सिक्किमलगतच्या भागात रस्ते बांधण्यावरून चिनी आणि भारतीय सैन्य परस्परांसमोर उभे ठाकल्याने १९६२ नंतर प्रथमच दोन्ही देशांमधील वाद चिघळला असताना चीनलगतच्या सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी असणाऱ्या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाच्या (आयटीबीपी) प्रमुखपदाची धुरा आर. के. पचनंदा यांच्यावर सोपविण्यात आली आहे. चीनलगतच्या लडाखमधील काराकोरम खिंड ते अरुणाचल प्रदेशातील जाचेप दरीपर्यंतच्या ३४८८ किलोमीटर लांबीच्या सीमारेषेची जबाबदारी आयटीबीपीवर आहे. सीमावादामुळे अलीकडच्या काळात दोन्ही देशांत वारंवार वाद उद्भवत आहेत. चीनच्या दादागिरीमुळे सध्या तशीच किंबहुना त्यापेक्षा जटिल स्थिती निर्माण झाली आहे. या घडामोडींचा विचार केल्यास पचनंदा यांच्यासमोरील आव्हाने लक्षात येतील.

पचनंदा हे भारतीय पोलीस सेवेतील पश्चिम बंगाल केडरचे १९८३ च्या तुकडीतील अधिकारी. चंदिगडच्या स्टे. जोइन्स हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. दिल्लीच्या स्टिफन्स महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी मिळवली. पंजाब विद्यापीठातून विधिचे शिक्षण घेताना सुवर्णपदक पटकावले. पोलीस दलात दाखल झाल्यानंतर त्यांच्या कामगिरीचा आलेख सातत्याने उंचावत राहिला. आयटीबीपीची नवीन जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी ते राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) प्रमुख म्हणून काम पाहत होते. कोलकाताचे पोलीस आयुक्त, पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आदी महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. इतकेच नव्हे तर, सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) विशेष महानिरीक्षक, महानिरीक्षक (प्रशिक्षण), पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागाचे महासंचालक, कारवाई विभागाचे उपमहानिरीक्षक आदी पदांवरील कामकाजाचा त्यांच्याकडे अनुभव आहे. दहशतवादाविरोधातील लढाईत जाागतिक पातळीवर होणाऱ्या मंथनात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. ‘इंटरपोल’तर्फे आयोजित परिसंवादात ‘जागतिक दहशतवाद’, इस्रायलमध्ये आयोजित ‘आत्मघातकी दहशतवाद’ या विषयावरील परिसंवाद, अमेरिकेत आयोजित दहशतवादाचा बीमोड करण्याच्या विषयावरील मंथनातही ते सहभागी झाले आहेत. विविध विभागांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, भारतीय पोलीस पदक आदींनी सन्मानित करण्यात आले. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था, सीबीआयमधील विशेष कामगिरीबद्दलही त्यांचा गौरव झाला. आयपीएस असोसिएशनतर्फे मानाची तलवार, बीएसएफ चषक, सवरेत्कृष्ट जलतरणपटू असा लौकिक त्यांनी मिळविला. कोलकाता पोलीस रायफल नेमबाजी स्पर्धेचे विजेतेपद त्यांच्या नावावर आहे. पंजाब विद्यापीठात टेनिस खेळाडू अशी त्याची ओळख झाली. कोलकाता येथील प्रजासत्ताक दिन संचलनाचे व्यवस्थापन करण्याची संधी त्यांना मिळाली. महत्त्वाची बाब म्हणजे हे काम लष्करातील ब्रिगेडिअरमार्फत केले जाते. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये प्राथमिक शिक्षणक्रम, नेमबाजी, शस्त्रविरहित कारवाई या विषयात ते अव्वल राहिले. ‘टेररिझम अ‍ॅण्ड रिस्पॉन्स टू टेररिस्ट थ्रेट’ या पुस्तकाचे लेखन  त्यांनी केले. प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर पचनंदा हे आयटीबीपीचे नेतृत्व करताना  परिस्थिती कौशल्यपूर्वक हाताळतील हे निश्चित.