महायुद्धोत्तर अमेरिका आधी गोंधळली, मग बिथरली, त्यानंतर बहकली आणि आत्मशोधासाठी बंडखोरीच्या मार्गाने जात विलक्षण कोलाहल चक्रव्यूहात अडकली. या चक्रव्यूहाला भेदणाऱ्या व्यक्तींनी अमेरिकेच्या प्रगतीची आखणी करून ठेवली. मग अगदी हॉलीवूडही फ्रेंच न्यू वेव्हच्या प्रभावातून घासूनपुसून लख्ख झाले. पारंपरिक वाटा अव्हेरून शेकडो तंत्रज्ञ-कलाकार-फॅशनकर्ते यांनी या काळाला पुरून उरणारी अपारंपरिक ऊर्जा पेरली. हण्टर थॉमसन, गे तलिस, टॉम वुल्फ आदींनी पत्रकारितेला कथनमूल्य प्राप्त करून दिले. नेमक्या याच काळात आध्यात्मिक उन्नतीचे महत्त्व विशद करून देणाऱ्या रॉबर्ट एम. पर्सिग यांच्या ‘झेन अ‍ॅण्ड आर्ट ऑफ मोटरसायकल मेण्टेनन्स’ या पुस्तकाचाही जन्म झाला. शंभराहून अधिक प्रकाशकांनी ‘छापण्यास अयोग्य’ असल्याचे शिक्कामोर्तब केल्यानंतर एका प्रकाशकाने धाडसाने हे पुस्तक छापले. पहिल्या काही वर्षांत त्याच्या दशलक्षावधी प्रती संपल्या आणि आजतागायत या पुस्तकाचे नाव विश्वातल्या १०० आवर्जून वाचल्या जाणाऱ्या सर्व पुस्तक यादीत मानाने असते. त्या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट पर्सिग, अलीकडेच कालवश झाले.

मंदीयुगाने झाकोळलेल्या वर्षांत रॉबर्ट पर्सिग यांचा जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षी १७० इतका बालविलक्षण बुद्धय़ांक असल्याने वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांनी पदवी मिळविली. जैवरसायनशास्त्राच्या शिक्षणात त्यांनी रस दाखविला. मात्र तेथील अभ्युपगमांचा काच त्यांना वाटू लागला! ठोस मतांऐवजी नियमांच्या जोरावर मांडल्या जाणाऱ्या आडाख्यांनी त्यांना कोणत्याही बाबतीत धड उत्तरे दिली नाहीत. वयाच्या अठराव्या वर्षी ते लष्करात दाखल झाले आणि महायुद्ध ज्वरात दोन वर्षे दक्षिण कोरियामध्ये काढली. युद्धानंतर पुन्हा पदव्युत्तर शिक्षण घेतले. अध्यात्माचा अभ्यास केला आणि पौर्वात्य ज्ञानाचा अर्क स्वत:त ओतण्यासाठी बनारस हिंदू विश्वविद्यालय गाठले. तेथे माया, मिथ्या या संकल्पनांचा अभ्यास केला. प्रसंगी आपल्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्यास पौर्वात्य ज्ञान अपुरे पडत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी हा अभ्यासही अर्धवट सोडला. छिन्नमनस्कतेच्या आजाराने त्यांना ग्रासले आणि दोन वर्षे रुग्णालयामध्ये शॉक ट्रीटमेण्टने जखडून ठेवले. त्यातूनही ते सावरले. १९६० ते ७० या काळातील मूल्य-नैतिकता, सामाजिक विघटनाच्या काळात त्यांनी आपल्या अनुभूतींच्या आधारे रचलेल्या एका प्रवासाला कादंबरीसदृश लेखनाद्वारे मांडले. वैश्विक असमाधानाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या या पुस्तकात वडील आणि मुलाने खेडेगावात मोटरसायकलवरून केलेल्या प्रवासाचे वर्णन आहे. हा प्रवास प्रत्येकाला काही शिकविणारा आहे, मानसिक उत्थान देणारा आहे आणि प्रश्नांच्या उत्तरांजवळ वाचकाला नेणारा आहे. विचित्र मोठे नाव असले, तरी त्याचे स्वरूप हिप्पीउत्तर काळातील तरुणांना चकव्यातून बाहेर पडण्यास मदत करणारे आहे. प्रवासवर्णन, आत्मचरित्र आणि कादंबरी यांच्या सीमारेषांवरून फिरत राहणारे हे पुस्तक वाचणाऱ्याला क्षणभरात कह्य़ात घेते. ‘सेल्फ हेल्प’ पुस्तकांच्या जगामध्ये या पुस्तकाची लोकप्रियता अद्याप टिकून आहे. तंत्रशरणता वाढत असणाऱ्या मानवी युगामध्ये अध्यात्म आणि तंत्रज्ञान यांची सांगड घातल्याशिवाय गत्यंतर नाही, याचा प्रत्यय त्यांना आला होता.  स्वआकलन, समाजआकलन यांच्याद्वारे मूल्य-तत्त्व यांचा शोध घेत गोंधळलेल्या, बहकलेल्या, बिथरलेल्या देशोदेशीच्या पिढीला वाट दाखविण्याचे काम त्यांच्या पुस्तकाने केले आहे. मृत्यूने त्यांचे शरीर संपले असले तरी पुस्तकरूपामुळे पर्सिग अमरच आहेत.