प्रत्येक मोठय़ा व्यक्तीच्या जीवनात कुणाची तरी प्रेरणा असते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे यशस्वी राजकारणी बनू शकले यामागेही एका प्राध्यापकांची प्रेरणा होती. त्यांचे नाव रॉजर बॉश.  ओबामा लॉस एंजेलिस येथे शिकत असताना प्रा. रॉजर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. एकाच व्यक्तीच्या प्रेरणेने ओबामा राजकारणातील सर्वोच्च स्थानी पोहोचले असे म्हणता येणार नाही, पण शेवटी प्रत्येक व्यक्ती अनेक गुरूंच्या मुशीतून घडत असते त्यात प्रा. रॉजर हे होते.अलीकडेच विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात त्यांना सर्वानी उभे राहून मानवंदना दिली होती. आजकाल असे विद्यार्थी घडवणारे, त्यांच्यातील गुण हेरून त्यांना दीपस्तंभासारखी वाट दाखवणारे गुरू किंवा शिक्षक कमी दिसतात. सेवेच्या चाळीस वर्षांनंतर निवृत्त होणार, असे प्रा. रॉजर यांनी अलीकडेच म्हटले होते. पण दुर्दैवाने त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.

२०१० मध्ये तत्कालीन अध्यक्ष ओबामा यांना वार्ताहरांनी विचारले होते, की तुमचा कॉलेजमधील सर्वात आवडता वर्ग कोणता, त्यावर त्यांनी प्रा. रॉजर बॉश यांनी ऑक्सिडेंटल विद्यापीठात ज्या पद्धतीने राज्यशास्त्र शिकवले त्याचे तोंड भरून कौतुक केले होते. प्रा. रॉजर यांनी ज्या पद्धतीने राज्यशास्त्रातील मूलभूत सिद्धांत व विचारसरणी यांची ओळख करून दिली तशी कुणी करून दिली नसती. त्यामुळे माझा राज्यशास्त्रातील रस वाढत गेला असे ओबामा त्या वेळी म्हणाले होते. प्रा. रॉजर यांचा जन्म १९४८ मध्ये तुलसा येथे झाला. स्टॅनफर्ड विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्रात विद्यावाचस्पती पदवी घेतली. तेथेच त्यांना आयुष्याची जोडीदार पत्नी मॅण्डी मिळाली. याच विद्यापीठात स्वतंत्र विचाराच्या प्रा. रॉजर यांनी व्हिएतनाम युद्धविरोधातील निदर्शनांचे नेतृत्व केले होते. १९७७ मध्ये ते ऑक्सिडेंटलमध्ये प्राध्यापक झाले. त्या वेळी त्या नोकरीसाठी २५० जणांचे अर्ज होते, पण त्यातून त्यांची निवड झाली ती सार्थच होती. दक्षिण आफ्रिकेत वर्णविद्वेषी सत्ता होती तेव्हा त्यांनी कॉलेजला त्या देशाशी संबंध तोडण्यास भाग पाडले होते. ऑक्सिडेंटल कॉलेजचे सर्वोत्तम शिक्षक म्हणून त्यांची निवड झाली व सहकारी शिक्षकांनीही त्यांना त्यांच्या संघटनेचे प्रमुख नेमले होते. त्यांना सरतेशेवटी संधिवाताला तोंड द्यावे लागले, त्यात अनेक शस्त्रक्रिया झाल्या. डॉक्टरांनी तर ते जगणार नाहीत असे सांगितले होते तरी त्यांची चिकाटी कायम होती. धडधाकट असलेले ९९ टक्के लोक जे करू शकत नाहीत ते प्रा. रॉजर व्हीलचेअरवर बसून करीत असत. त्यांनी पत्नीसह १२० देशांना भेटी दिल्या. ओबामा यांना जसे डॉ. रॉजर यांच्या अनुषंगाने विचारण्यात आले होते तसेच प्रा. रॉजर यांनाही त्यांचे विद्यार्थी बराक ओबामा यांच्याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले, की बराक त्या वेळी विद्यार्थी होता व राजकीय सिद्धांत या विषयात त्याला मी बी ग्रेड दिली होती. त्यावर तो माझ्याकडे आला अन् म्हणाला की, सर, मला कमी ग्रेड का दिलीत त्यावर मी त्याला समजावले होते, तू बुद्धिमान आहेस असे मलाही वाटते पण तुझे परिश्रम कुठे तरी कमी पडले म्हणून तुला बी ग्रेड मिळाली. २००४ मध्ये इलिनॉइसमधून ओबामा यांनी सिनेटसाठी उमेदवारी जाहीर केली होती, तेव्हा प्रा. रॉजर यांनी ओबामांशी ई-मेलद्वारे संपर्क करून पाठिंबा दिला होता. नंतर ओबामा यांनी अध्यक्ष झाल्यानंतर प्रा. रॉजर यांना ओव्हल कार्यालयात बोलावून त्यांचा सत्कार केला  होता. अमेरिकन व युरोपीय राजकीय विचारांचा त्यांचा मोठा अभ्यास होता. त्यांनी ओबामा यांच्याशिवायही इतर अनेक चांगले विद्यार्थी घडवले. अगदी शेवटपर्यंत ते विद्यार्थ्यांच्या गराडय़ात असत.