‘‘भारतासारख्या देशांना व्यापारवृद्धीची संधी असताना स्वत:च्या देशाला प्रगतिपथावर नेण्यास प्राधान्य देणारे अमेरिकेचे धोरण आहे. अमेरिकेच्या या धोरणामुळे भारतासारख्या देशांबरोबरचे व्यापार संबंध बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, तरीही पायाभूत सुविधा, सौरऊर्जा, तंत्रज्ञान आणि ग्राहक सेवा या क्षेत्रांत भारताला भविष्यात मोठय़ा प्रमाणावर संधी असणार आहे,’’ असे विधान अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील दक्षिण व मध्य आशियासाठीच्या माजी  साहाय्यक मंत्री निशा देसाई बिस्वाल यांनी तीन महिन्यांपूर्वी केले होते.

अमेरिकेच्या व्यापारविषयक धोरणांचा सखोल अभ्यास असणाऱ्या निशा बिस्वाल यांनी केलेले हे विधान नक्कीच दुर्लक्षित करण्यासारखे नाही. भारतीय वंशाच्या आणि गुजरातचा जन्म असलेल्या निशा बिस्वाल यांची नुकतीच अमेरिका-भारत व्यापार परिषदेच्या (यूएसआयबीसी) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्या माहेरच्या देसाई. पण व्हर्जिनिया विद्यापीठात शिक्षणासाठी आल्या आणि अमेरिकावासी झाल्या आणि अमेरिकी राजनैतिक सेवेत असलेले, मूळचे ओरिसाचे सुब्रत बिस्वाल यांच्याशी विवाहबद्ध झाल्या.

अमेरिकी चेंबर ऑफ कॉमर्सच्या अंतर्गत व्यावसायिकांचा हा सर्वात प्रभावशाली गट समजला जातो. राजकीय सामर्थ्य लाभल्यामुळे ‘यूएसआयबीसी’कडून भारतीय व्यापार आणि व्यावसायिक प्रगतीसाठी पूरक वातावरण मिळेल, अशी अपेक्षा आहे. निशा बिस्वाल १ नोव्हेंबरपासून नव्या पदावर रुजू होतील. ‘‘आशिया आणि संपूर्ण भारतातील वाढीव बाजारपेठांमध्ये अमेरिकेच्या व्यवसायवाढीसाठी निशा बिस्वाल यांचा दृढनिश्चय आहे. त्यांच्यासारख्या दूरदर्शी आणि प्रेरणादायी नेतृत्वात देशातील व्यापाराला गती मिळेल, असा विश्वास वाटतो,’’ असे अमेरिकी चेंबरचे कार्यकारी प्रमुख मायरॉन ब्रिलियंट यांनी म्हटले आहे. बिस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जगभरात व्यापारवृद्धी होईल, असा विश्वासही ब्रिलियंट यांनी व्यक्त केला. २०१३-१७ या कालावधीत साहाय्यक मंत्रीपदावर असताना बिस्वाल यांनी अमेरिका-भारत यांच्यातील द्विपक्षीय भागीदारीत अतुलनीय योगदान दिले आहे. तसेच, या दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंधांना चालना देण्यासाठी बिस्वाल यांनीच चर्चा घडवून आणली होती. या कामगिरीसाठी बिस्वाल यांना प्रतिष्ठेचा ‘प्रवासी भारतीय सम्मान’ देऊन तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी गौरविले होते. बिस्वाल यांनी याआधी अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेत साहाय्यक प्रशासक म्हणून मोलाची भूमिका बजावली होती. राज्य कर्मचारी संचालक, विदेशी संचालन अनुमोदन उपसमिती आणि परराष्ट्र व्यवहार समिती या विभागांमध्येही बिस्वाल कार्यरत होत्या. अलीकडेच त्या अल्ब्राइट स्टोनब्रिज ग्रुपच्या वरिष्ठ सल्लागार होत्या. ‘‘यूएसआयबीसीच्या अध्यक्षपदी निवड होणे अभिमानास्पद आहे. दोन्ही देशांसाठी हा ऐतिहासिक कालखंड असणार आहे,’’ असे बिस्वाल म्हणाल्या. ‘‘बाजारपेठ म्हणून भारताचा अतिवेगाने विस्तार होत आहे. अमेरिकेसाठी भारत हा अतिशय महत्त्वाचा आर्थिक भागीदार आहे. भारतातील कंपन्या मोठय़ा प्रमाणावर अमेरिकेत गुंतवणूक करत आहेत. या कंपन्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिका-भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी या संस्थेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. ही जबाबदारी स्वीकारण्यास मी अतिशय उत्सुक असून कंपन्यांमधील गुंतवणुकीच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील नागरिकांचे भवितव्य उज्ज्वल करण्याची संधी मिळाली आहे,’’ असे बिस्वाल यांनी स्पष्ट केले.