नागरी अभियांत्रिकी विषयाला आता माहिती तंत्रज्ञानासारख्या पैसा कमावून देणाऱ्या क्षेत्रामुळे करिअर निवडीत फार प्राधान्य दिले जात नसले, तरी या क्षेत्रात चांगली कामगिरी करता येते. फक्त त्यासाठी समाजाकडून उत्तेजन मिळणे आवश्यक असते. या विषयातील संशोधन आजच्या स्मार्ट सिटी व इतर विषयांच्या गलबल्यात खरे तर बरेच महत्त्वाचे आहे. कमी जागेत जास्त सुविधा देणारी घरे तयार करण्यासाठी या क्षेत्रात बुद्धिमान विद्यार्थी वळणे गरजेचे आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे या क्षेत्रात वेगळे काम करणारे इराणचे नागरी अभियंता डॉ. कावेह मदानी यांना नुकताच अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हिल इंजिनीयर्सचा ह्य़ुबेर नागरी अभियांत्रिकी संशोधन पुरस्कार जाहीर झाला आहे. मध्यमवयीन संशोधकांसाठी नागरी अभियांत्रिकीत ह्य़ुबेर पुरस्कार हा सर्वात मानाचा समजला जातो.

डॉ. मदानी यांचे या अभियांत्रिकी शाखेतील काम साचेबद्ध नाही. त्यांनी पाण्याचे कमी स्रोत असताना त्याचे वाटप वेगळ्या पद्धतीने तर केले आहेच, शिवाय गेम थिअरीवर आधारित संकल्पना पाण्याच्या जटिल समस्येवर वापरल्या आहेत. त्याचा वापर ऊर्जा क्षेत्रातही होत असून अप्रत्यक्ष फायदा हा पर्यावरणाच्या रक्षणासाठी होत आहे. गेल्या वर्षी मदानी यांना अर्नी रिश्टर पुरस्कार हा युरोपीय जिओसायन्सेस युनियनकडून देण्यात आला होता. जलस्रोतांचे नियोजन व गेम थिअरी यांचा संबंध त्यांनी जोडला आहे. त्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. जगातील दोन प्रतिष्ठित संस्थांनी आतापर्यंत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. विशेष म्हणजे विज्ञान व अभियांत्रिकी यांचा आंतरशाखीय अभ्यास हे त्यांचे वेगळेपण. पर्यावरण-ऊर्जास्रोतांचे वाटप व व्यवस्थापन, अभियांत्रिकी प्रणालींचा वापर, सिस्टीम डायनॅमिक्स, पाण्याच्या वाटपाचे प्रारूपीकरण तसेच सादृश्यीकरण, ऊर्जेचे प्रश्न त्यातही धोरण नियोजन व व्यवस्थापकीय दृष्टी हे त्यांच्या संशोधनाचे खास विषय आहेत. कावेह मदानी यांचा जन्म १९८१ मध्ये तेहरान येथे झाला. त्यांचे आईवडील जलसंपदा विभागात काम करीत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेहरानला झाले. त्यांनी ताब्रिझ विद्यापीठातून नागरी अभियांत्रिकीत बीएस्सी पदवी घेतली. नंतर ते स्वीडनला गेले व तेथे जलस्रोत विषयात पीएच.डी. केली, नंतर डेव्हिसच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून पर्यावरण अभियांत्रिकीची डॉक्टरेट पदवी घेतली. सध्या ते लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमध्ये सिस्टीम अ‍ॅनॅलिसिस व पॉलिसी या विभागात रीडर आहेत. त्यापूर्वी ते पर्यावरण व्यवस्थापनाचे व्याख्याते होते. सेंट्रल फ्लोरिडा विद्यापीठात त्यांनी त्याआधी सहायक प्राध्यापक म्हणून काम केले. फेब्रुवारी २०१७ मध्ये हवामान बदल विषयावर इराणमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती, त्याचे ते सचिव होते. अमेरिकेत एएससीई ही नागरी अभियांत्रिकीतील प्रख्यात संस्था १८५२ मध्ये स्थापन झाली. त्याचे १७७ देश सदस्य आहेत. त्या संस्थेचा प्रतिष्ठित पुरस्कार आता त्यांना मिळाला आहे. या पुरस्कारासाठी संबंधितांनी १२ वर्षे काम केलेले असणे आवश्यक आहे. इम्पिरियल कॉलेजच्या प्राध्यापकास हा सन्मान प्रथमच मिळाला आहे. आजच्या काळात नागरी अभियांत्रिकीला विज्ञानातील संकल्पनांची जोड दिली तरच त्यातून पर्यावरणाचे रक्षण, लोकांच्या गरजा भागवणे ही कसरत करणे शक्य आहे, अशा पद्धतीने काम करणाऱ्यांपैकी मदानी हे एक आहेत, अशा कामाला उत्तेजन मिळाले तर त्यातून बहुरत्ना वसुंधरेचे रक्षण करतानाच मानवी जीवन सुसह्य़ करणे शक्य होणार आहे. या दृष्टिकोनातून मदानी यांचे काम नक्कीच लक्षणीय आहे, यात शंका नाही.