आर्थिक आणि लष्करी ताकदीमुळे चीनची दादागिरी भारतासह अनेक देश अनुभवत असतातच. त्याचबरोबर चीनमधील दडपशाहीच्या कहाण्याही सदैव चर्चेत असतात. चीनमधील साम्यवादाविरोधात आवाज उठवणारे कलाकार, साहित्यिक यांची नेहमीच मुस्कटदाबी होत असते. साम्यवादी विचारांविरोधात लढणाऱ्या लोकशाहीवादी लोकांना अद्दल अडवण्यासाठी मग कधी थेट देहान्ताची शिक्षा सुनावली जाते तर कधी प्रदीर्घ काळासाठी तुरुंगात डांबले जाते. अशाच बंडखोर लोकांपैकीच एक होते लिऊ क्षियाओबो. साधेसुधे नव्हे तर शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते. शिवाय प्राध्यापक, लेखक, विचारवंत म्हणूनही त्यांचा लौकिक आहेच. तरीही सरकारविरोधात युद्ध पुकारल्याच्या आरोपावरून त्यांना १५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली. परवा त्यांची सुटका झाली खरी, पण ती झाली वैद्यकीय कारणामुळे. यकृताच्या कर्करोगाने त्यांना विळखा घातल्याचे उघड झाल्यानंतर पुढील वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले.

बीजिंग विद्यापीठात प्राध्यापक असलेले क्षियाओबो हे विद्यार्थ्यांबरोबरच युवा पिढीतही कमालीचे लोकप्रिय आहेत. १९८९ मध्ये तिआनामेन चौकात निदर्शने सुरू असताना क्षियाओबो हे अमेरिकेत होते. ही घटना कळताच ते तातडीने मायदेशी आले व त्यांनी बीजिंगसह विविध शहरांमध्ये चिनी सरकारच्या दडपशाहीविरोधात भाषणे देण्याचा सपाटा लावला. नंतर स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांवर चिनी लष्कराने रणगाडे चालवले आणि शेकडो निदर्शकांना चिरडले तेव्हा तर ते कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांनी उपोषण सुरू केले. मग त्यांना आंदोलक व सरकारमध्ये वाटाघाटी करण्यासाठी आमंत्रित केले गेले. क्षियाओबो यांच्या मध्यस्थीमुळे तेव्हा अनेकांचे प्राणही वाचले.

तरीही या उठावातील सहभागाबद्दल त्यांच्यावर खटला भरून त्यांना २१ महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. कारागृहातून सुटल्यानंतरही ते शांत बसले नव्हते. चीनमध्ये राजकीय खुलेपणा यावा व मुक्ततेचे वातावरण सुरू व्हावे या उद्देशाने त्यांनी ‘चार्टर एट’ या नावाने आपल्या मागण्यांची एक याचिका तयार केली. त्यावर देशातील अनेक विद्वान, विचारवंतांबरोबरच शेकडो कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या मिळवल्या. त्यांच्या या मोहिमेला यश येण्याऐवजी सरकारविरोधात युद्ध पुकारल्याचा ठपका ठेवून थेट १५ वर्षे तुरुंगात त्यांची रवानगी झाली. दोन वर्षांनंतर, २०१० साली चीनमधील मूलभूत मानवी हक्कांसाठी अहिंसक मार्गाने प्रदीर्घ लढा दिल्याबद्दल क्षियाओबो यांना प्रतिष्ठेचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला. त्या कार्यक्रमास त्यांना वा नजरकैदेत असलेल्या त्यांच्या पत्नीसही जाता आले नाहीच. मध्यंतरीच्या काळात त्यांची काही पुस्तकेही प्रकाशित झाली. चीनमधील राजवटीची टीकात्मक चिकित्सा करणारे ‘अ नेशन दॅट लाइज टू कन्सायन्स’ हे तैवानमध्ये प्रसिद्ध झालेले पुस्तक  खूप गाजले. प्रदीर्घ काळ तुरुंगवासात काढल्याने तेथून पत्नीला लिहिलेल्या पत्रांचेही नितांतसुंदर पुस्तक हॉँगकॉँगमधील एका प्रकाशकाने छापले.यानंतर आणखी तीन पुस्तके त्यांनी लिहिली. नंतर मात्र कारागृहातील त्यांचा संगणक तसेच अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली. यामुळे मानवी हक्कांविषयीचा अहवाल तयार करण्याचे त्यांचे काम अपूर्णच राहिले. चार महिन्यांपूर्वी क्षियाओबो यांना कर्करोगाने ग्रासल्याचे उघड झाल्यानंतर त्यांची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्यासाठी  दबाव वाढत गेला. डॉक्टरांनीही त्यांना केमोथेरपीची गरज असल्याचे सांगितल्यानंतर त्यांची अखेर सुटका करण्यात आली. त्यांच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त करण्यापेक्षा, त्यांना आयुरारोग्य चिंतणे हे जगभरच्या त्यांच्या चाहत्यांना तसेच अभिव्यक्तिस्वातंत्र्यवाद्यांना महत्त्वाचे वाटत आहे.