एम्स, आयआयटी, आयआयएम, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इकॉलॉजी अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट, बोस इन्स्टिटय़ूट यांसारख्या संस्थांचा देशातील शैक्षणिक वर्तुळात वेगळाच दबदबा आहे. प्रवेश परीक्षेद्वारे कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांनाच येथे प्रवेश मिळत असतो. याच परंपरेतील अहमदाबादची संस्था आहे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन अर्थात (एनआयडी). १९६१ मध्ये ही संस्था स्थापन करण्याचे ठरले तेव्हा या विषयातले जाणकार अशी ओळख असलेले प्रा. एच कुमार व्यास यांना लंडनहून भारतात बोलावून घेण्यात आले आणि या संस्थेतील ‘औद्योगिक अभिकल्प’ (इण्डस्ट्रियल डिझाइन) हा महत्त्वाचा विभाग सुरू करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.

कुमार यांचा जन्म १९२९ मध्ये युगांडात झाल्यानंतर, त्यांचे आई-वडील काही वर्षांनी भारतात परतले. गुजरातच्या विविध भागांत त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाल्यानंतर ते लंडन येथील विख्यात सेंट्रल स्कूल ऑफ आर्ट अ‍ॅण्ड डिझाइन या संस्थेत दाखल झाले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डग्लस स्कॉट असोसिएट्स या कंपनीत अभिकल्पक (डिझायनर) म्हणून ते रुजू झाले. पाच वर्षे तेथे काम केल्यानंतर त्यांना एनआयडीने आमंत्रित केले. देशात तेव्हा सार्वजनिक क्षेत्रात विविध उद्योग सुरू करण्याची मोहीम आखण्यात आली होती. याच उद्योगांना देशातूनच अभिकल्पक मिळावेत या हेतूने वाणिज्य मंत्रालयाने एनआयडीची स्थापना केली होती. प्रा. व्यास हे संस्थेत रुजू झाल्यानंतर उद्योग क्षेत्रासाठी भारतीय वातावरणात अनुकूल ठरतील, असे अनेक अभिकल्प तयार केले. हातमाग उद्योगापासून ते अंतराळ उद्योगासाठीच्या उपक्रमांचे वेगवेगळे अभिकल्प त्यांनी तयार केले, ज्याची जागतिक पातळीवर नोंद घेतली गेली. केंद्रातील सत्ताधारीही त्यांच्या मतांची तेव्हा आवर्जून दखल घेत. सुमारे तीन दशके त्यांनी एनआयडी या संस्थेत झोकून देऊन काम केले. सतत नवनवीन कल्पना ते आपले सहकारी आणि विद्यार्थ्यांसमोर मांडत. बदलत्या परिस्थितीनुसार त्यांनी एनआयडीमधील अभ्यासक्रमातही बदल करण्याचे धोरण अवलंबिले. शाळकरी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, असे साहित्य त्यांनी तयार केले. ८० च्या दशकात या शैक्षणिक सामग्रीची देशभरात चर्चा झाली. तत्कालीन माहिती व नभोवाणी मंत्र्यांनी दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणातून त्याची दखल तेव्हा घेतली होती.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक परिसंवादांसाठी प्रा. व्यास यांना आवर्जून बोलावले जात असे. अभिकल्प या विषयावर त्यांनी अनेक लेख व पुस्तके लिहिली. ‘डिझाइन अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट : अ‍ॅन इन्ट्रोडक्टरी मॅन्युअल’ हे १९८२ मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे पुस्तक या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आजही मोलाचा संदर्भग्रंथ मानला जातो. २००६ मध्ये पुण्यातील एक शैक्षणिक संस्थेने आपल्या संकुलात अभिकल्पाचे शिक्षण देणारी संस्था सुरू करण्याचे ठरवले तेव्हा त्यांच्यासमोर प्रा. व्यास यांचेच नाव आले. या संस्थेच्या उभारणीतही त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. औद्योगिक अभिकल्पाच्या क्षेत्रातील त्यांच्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल त्यांना या क्षेत्रात सर्वोच्च कारकीर्द-गौरव मानले जाणारे ‘सर मिशा ब्लॅक पदक’ देऊन त्यांचा जागतिक स्तरावर गौरवही झाला होता. आयुष्यभर अभिकल्पाचा ध्यास घेऊन एनआयडी या संस्थेला देशात नव्हे, तर जगात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या प्रा. व्यास यांच्या निधनाने देशाने प्रतिभाशाली अभिकल्पक गमावला आहे..