गुन्हे-भयकथांना मुख्य प्रवाहातील चित्रपटांत मानाचे स्थान नव्हते. प्रेमकथा, विज्ञान चमत्कृती, फॅण्टसी याद्वारे चव्वनीछाप वकुबाच्या प्रेक्षकांना हुरळवणाऱ्या, रिझविणाऱ्या आणि दिवास्वप्नांना सिनेमॅटिक अस्तर लावण्यासाठी सिनेमा डोक्यात घेणाऱ्या वैश्विक महाभागांसाठी ‘सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स’ ३६० अंश चक्रावणारा सिनेमा होता. जगभरातील तिकीटबाऱ्यांवर १९९१ साली अब्जावधी डॉलरचा व्यवसाय करून देणाऱ्या या सिनेमात मानवी विकृतीची परिसीमा गाठली गेली होती. या विकृती कडेलोटाची अनुभूती घेण्यासाठी प्रेक्षक पुन:पुन्हा आसुसलेले होते आणि ऑस्करच्या बाहुलीवर निर्विवाद सारी पारितोषिके ‘सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स’ हिसकावून गेला होता. दिग्दर्शक जोनाथन डेमी यांनी हॅनिबल लेक्टर या व्यक्तिरेखेला तयार केले नाही.

त्या दशकात रसातळाला गेलेल्या मानवी मूल्यांवर आधारित कादंबऱ्यांचा सडा पडला होता. भौतिक सुखाच्या नादात समाजाने एकारलेपण लादलेल्या व्यक्तींच्या टोकाच्या भूमिका कादंबऱ्यांत येऊ लागल्या होत्या. थॉमस हॅरिस यांच्या ‘मॅनहंटर’ या कादंबरीमध्ये पहिल्यांदा माणसे खाणाऱ्या या हत्योत्कट विकृताची गोष्ट आली होती. त्यावर याच नावाचा चित्रपटही एका दिग्गज दिग्दर्शकाने केला होता; पण फारशी ओळख नसलेल्या आणि शून्य बजेटमध्येही सिनेमा बनविण्याची तळमळ असणाऱ्या डेमी यांनी ‘सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स’ कादंबरीला चित्ररूप दिले. तेव्हा हा हॅनिबल लेक्टर अमेरिकाच नाही, तर जगभरासाठी ‘गब्बरसिंग’हून अधिक भीतीदायक व्यक्ती बनला. सीरियल किलर मनोरुग्ण आणि त्याला पुरून उरणारी महिला एफबीआय एजंट यांची ही सांस्कृतिक आणि दृश्यिक धक्क्यांची गोष्ट हॉलीवूडच्या आणि सिनेमा माध्यमाच्या इतिहासातील लक्षवेधी पान ठरली. न्यूयॉर्कमध्ये सुखवस्तू घरात जन्मलेले डेमी तरुण वयात ‘बी मुव्ही’ बनविणाऱ्या ‘एक्स्प्लॉयटेशन फिल्म्स’च्या पंथात लेखन-दिग्दर्शनासाठी धडपडत होते. ‘बी मुव्ही’ म्हणजे अत्यंत कमी खर्चात तयार झालेला लोकांना आवडणाऱ्या, चलती असलेल्या प्रकारचा चित्रपट. थॉमस हॅरिस या गुन्हे बीटवर काम करणाऱ्या पत्रकार-लेखकाने त्याच्या पत्रकारिता अनुभवांतून प्रेरणा घेऊन अनेक वास्तवदर्शी कादंबऱ्या लिहिल्या होत्या. त्या कादंबऱ्यांपैकी ‘सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स’वर चित्रपट बनविण्यापूर्वी त्यांच्या नावावर बी मुव्हीज बनविणारा दिग्दर्शक असा शिक्का होता. हा चित्रपटही हॉलीवूडच्या तुलनेत कमी बजेटमध्ये तयार झाला; पण चित्रपट प्रदर्शनानंतर मात्र त्यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याचे कौतुक होण्यात सीमा राहिली नाही. एड्सच्या समस्येची माहिती जगभर पोहोचण्याआधीच त्यांचा ‘फिलाडेल्फिया’ त्या विषयावरचा पहिला महासिनेमा ऑस्कर पटकावून गेला. त्यानंतर चढता-उतरता दिग्दर्शकीय कारकीर्दीचा आलेख सोबत घेऊन त्यांनी सिनेमे बनविले, पण त्यांची ओळख ही कायम ‘सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स’चा दिग्दर्शक म्हणूनच राहिली.  अभिनेते अ‍ॅन्थनी हॉप्किन्स यांनी वठविलेल्या लेक्टरची दहशत आणखी तीव्र करणाऱ्या त्यांच्या क्लोजअप चित्रणाचा नंतरच्या दशकातील दिग्दर्शकांनी अंगीकार केला. आज यू-टय़ूबवर या चित्रपटातील गंभीर आणि लक्षात राहणाऱ्या क्लिप्सचा महापूर आहे. त्यातील एका क्लिपमध्ये हॅनिबल लेक्टरच्या (हॉप्किन्स) नकाराच्या क्लोजअप छटांची एक क्लिपही आवडीने पाहिली गेल्याचे दिसते. भय आणि थरारपटाचा लोकविलक्षण प्रकार देणाऱ्या या दिग्दर्शकाचे नुकतेच निधन झाले. त्यांनी दाखविलेल्या ‘सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स’च्या काळाहून अधिक समाज घसरणवळणावर आला आहे अन् त्याचा धक्का न बसण्याचे श्रेय या दिग्दर्शकाच्या एका कलाकृतीला आहे.