एकाच साहित्य पुरस्काराने आपण फार थोर साहित्यिक आहोत, असे मानणाऱ्या साहित्यिकांच्या रांगेत सहा पुरस्कार मिळूनही रामनाथ चव्हाण कधी बसले नाहीत, याचे कारण त्यांनी समाजातील दु:खांशी असलेली नाळ कधीच तोडली नाही. जे समाज मुख्य प्रवाहाला फार दुरून माहीत होते, त्या समाजाची सुखदु:खे समजून घेण्यासाठी त्यांनी आयुष्यभर पायपीट केली. त्यांच्या पाडय़ांवर राहून त्यांच्याशी संवाद साधत चव्हाण यांनी त्यांच्या वेदनांना वाट मोकळी करून द्यायचे ठरवले, तेही अगदी तारुण्यातच.

लिहिता येते आहे, याची जाणीव होत असताना हलक्याफुलक्या कविता किंवा कथा लिहिण्याऐवजी रामनाथ चव्हाण यांनी कंजारभाट, वैदू, कोल्हाटी, वडारी, वंजारी, पारधी अशा समाजांत राहूनही वेशीवरच थांबलेल्या भटक्या विमुक्तांशी संवाद साधायचे ठरवले. तेव्हा नारायण सुर्वे यांच्या ‘माझे विद्यापीठ’ या कवितासंग्रहाने एकूणच मराठी भावविश्वात घालमेल सुरू झाली होती. आपल्या वाटय़ाला आलेल्या दु:खांची गोष्ट सांगण्याऐवजी अशा समदु:खींच्या यातना समजावून घेणे, त्यांना अधिक महत्त्वाचे वाटले. ही वेगळी वाट त्यांनाच शोधावी लागली, कारण तेव्हा या विषयावर काहीच साहित्य उपलब्ध नव्हते. चव्हाण यांनी मग त्यासाठीचीच खटपट सुरू केली. श्री. म. माटे यांचे ‘उपेक्षितांचे अंतरंग’ वाचून गहिवरणाऱ्या मराठी वाचकांना भाषेच्या डौलापलीकडे जाऊन निखळ सत्य समजावून सांगण्यासाठी त्यांनी भटक्या विमुक्तांचे अंतरंग लिहायला सुरुवात केली तेव्हा ते अगदी तारुण्यात होते. अंतरीच्या ऊर्मीने केलेले हे काम नंतरच्या काळात एक मौलिक साधन बनेल, याचे भान त्यांना तेव्हाही होते. कारण संशोधनाच्या शिस्तीने त्यांनी सारी माहिती गोळा करण्यासाठी जिवाचे रान केले. त्यातून मिळाले ते केवळ समाधान. ज्या समाजाने भटक्यांना कधीच मुख्य प्रवाहात येऊ दिले नाही, त्या समाजासमोर त्यांच्या वेदना मांडण्याचे काम चव्हाण यांनी केले. दया पवार यांच्या ‘कोंडवाडा’ या कवितासंग्रहाने आणि ‘बलुतं’ या आत्मकथनाने साहित्यविश्वात जी खळबळ उडवून दिली होती आणि नामदेव ढसाळांचा ‘गोलपिठा’ शहरांतील घरांच्या दिवाणखान्यातही पोहोचला होता, अशा वेळी आपल्याच आजूबाजला राहणाऱ्या समाजात मिसळण्याची गरज चव्हाण यांना न वाटती तरच विशेष. त्या काळात त्यांनी जे कष्ट घेतले आणि भटक्या विमुक्तांचे जीवन समजावून घेण्यासाठी पायपीट केली, त्यामुळेच ‘भटक्या विमुक्तांची जातपंचायत’ हा पाच खंडांतील प्रकल्प उजेडात येऊ शकला. अर्थार्जनासाठी नोकरी आणि जगण्यासाठी संशोधन असे चव्हाण यांचे सूत्र होते. मिळेल तो सगळा वेळ संशोधनात आणि लेखनात घालवायचा, असा त्यांचा हट्ट. पण हे संशोधन ग्रंथालयात बसून होणारे नव्हते. त्यासाठी प्रचंड फिरायला हवे होते. संवाद साधून सगळेच नव्याने शोधायचे होते. ललित साहित्याने या वेशीबाहेरच्या माणसांकडे लक्ष वेधले असले, तरीही त्यांच्या अनेक जाती-जमातींमधील परंपरा, श्रद्धा, राहणीमान, अडचणी, सामाजिक परिस्थिती कळण्यासाठी प्रत्यक्ष हिंडण्याशिवाय पर्यायच नव्हता. चव्हाण यांच्या या पाचखंडी संशोधनाने महाराष्ट्रातील या समाजांची अधिकृत नोंद तरी झाली आणि संशोधकांसाठी एक नवी वाटही निर्माण झाली. शांतपणे आपले काम करत राहावे, त्यासाठी पदरमोड करावी, गवगवा न झाला, तरच बरे, अशी चव्हाण यांची वृत्ती. कुणाला आपणहून स्वत:बद्दल सांगण्याएवढा संकोच त्यांनी शेवटपर्यंत जपूनच ठेवला होता. त्यामुळेच दु:खाचे डोंगर पाहिलेल्या रामनाथ चव्हाण यांना समाजमान्यता मिळूनही ते जमिनीवर राहू शकले. त्यांच्या निधनाने भटक्या विमुक्तांना ग्रंथालयांच्या कपाटातच नव्हे, तर समाजाच्या सर्वच स्तरांत पोहोचवणारा एक कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे.

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
zee natya gaurav puraskar 2024
मोहन जोशींना यंदाचा ‘झी जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान! म्हणाले, “आताच्या नव्या पिढीने…”