१९७२चा तो काळ, रशिया व अमेरिका यांनी अवकाश क्षेत्रात बरीच प्रगती केली होती; त्यात भारत जवळपासही नव्हता. आपल्याकडील वैज्ञानिक संस्थांनाही उपग्रह या संकल्पनेची फारशी माहिती नव्हती, अशा काळात भारताने आर्यभट्ट हा पहिला उपग्रह सोडला. बेंगळूरुतील औद्योगिक वसाहतीत प्रयोगशाळेचा संसार मांडून एका व्यक्तीने बराच खटाटोप करीत हा ‘आर्यभट्ट’ तयार केला. ‘इस्रो’मधून उपग्रहबांधणीची पायाभरणी करणारे हे खगोल-भौतिकशास्त्रज्ञ म्हणजे उडुपी रामचंद्र राव अर्थात प्रोफेसर यू. आर. राव. त्यांच्या निधनाने अवकाश विज्ञान क्षेत्रातील एक अनुभवी वैज्ञानिक आपण गमावला आहे.

त्या वेळी रशियाने आपल्याला या उपग्रहबांधणीत मदत केली होती, पण त्यासाठी ३ कोटी रुपये खर्च येणार होता. राव यांनी तो वाचविण्यासाठीचा हा प्रस्ताव तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापुढे मांडला; त्या म्हणाल्या ‘उत्तम’. त्यानंतर अवकाश आयोगाने हा प्रस्ताव मंजूर करताच तत्कालीन अर्थसचिव मनमोहन सिंग यांनीही त्यास होकार भरला. त्यांनी अर्थसचिव म्हणून मंजूर केलेला तो पहिला प्रकल्प. पण हे सारे सहज झाले नव्हते. ‘साइट’ प्रकल्पात अमेरिकी उपग्रहाच्या मदतीने केरळातील नारळाच्या झाडांवर, पंजाब, हरयाणातील पिकांवर पडलेले रोग उपग्रह प्रतिमांच्या माध्यमातून इंदिरा गांधी यांना दाखवण्यात आले होते; त्यामुळे उपग्रहाची भारताला गरज काय हे त्यांना वेगळे सांगण्याची गरज उरली नव्हती. ‘आर्यभट्ट’ नंतर ‘भास्कर’ व इतर २० उपग्रह तरी राव यांच्या देखरेखीखाली सोडले गेले. चांद्रयान १ व मंगळयान या दोन्ही प्रकल्पांमागची प्रेरणा रावच होते. त्यांचा जन्म कर्नाटकातील उडुपी जिल्ह्य़ातला. त्यांचे शिक्षण तेथील ख्रिश्चन हायस्कूल येथे झाले. नंतर त्यांचे कुटुंबीय बळ्ळारीला गेले. तेथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन, मद्रास विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून पदव्युत्तर पदवी घेतली. १९६०च्या सुमारास ते अमेरिकेत गेले, तिथे एमआयटी संस्थेत ते प्राध्यापक होते. त्यांना भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांनी भारतात बोलावले. अहमदाबादच्या फिजिकल रीसर्च लॅबोरेटरीत ते काही काळ प्राध्यापक होते. इस्रोच्या बेंगळूरु येथील केंद्रात १९७२ पासून ते वैज्ञानिक म्हणून काम करू लागले. ख्यातनाम वैज्ञानिक सतीश धवन यांच्यानंतर १९८४ ते १९९४ अशी दहा वष्रे ते इस्रोचे अध्यक्ष होते. विक्रम साराभाई, एमजीके मेनन, सतीश धवन यांच्यासारख्या दिग्गजांनी त्यांना घडवले. निवृत्तीनंतरही त्यांचे इस्रोशी नाते कायम होते. यंदाच्या वर्षी जानेवारीत त्यांना ‘पद्मविभूषण’ किताबाने सन्मानित करण्यात आले, त्याआधी १९७६ मध्ये ‘पद्मभूषण’ सन्मान देण्यात आला होता. मे २०१३ मध्ये वॉशिंग्टन येथे सॅटेलाइट हॉल ऑफ फेममध्ये त्यांना स्थान मिळाले. तर मे २०१६ मध्ये त्यांचा समावेश मेक्सिकोतील गुडालराजा येथे हॉल ऑफ फेममध्ये करण्यात आला होता. भारतीय अवकाश क्षेत्रात त्यांनी उपग्रह, प्रक्षेपकबांधणीत जे पायाभूत काम केले त्याला तोड नाही; अगदी जीएसएलव्ही, क्रायोजेनिक इंजिनांपर्यंतच्या प्रकल्पातही त्यांचा सहभाग होता. त्यांनी आंतरग्रहीय भौतिकशास्त्र, उच्च ऊर्जा खगोलशास्त्र, अवकाश उपयोजन, प्रक्षेपक तंत्रज्ञान यात किमान ३५० शोधनिबंध लिहिले. एकूण २५ विद्यापीठांच्या डॉक्टरेट त्यांना मिळाल्या होत्या. मृदुभाषी व सहकाऱ्यांचा उत्साह वाढवणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व. वैज्ञानिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारे, वैज्ञानिकांची उमेद वाढवणारे हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आता पुन्हा दिसणार नाही.

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!
economy of engineering sector marathi news
अर्थचक्राचे शिल्पकार – अभियांत्रिकी आणि भांडवली उद्योग क्षेत्र
china vs us
अरुणाचलबाबत अमेरिका भारताच्या बाजूने, चीनचा जळफळाट; म्हणे, “अमेरिका आमच्यात भांडणं लावतेय!”