एखादी व्यक्ती विशिष्ट कामासाठी जन्मलेली असते. तिच्या रक्तातच ती कला असते. ‘पॉल साब’ तसेच होते. छायाचित्रकला त्यांच्या हाडामांसात भिनलेली होती. छायाचित्रण दिवस साजरा होण्याच्या आधीच ते गेले. एस. पॉल यांचा जन्मदिवस १९ ऑगस्ट. तोच छायाचित्रण दिन म्हणून साजरा केला जातो. ‘पॉल साब’ आपल्यासाठी कॅमेरा सोडून सर्व काही ठेवून गेले. प्रख्यात छायाचित्रकार रघू राय यांचे ते मोठे बंधू. त्यांना पॉल यांनीच छायाचित्रणाची गोडी लावली. पॉल यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा एक कॅमेरा प्रतीकात्मकरीत्या त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या छातीवर ठेवला. एरवी पॉल साब नेहमीच गळ्यात कॅमेरा अडकवून फिरायचे.

एका छायाचित्रकाराला त्यांनी एकदा गुगली टाकला होता. अंडय़ाचे छायाचित्र पांढऱ्या पाश्र्वभूमीवर कसे काढता येईल, असे त्यांनी विचारले होते; पण त्याचे उत्तर शेवटपर्यंत त्याला देता आले नाही. पॉल यांच्या कॅमेऱ्याने माणूस व निसर्ग तेवढय़ाच ताकदीने टिपला. कलाकार म्हणून त्यांची सौंदर्यदृष्टी त्यांच्या घरातील प्रत्येक गोष्टीत जाणवत होती. छायाचित्रकारापलीकडे त्यांची एक ओळख होती, ती म्हणजे ते चांगले शिक्षक होते. त्यांनी अनेकांना ही कला शिकवली.  ते कुठल्या प्रशिक्षण वर्गात छायाचित्रण शिकले नव्हते. ते स्वशिक्षित छायाचित्रकार होते. त्यात अनुभव हाच त्यांचा शिक्षक होता. फॅशन फोटोग्राफी, अ‍ॅडव्हर्टायझिंग फोटोग्राफी, स्ट्रीट फोटोग्राफी व फोटो जर्नालिझम (छायाचित्र पत्रकारिता) असे वेगळे काही नसते. ही वर्गवारी ते मानत नव्हते. त्यांच्या मते छायाचित्र हे छायाचित्रच असते. त्यांना स्वत:पेक्षा कॅमेऱ्याची जास्त माहिती होती. त्यांच्या प्रत्येक कॅमेऱ्याला एक व्यक्तिगत स्पर्श होता. त्यांची भाषा त्या कॅमेऱ्यांना समजत होती. सजीव व निर्जीवातील तो संवाद होता. आता पाकिस्तानात असलेल्या झांग येथे त्यांचा जन्म झाला. फाळणीनंतर ते कुटुंबासमवेत भारतात आले. त्यांची कॅमेऱ्याशी गट्टी जमली ती वयाच्या विसाव्या वर्षी. रोलीफ्लेक्स कॅमेऱ्याच्या मदतीने त्यांनी प्राथमिक धडे घेतले. पहिला विकत घेतलेला झेस इकॉन नेट्टर कॅमेरा व द ऑल इन वन कॅमेरा बुक या दोन गोष्टींमुळे त्यांची ही आवड वाढत गेली. ते खरे तर शिक्षणाने अभियंता होते, पण त्यांना पहिली नोकरी सिमल्यात मिळाली ती ड्राफ्टस्मनची. नंतर ते काही काळ भारतीय रेल्वेचे मुख्य छायाचित्रकार होते. निकॉन डी ८०० हा ३६ मेगापिक्सेलचा कॅमेरा त्यांचा आवडता. १९६० मध्ये त्यांना ‘दी इंडियन एक्स्प्रेस’मध्ये त्यांच्या स्वप्नातील नोकरी मिळाली व ते मुख्य छायाचित्रकार झाले. त्यांनी छायाचित्र पत्रकारितेची परिभाषा बदलून टाकली. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’मध्ये असताना त्यांनी भारतीय छायाचित्र पत्रकारितेवर राज्य केले. त्यात त्यांनी ‘स्ट्रीट फोटोग्राफी’ हा नवा आकृतिबंध आणला. २५ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले होते; पण त्यांच्यासाठी ती नोकरी नव्हती, छायाचित्रण हेच त्यांचे जीवन होते. १९६५ व १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध, मीरत दंगली, आशियाई क्रीडा स्पर्धा व शीख दंगली त्यांच्या कॅमेऱ्याने ज्या पद्धतीने टिपल्या, तो नवीन छायाचित्रकारांसाठी एक मापदंड ठरावा. काळानुसार छायाचित्र तंत्रज्ञान बदलले ते त्यांनी तेवढय़ाच खुलेपणाने आत्मसात केले. लोकांच्या डोळ्यांत बघा, तुम्हाला अनेक कहाण्या लपलेल्या सापडतील, असे ते नेहमी सांगायचे ते खोटे नव्हते. ‘ब्रिटिश जर्नल ऑफ फोटोग्राफी’ या नियतकालिकात झळकलेले ते पहिले भारतीय छायाचित्रकार. छायाचित्रणासाठी मुद्दाम परदेश दौरे त्यांनी केले नाहीत. दिल्ली व आसपासच्या परिसरांतच त्यांचा कॅमेरा फिरला. त्यांच्या जाण्याने छायाचित्र पत्रकारितेतील मंतरलेला काळ पडद्याआड गेला आहे.