मूळच्या नेपाळी, अमेरिकेत शिकलेल्या आणि कुवेतमधील अमेरिकी विद्यापीठाच्या उपकेंद्रात कलेतिहास विभागाची स्थापना करून तो वाढविणाऱ्या कलासमीक्षक दीना बंग्देल यांची निधनवार्ता भारतात पोहोचली ती नेपाळच्या नव्हे- पाश्चात्त्य कलानियतकालिकांतून. वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी- म्हणजे अकालीच- झालेल्या त्यांच्या निधनाची दखल ‘काठमांडू पोस्ट’ सह अन्य नेपाळी दैनिकांनी २५-२६ जुलै रोजीच घेतली होती. त्यांचे कार्य जसे भारतापर्यंत पोहोचले नव्हते, तसेच त्यांच्या निधनवार्तेचेही झाले. वास्तविक, बौद्ध कलेकडे पाहण्याचा त्यांचा नवा दृष्टिकोन भारतीय बौद्ध लेण्यांचे वा चित्रांचे इतिहासनिरूपण आणखी पुढे जाण्यासाठी उपयोगी पडला असता. भारतातील या संपन्न वारशाशी ‘आज’चे नाते काय, हे सांगण्यासाठी त्यांचा नेपाळमधील अनुभव कामी आला असता. पण तसे होण्याआधीच त्यांना मृत्यूने घेरले.

प्रख्यात नेपाळी कला-इतिहासकार आणि लेखक लैनसिंग बंग्देल यांच्या दीना या एकुलत्या एक कन्या.  घरात कलाविषयक पुस्तके भरपूर, त्यातही वडिलांचे वाचन आणि अभ्यास चतुरस्र. नेपाळी कलेची कीर्ती जगभर पोहोचवण्याचा ध्यास तर लैनसिंग यांना होताच, पण ‘स्पेनको समझना’ किंवा ‘रेम्ब्रां’सारखी पुस्तके नेपाळीत लिहून अभिजात पाश्चात्त्य कलेचे उपलब्ध ज्ञान त्यांनी स्वदेशात पोहोचविले होते. दीना यांनी वारसा जपला, तो या चतुरस्रपणाचा! हा वारसा नव्या- आजच्या संदर्भात- जपताना त्यांना नवे प्रश्न पडणारच होते- १९६०च्या किंवा अगदी १९८०च्या दशकापर्यंत पाश्चात्त्य कलेत अभिजात (क्लासिकल) ते आधुनिक (मॉडर्न) अशा घडामोडी जणू एकापाठोपाठ होत होत्या. तोवरचे इतिहासकथन एकरेषीय होते. त्यानंतर मात्र कलेच्या पाश्चात्त्य इतिहासालाच आव्हाने मिळू लागली, इतिहास बहुकेंद्री झालाच आणि त्यामुळे जगभरच्या कला-इतिहासाच्या अश्वत्थवृक्षाची पाळेमुळे पुन्हा शोधून काढणे आणि अगदी शेंडय़ावरची कोवळीलाल पालवी जपणे, हे जणू एकविसाव्या शतकातल्या कला-इतिहासकारांचे दुहेरी काम ठरले. त्या प्रयोगांचा नवेपणा पारखून घेणे, एकीकडे ‘विस्मृतीत’ गेलेल्या किंवा पाश्चात्त्य कथनात नाकारल्याच गेलेल्या कला-इतिहासाचा तर दुसरीकडे कलेच्या नव्या अभिव्यक्तीचा लोकांशी संबंध जुळावा यासाठी प्रयत्न करणे, हेही इतिहासकारच करू लागले. त्यासाठी प्रदर्शनांच्या विचारनियोजनाचे किंवा विचारगुंफणीचे (क्युरेटिंग) कामही त्यांच्याकडे आले. कलेच्या इतिहासकारांचा हा नवा युगधर्म दीना पाळत होत्या.

नेपाळ, भूतान, भारत, जपान, चीन येथील बौद्धपरंपरांत फरक पडत गेले, तेथील कलाशैलींमध्येच नव्हे तर कलेतील प्रतिमांमध्येही वैविध्य येत गेले, त्याचा अभ्यास दीना यांनी अर्थातच सुरू ठेवला होता. पण या साऱ्या प्रतिमांचा ‘आज’च्या कल्पनाशक्तीशी संबंध काय, हा प्रश्न एकविसाव्या शतकातील कलेतिहास-अभ्यासपद्धतीनुसार सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. सन १९८५ मध्ये शिकण्यासाठी अमेरिकेला (फिलाडेल्फियात) गेलेल्या दीना, पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण झाल्यावर १९९८ पासून अध्यापन करू लागल्या. पुढे व्हर्जिनिया विद्यापीठात सन २००५ मध्ये त्यांना सहायक प्राध्यापक हे पद मिळाले, तर सन २०१२ मध्ये तेथेच सहयोगी प्राध्यापक अशी बढती मिळाली. त्याच वर्षी व्हर्जिनिया विद्यापीठाच्या कुवेतमधील उपकेंद्रात कला-इतिहास विभागाची स्थापना करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. मात्र एवढय़ावर न थांबता, या इतिहासाचे ‘आज’शी नाते जोडण्यासाठी अमेरिकेत आशियाई (प्रामुख्याने बौद्ध) व समकालीन नेपाळी कलेची सांगड घालणाऱ्या तीन प्रदर्शनांची विचारगुंफणही त्यांनी केली. ही तीन्ही प्रदर्शने अमेरिकेतील विविध कला-संग्रहालयांत भरली. तेथे तरुण नेपाळी चित्रकार- छायाचित्रकार- मांडणशिल्पकार यांना वाव मिळालाच. पण धार्मिक कर्मकांडांकडे आपण ‘कला’ म्हणून (नास्तिकपणेसुद्धा) पाहू शकतो काय, असा प्रश्नही दीना बंग्देल यांनी हाताळला होता. हा अभ्यास पुढे जाण्याआधीच, मॅनेंजायटिसच्या आजाराने त्यांना ओढून नेले.