंत करायच्या आणि चित्रपटातील भूमिकेची वाहवा केली जाण्याचा काळ अलिप्त अवस्थेत खासगी आयुष्य जगायचे असा चित्रतारकांच्या मूलभूत प्रवृत्तीविरोधात पाडलेला शिरस्ता डॅनियल डे लुईस यांनी आजतागायत पाळला.

पेज थ्री संस्कृती जगभर सोकावली जाण्याच्या काळात मुलाखत आणि छायाचित्रांसाठी गॉसिपशोधक पापाराझींना कायम तरसवणारा हा कलाकार अनेकार्थानी गूढ आहे. गेल्या दोन दशकांत त्याच्या नावावर सहाच सिनेमे आहेत आणि त्यातील दोन भूमिकांसाठी ऑस्कर मिळाले आहे.  डॅनियल डे लुईस यांचे अभिनय संगोपन झाले शेक्सपीअर कंपनीमध्ये. तेथील लोकप्रिय नाटकांत प्रमुख भूमिका करताना एकाएकी आपल्या शरीरात हॅम्लेट शिरल्याची जाणीव झाल्यानंतर तिथली उभरती कारकीर्द सोडून चित्रपटांच्या वाटेला आलेल्या या अभिनेत्याने सुरुवातीला छोटय़ा भूमिका केल्या. रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्या गांधी चित्रपटातही या अभिनेत्याची वर्णी होती. त्यानंतर र्मचट आयव्हरी प्रॉडक्शनच्या चित्रपटांत दखल घेण्यायोग्य भूमिका रचली. नंतर ‘माय लेफ्ट फूट’ या चित्रपटाने १९८९ साली या अभिनेत्याला चक्क ऑस्करच्या दारात नेले. ख्रिस्टी ब्राऊन यांच्या आत्मकथेला पडद्यावर सहजसंयत अभिनयाद्वारे त्यांनी या चित्रपटाद्वारे अजरामर केले. ‘गँग्ज ऑफ न्यूयॉर्क’मधील बिल द बुचर, ‘देअर विल बी ब्लड’ चित्रपटातील डॅनियल प्लेनव्ह्य़ू आणि ‘लिंकन’ चित्रपटातील अब्राहम लिंकन या त्यांच्या भूमिका पाहणाऱ्यांना त्यावर केलेला अभ्यास लक्षात येईल. स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या लिंकन या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांनी वर्षभर १०० हून अधिक पुस्तकांचे वाचन आणि वेषभूषाकारांचे उंबरठे झिजविले. केवळ लिंकन दिसतो तसे तंतोतंत दिसावे, यासाठी या अभिनेत्याने दिग्दर्शकाला अभ्यासासाठी पुरेसा वेळ हवा ही अट घातली. सलग तीन दशके सवरेत्कृष्ट अभिनेत्याच्या भूमिकेसाठी तीन वेळा ऑस्कर मिळविणारे ते एकमेव अभिनेते आहेत. देअर विल बी ब्लड हा चित्रपट बनविणारा दिग्दर्शक पॉल थॉमस अ‍ॅण्डरसन यांच्या आगामी ‘फॅण्टम थ्रेड’ या चित्रपटासाठी तब्बल पाच वर्षांनंतर मोठय़ा पडद्यावरची भूमिका त्यांनी स्वीकारली. लंडनमधील १९५० सालच्या फॅशन जगतावर असणारा हा चित्रपट पुढील वर्षी ऑस्करची दारे हमखास ठोठावणार असल्याचे भाकीत आधीच वर्तविले गेले होते, ते निव्वळ त्यात असलेल्या डॅनियल डे लुईस यांची त्यात भूमिका असल्यामुळे.  या चित्रपटातील भूमिका ही माझी शेवटची भू्मिका असेल, यानंतर वैयक्तिक कारणासाठी मी चित्रपट संन्यास घेत असल्याचे या अभिनेत्याने जाहीर केले. यापूर्वी हॉलीवूडच्या होवाक्वीन फिनिक्स या अभिनेत्याने अशाच प्रकारे चित्रपट संन्यास घेतला होता, मात्र काहीच वर्षांत ‘हर’ या चित्रपटाद्वारे दमदार पुनरागमन केले होते. ड्रू बॅरिमोर, मिकी रोर्क, मार्लन ब्रॅण्डो, अ‍ॅलेक बाल्डविन या हॉलीवूड दिग्गजांप्रमाणे डॅनियल डे लुईस यांनी भविष्यात पुनरागमन केले, तर सच्च्या चित्रपटवेडय़ांना तो दिलासा असेल.