दिल्ली आयआयटीच्या एका प्राध्यापकांनी वाहनांच्या हवाप्रदूषणावर तोडगा सुचवला होता तो १९८० च्या दशकात. त्या वेळी तो धाडसीच मानला गेला तरी आताची संशोधनाची वाटचाल बघता ती त्याच दिशेने आहे. यावरून या वैज्ञानिकाची दूरदृष्टी लक्षात येते. त्यांनी त्या वेळी जी कल्पना मांडली होती ती दिल्लीतील वाहनांमध्ये हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्याची. सध्या आपण हायड्रोकार्बन इंधने वापरतो म्हणून प्रदूषण होते. त्यामुळे लोकांना अनेक आजार होतात. शिवाय थंडीमध्ये काळे धुके पसरते. वाहनांच्या इंधन ज्वलनातून कार्बनडाय ऑक्साइड व कार्बन मोनॉक्साइड तसेच नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर अशी अनेक रसायने बाहेर टाकली जातात, पण हायड्रोजन हे इंधन वापरले तर त्यातून पाणी तयार होईल. हा विचार त्या वेळी मांडणारे हे वैज्ञानिक म्हणजे ललित मोहन दास. त्यांना अलीकडेच ओदिशा सरकारचा बिजू पटनायक विज्ञान पुरस्कार देण्यात आला आहे. ८० च्या दशकात हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्याची कल्पना मांडणारे दास हे काळाच्या पुढे होते व आहेतही.

हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्यात अनेक अडचणी आहेत, पण दास यांनी त्या काळात हायड्रोजनवर आधारित वाहनात वापरता येईल, अशी इलेक्ट्रॉनिक इंधन ज्वलनप्रणाली तयार केली होती. आयआयटी दिल्लीच्या प्रयोगशाळेत त्यांनी हे प्रयोग केले होते. त्यांनी जगातील पहिली हायड्रोजन आधारित तिचाकी हायअल्फा ही गाडी तयार केली होती. २०१२ मध्ये प्रगती मैदानात अशा १५ गाडय़ा प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. तेथे हायड्रोजनचे इंधन केंद्रही होते. एक किलो हायड्रोजनमध्ये त्या गाडय़ा प्रवाशांना घेऊन ८३ किमी सफर करीत होत्या. दास यांच्या मते हायड्रोजन हा पुनर्नवीकरणीय व अपारंपरिक ऊर्जास्रोत आहे व तो पाण्यापासून तयार होतो. हायड्रोजन जळाला की परत पाणी तयार होते, त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्नच नाही. त्यांच्या या प्रकल्पासाठी संयुक्त राष्ट्रांनी ५०० दशलक्ष डॉलर्स मंजूर केले होते. दास यांचे हे वाहन व्यावसायिक पातळीवर पोहोचले नाही, पण ते कमी पैशात तयार होऊ शकते. दास हे मूळचे ओदिशाचे. त्यांचा जन्म व बालपण पुरी येथे गेले, शिक्षणही तेथेच. रूरकेलामधील महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी घेतली व नंतर खरगपूर येथून एमटेक झाले. सुरुवातीलाच त्यांनी पर्यायी इंधनावर संशोधन केले. ८० शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत. हायड्रोजन, सीएनजी, सीएनजी ब्लेंड हे त्यांचे संशोधनाचे विषय आहेत. जनरल मोटर्स, शेल इंडिया, एमएनआरई, डीएसटी यांनी त्यांच्या संशोधनाचे कौतुक केले. त्यांचा ऑप्टफ्युअल प्रकल्प गाजला होता. त्यांना यापूर्वी  विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने राजीव गांधी सन्मान  दिला असून लॉकहीड मार्टिनचा पुरस्कारही मिळाला आहे. शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराचेही ते मानकरी आहेत. अमेरिकेतील हायड्रोजन इंधन वाहन प्रकल्प, फ्रान्समधील स्वयंचलित किफायतशीर वाहन प्रकल्प, लेसर डायग्नॉस्टिक ऑफ कार या प्रकल्पात ते सहभागी असून कॅलिफोर्निया विद्यापीठ तसेच ब्रिटनमधील थॉर्नटन रीसर्च सेंटर येथे त्यांनी अध्यापन केले आहे. अमेरिका, बँकॉक, जपान, फ्रान्स, सिंगापूर येथील परिषदांत त्यांनी शोधनिबंध सादर केले. एकूणच आजच्या पर्यायी इंधनाच्या संशोधनात अशा वैज्ञानिकांच्या वेगळ्या प्रयोगांची देशाला मोठी गरज आहे. त्यांच्या या सन्मानाने ओदिशा विज्ञान परिषदेचाही गौरव झाला आहे, कारण या संस्थेत ते सक्रिय आहेत.