पाण्यात सोडलेल्या गळाला मासा लागल्यावर लगबगीने तो गळ खेचून घेणाऱ्या मच्छीमाराच्या हालचालींची लय, दोन्ही पाय वर करून नाचणारा बोकड, गाईची शिंगे पकडून एका कोलांटउडीत तिच्या पाठीवर बसू पाहणारा गुराख्याचा अवखळ पोर.. हे वाचकांपैकी अनेकांनी कधी पाहिले असेलही, पण एस. नंदगोपाल यांच्यासाठी ही दृश्ये शिल्पविषय ठरत आणि मग त्यांच्या त्या शिल्पांमधून, ही साधीसुधीच दृश्ये म्हणजे ‘भारतीय संस्कृती’ची खूण कशी आहे, याचे प्रत्यंतर घडे! नंदगोपाल गेल्या शुक्रवारी, वयाच्या ७१व्या वर्षीच निवर्तले. अनेक शिल्पे आणि त्याहूनही मोठे असे सांस्कृतिक आकलन त्यांनी आपल्यासाठी मागे सोडले आहे.

भारतीय अमूर्ततेची पाळेमुळे वेदकाळात आहेत, तशीच ती तंत्रमार्गातही आहेत, अशी मांडणी पहिल्यांदा करणारे आणि हा विचार स्वत:च्या आधुनिक चित्रकलेतही रुजवणारे केसीएस पणिक्कर हे नंदगोपाल यांचे वडील! नंदगोपाल यांचा जन्म तत्कालीन ‘बँगलोर’मध्ये १९४६ साली झाला. वडील तत्कालीन ‘मद्रास’ शहरात असल्याने तेही दक्षिण किनाऱ्यावरील या शहरात आले आणि शालेय शिक्षणानंतर प्रथम ‘सेंट लोयोला कॉलेज’मधून भौतिकशास्त्राची पदवी घेऊन नंतर गव्हर्न्मेट कॉलेज ऑफ आर्ट्समधून कला पदविका त्यांनी मिळवली. अर्थात, अनौपचारिक कलाशिक्षण घरीच सुरू होते. वडील केसीएस पणिक्कर यांनी १९५०च्या दशकापासूनच ‘चोलामंडल’ हे चित्र-शिल्पकारांचे गाव वसवण्यात पुढाकार घेतला होता आणि या नव्या वसाहतीमध्ये ‘आधुनिक कलेइतकेच लोककलांना आणि उत्तम कारागिरीलाही महत्त्व दिले जावे,’ असा नेहरू-मुल्कराज आनंद यांनी रुजवलेला विचार प्रत्यक्ष साकारत होता. साहजिकच, कलाशिक्षण पूर्ण करून दृश्यकलावंत म्हणून नंदगोपाल यांनी कलाक्षेत्रात पदार्पण केले त्याच वर्षी- १९७१ साली- त्यांना ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

नंदगोपाल यांची शिल्पे सुरुवातीपासूनच वैशिष्टय़पूर्ण ठरली. ही शिल्पे चहूबाजूंनी (किंवा आठही बाजूंनी) सारख्याच आकाराची नसून, काहीशी चपटी असत. तांब्याचा वा अन्य धातूचा पत्रा विशिष्ट आकारात कापून, वाकवून, तो एकमेकांस जोडून त्यांची शिल्पे घडत. डोळे, वस्त्रप्रावरणे, दागिने, केस, आलंकरण किंवा नक्षी.. असे कोणतेही तपशील केवळ धातूच्या तारा या पत्र्यावर जोडून या शिल्पांमध्ये मूर्त होत असत. सुरुवातीचा बराच काळ नंदगोपाल यांनी एकाच धातूमध्ये, म्हणजे एकरंगी शिल्पे घडवली. शिल्पकृतीमध्ये अवकाशच इतका महत्त्वाचा असतो की, रंगांची गरजच काय, हे त्यांचे म्हणणे किती खरे आहे याची प्रचीती त्यांची शिल्पे देत असत. अगदी अखेरच्या काही वर्षांत त्यांच्या शिल्पांमध्ये रंग आले! त्याहीआधी त्यांच्या एकरंगी शिल्पांमध्ये डोळे, दागिने अशा तपशिलांसाठी अर्धरत्न-खडय़ांचा वापर सुरू झाला होताच; पण अखेर रंगांनाही त्यांच्या अवकाशाने पूर्णत: आपलेसे केले. शिल्पित आकारांमध्ये लय हवी, हे चोल राजवटीच्या काळातील कांस्यशिल्पापासून दक्षिण भारतात रुजलेले पौर्वात्य तत्त्व नंदगोपाल यांच्या शिल्पांमध्ये आधुनिकतेचा बाज घेऊन उमटत असे. आधुनिकता या शिल्पांच्या घडणीतही होती. अखेर वेल्डिंगसदृश तंत्रानेच ही शिल्पे घडत. म्हणजे जे तंत्र ‘औद्योगिक लोखंडी कचऱ्यातून कलात्मक आकार’ वगैरे घडवण्यासाठी आधुनिक पाश्चात्त्य शिल्पकारांनी वापरले, त्याच तंत्रातून नंदगोपाल यांनी मात्र भारतीयता जपली.

आधुनिक कलेत भारतीयता जपणे, हा ध्यास १९७०, १९८० च्या दशकापर्यंत बऱ्याच भारतीय चित्र-शिल्पकारांनी कमीअधिक प्रमाणात आणि आपापल्या परीने घेतला होता; पण त्यात पुढे गेलेले, नंदगोपाल यांच्यासारखे फार थोडे. एस. जी. वासुदेव, दिवंगत चित्रकार एम. रेड्डाप्पा नायडू यांच्याशी थोडीफार मिळतीजुळती असूनही नंदगोपाल यांची आकृती-पद्धत निराळीच होती. ते निराळेपण आता निमाले.