देशभरातील विविध सरकारी विभागांना दर वर्षी अनेक वरिष्ठ अधिकारी नियुक्त करावे लागतात. हजारो परीक्षार्थीमधून कुशाग्र बुद्धिमत्तेचे उमेदवार निवडण्याचे अत्यंत जिकिरीचे काम गेली ६७ वर्षे केंद्रीय लोकसेवा आयोग अत्यंत सचोटीने करीत आहे. त्यामुळेच आयोगाचे सदस्य तसेच अध्यक्ष निवडताना सरकारलाही खूप दक्षता घ्यावी लागते. ईशान्य भारतातील प्रा. डेव्हिड आर. सिम्लिह हे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आयोगाचे सदस्य होते. आता ते आयोगाचे अध्यक्ष बनले असून परवाच राष्ट्रपतींनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

२२ जानेवारी १९५३ रोजी जन्मलेल्या डेव्हिड यांचे शालेय शिक्षण कलिम्पाँग येथील डॉ. ग्रॅहॅम होम्स शाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षण शिलाँग येथील प्रसिद्ध सेंट एडमंड्स कॉलेजमध्ये झाले. शालेय जीवनापासूनच इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय असल्याने नॉर्थ ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटीतून (एनईएचयू) त्यांनी इतिहास विषयात एम.ए. तसेच नंतर एम.फिल. व पीएच.डी.ची पदवी मिळवली.  १९७९ मध्ये एनईएचयूमधील इतिहास विभागात अधिव्याख्याता म्हणून ते रुजू झाले. विद्यापीठात अध्यापनाबरोबरच विविध उपक्रमांत ते कायम सक्रिय असत. यामुळेच त्यांच्यावर विद्यार्थी कल्याण विभागाची जबाबदारी टाकण्यात आली. प्रशासनातील बारकावे त्यांना माहीत असल्याने त्यांची शैक्षणिक कारकीर्द बहरत गेली. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कारभार सुधारण्यासाठी प्रा. डेव्हिड यांना मग परीक्षा विभागाचे नियंत्रक म्हणून नियुक्त करण्यात आले. काही वर्षांत मग विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या इच्छेमुळे ते आधी कुलसचिव आणि नंतर प्र-कुलगुरू बनले. ईशान्य भारताच्या इतिहासाचा त्यांचा दांडगा व्यासंग होता. या विषयावर त्यांची अनेक पुस्तके तसेच लेख लिहिले. मेघालयातील खासी जमातीचा प्रमुख असलेले तिरोथ सिंग यांनी ब्रिटिशांच्या साम्राज्यविस्ताराला कडाडून विरोध केला. या डोंगराळ भागात रस्त्यांचे जाळे उभारून हा भाग आपल्या नियंत्रणात आणण्याचा ब्रिटिशांचा प्रयत्न होता. तिरोथ सिंग व त्याच्या सहकाऱ्यांनी त्यास नेहमीच विरोध केला. नंतर ब्रिटिश सैन्याने त्यांना अटक करून ढाका येथे नजरकैदेत ठेवले आणि तेथेच १८३५  मध्ये त्यांचा मृत्यू झाला. या तिरोथ सिंग यांच्या मृत्यूची तारीख तसेच त्यांच्या अखेरच्या दिवसांतील घडामोडींवर प्रा. डेव्हिड यांनी विशेषत्वाने संशोधन केले. ईशान्य भारताच्या इतिहासात हे संशोधन खूप महत्त्वाचे मानले जाते. प्रा. डेव्हिड यांचा इतिहास विषयातील कामगिरीचा वेळोवेळी गौरव झाला. ब्रिटनमधील संशोधनासाठी त्यांना चार्ल्स् वॉलेस गौरववृत्ती तर अमेरिकेत संशोधन करण्यासाठी फुलब्राइट फेलोशिप मिळाली होती. भारतीय इतिहास काँग्रेसच्या ‘आधुनिक भारताचा इतिहास’ या विभागाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. हिस्टरी काँग्रेसच्या २०१२ मध्ये मुंबईत भरलेल्या अधिवेशनात त्यांचे बीजभाषण झाले होते. लोकसेवा आयोगात येण्यापूर्वी त्यांनी पाच वर्षे राजीव गांधी विद्यापीठाचे कुलगुरुपद यशस्वीपणे सांभाळले. प्रा. डेव्हिड यांची उज्ज्वल शैक्षणिक कारकीर्द आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव लक्षात घेऊनच सरकारने त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य नेमले. लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले अनेक जण आमच्यावर मुलाखतीचे दडपण येऊ नये म्हणून डेव्हिड सरांचे पॅनेल कसे प्रयत्नशील असत, हे आवर्जून सांगतात. एक व्यासंगी इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ असलेले प्रा. डेव्हिड आता आयोगाचे अध्यक्ष झाल्याने या स्वायत्त संस्थेच्या लौकिकात निश्चितच आणखी भर पडेल..