अभिजात संगीताच्या दुनियेत साठावे वर्ष म्हणजे तारुण्यात पदार्पण. कारण संगीताची आराधना करून वयाच्या चाळिशीत किंवा पन्नाशीत जरा कुठे स्थिरस्थावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे संगीतकार म्हणून असलेली कारकीर्द त्यानंतरच सुरू होणारी. सारंगीवादक ध्रुव घोष यांचे अकाली निधन त्यामुळेच चटका लावणारे. सारंगीसारख्या वाद्यावर प्रभुत्व मिळवलेल्या घोष यांना संगीताच्या वर्तुळात मोठाच मान होता. पंडित राम नारायण, साबरी खान आणि उस्ताद सुलतान खाँ यांच्यासारख्या कलावंतांनी सारंगीला संगीताच्या दरबारात मानाचे पान मिळवून दिले, याचे कारण त्यांच्या निमित्ताने एके काळी भरजरी वस्त्रांकित असलेल्या सारंगीला पुन्हा एकदा चांगले दिवस मिळाले. हे वाद्य नव्या पिढीतल्या रसिकांनाही आकर्षक वाटू लागले, याचे कारण स्वतंत्र वादन करण्याची या वाद्याची क्षमता या दिग्गजांनी सिद्ध केली. पंडित ध्रुव घोष यांनी हीच परंपरा पुढे सुरू ठेवली, हे विशेष!

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय अभिजात संगीतातून सारंगी जवळजवळ हद्दपार होऊ लागली, कारण या वाद्यावर हात फिरवणे ही तेवढी साधी गोष्ट नाही. तंतुवाद्यांमध्ये सारंगी ही खरे तर अनभिषिक्त सम्राज्ञी. पण हार्मोनियम आणि व्हायोलिनसारख्या सुटसुटीत परदेशी वाद्यांनी अभिजात संगीतात शिरकाव केला आणि सारंगी शिकणाऱ्यांची संख्या घटू लागली. आजमितीस उत्कृष्ट सारंगी वाजवणाऱ्या कलावंतांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याएवढीच आहे. यामुळेच ध्रुव घोष यांचे महत्त्व अधोरेखित होते. भारतीय संगीतपरंपरेतील या एका अत्यंत महत्त्वाच्या वाद्याकडे त्यांचे लक्ष गेले आणि त्यांनी त्यावर प्रचंड कष्ट घेऊन आपली सारी प्रतिभा पणाला लावून हे वाद्य आपलेसे केले. घोष यांचे कुटुंब संगीताशी निगडित आहे. भारतीय वाद्यांच्या दुनियेत बासरी या वाद्याला अग्रस्थान मिळवून देणारे पन्नालाल घोष हे त्यांचे काका. ज्येष्ठ तबलावादक निखिल घोष हे वडील, तर सतारवादक नयन घोष हे बंधू. अशा तालेवार कुटुंबात राहून ध्रुव यांनी सारंगी हे वाद्य हाती घेतले. गायनकलेशी सर्वात जवळीक साधणारे हे वाद्य सुरेलपणात सच्चे, पण वादनासाठी मात्र कमालीची मेहनत अपेक्षित करणारे. घोष यांनी या वाद्यावर स्वत:चे तंत्र विकसित केले. तंतुवाद्यवादनात तारेची सुरेलता सर्वात महत्त्वाची असते. ज्या वाद्यात खूपच तारा असतात, तेथे हा सुरेलपणा बिघडण्याची शक्यता अधिक असते. पण उस्ताद कादरबक्ष यांच्यासारख्या अस्सल वादकाने बालगंधर्वासारख्या सर्वात सुरेल कलाकाराबरोबर केलेली साथ आजही आठवली जाते. गळ्यातून जे आणि जसे स्वर निघू शकतात, त्याच्याशी सर्वात जवळ जाणारे हे वाद्य सुरुवातीपासून साथीचे वाद्य म्हणूनच ओळखले गेले. याचे कारण कलावंताला गायनात मिळणारी उसंत त्याच ताकदीने भरून काढण्याची क्षमता या वाद्यामध्ये होती. ध्रुव यांनी या वाद्यात काळानुरूप तांत्रिक बदल केले. त्याच्या वादनतंत्रातही वेगळा विचार केला. त्यामुळेच सारंगीवादनातील प्रसिद्ध अशा बुंदू खान यांच्या घराण्यातील ज्येष्ठ वादक सगीरुद्दीन खाँ यांची शिस्तबद्ध तालीम मिळूनही घोष यांच्या वादनात राम नारायण यांच्या वादनशैलीची छाप दिसत असे. पाश्चात्त्य संगीतातील वादकांबरोबर सारंगीची नाळ जोडणाऱ्या फ्यूजनलाही ध्रुव यांनी आनंदाने होकार दिला. जागतिक संगीतात सारंगीने केलेला हा प्रवेश लोकप्रिय ठरला, याचे कारण ध्रुव यांची या संगीताकडे बघण्याची स्वागतशील दृष्टी. वयाच्या साठाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झालेल्या या हुन्नर कलावंताच्या निधनाने सारंगीचा एक खरा मित्र काळाच्या पडद्याआड गेला आहे.