अभिजात संगीतात ध्रुपद हा प्राचीन कलाप्रकार जिवंत ठेवणाऱ्या महत्त्वाच्या घराण्यांमध्ये डागर कुटुंबीयांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या घराण्याच्या एकोणीस पिढय़ा आजही ही शैली जिवंत ठेवण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्नशील राहिल्या. उस्ताद सईदुद्दीन डागर हे या १९व्या पिढीचे प्रतिनिधी. भारतीय उपखंडात संगीताचे स्वरूप काळानुसार सतत बदलत राहिले. त्यामुळे संगीत सादर करण्याच्या नवनव्या शैली जन्माला आल्या. काहीशे वर्षांपूर्वी जेव्हा ख्याल ही नवी शैली लोकप्रिय होऊ लागली, तेव्हा त्या आधी किती तरी शतके संगीताच्या दरबारात अतिशय मानाचे स्थान मिळवलेल्या ध्रुपद शैलीलाच समाजमान्यता होती. ध्रुपद शैलीतही नवोन्मेषी कलावंतांनी आपापल्या सर्जनाने मोलाची भर घातली, त्यामुळेच ध्रुपद हा संगीत प्रकारही वेगवेगळ्या पद्धतीने सादर होऊ लागला. त्या काळात ध्रुपद सादर करण्याच्या ज्या पद्धती होत्या, त्याला बानी असे म्हणत. बानी म्हणजे वाणी. ध्रुपदात अशा चार बानी प्रस्थापित झाल्या. गौहर, खंडर, नौहर आणि डागर. ही ध्रुपदातील घराणीच. जयपूरच्या बाबा बेहराम खान डागर यांच्यापासून सुरू झालेल्या घराण्यात सईदुद्दीन यांचा जन्म झाला. बाबा बेहराम यांनी ध्रुपद गायकीत घातलेली भर त्यांच्या पुढील पिढय़ांनी नुसती टिकवून ठेवली नाही, तर त्यामध्ये भरही घातली. परदेशातही ध्रुपद शैली लोकप्रिय करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. त्यामुळेच आजही नव्या पिढीत या शैलीबद्दलचे आकर्षण टिकून आहे. भारतीय संगीताचा आरंभच मुळी देवळात झाला, असे मानतात. ध्रुपदातील कवनेही देव-देवतांच्या स्तुतीबद्दलच असतात. धर्माने मुस्लीम असलेल्या डागरांनी ही कवनेही अतिशय रोचक पद्धतीने सादर केली. मागील हजार वर्षांत संगीताने धर्म हा विषय आपल्या स्वरांच्या दुनियेत कसा विरघळवून टाकला होता, याचे डागर हे एक अतिशय उत्तम उदाहरण.

सईदुद्दीन यांनी आपल्या अतिशय ममताळू स्वभावाने संगीताच्या दुनियेला जवळ केले आणि तेच आपले सर्वस्व मानले. महाराष्ट्रात या शैलीला मानाचे पान मिळवून देणाऱ्या महत्त्वाच्या कलावंतांमध्ये त्यांचे स्थान महत्त्वाचे ठरले. स्वत: मैफली करण्यापेक्षा पुढील पिढीला आपले ज्ञान देण्यात त्यांनी धन्यता मानली. त्यामुळे सईदुद्दीन डागर यांचे गवई म्हणून आणि डागर घराण्याचे प्रचारक म्हणून झालेले कार्य अधिक महत्त्वाचे म्हणायला हवे. आलापीमधून व्यक्त होणारे रागदर्शन हे डागरांच्या गायनाचे वैशिष्टय़! संथ म्हणता येईल, अशा लयीत स्वरांशी लडिवाळपणे खेळत, त्यांच्या प्रत्येक सौंदर्याची सहजपणे उलगड करीत एका अपूर्व अनुभवाच्या साम्राज्यात नेण्याची क्षमता या शैलीमध्ये आहे. पखवाजसारखे तालवाद्य या साम्राज्यात विराजमान होताच, गायनाला गहिरा रंग प्राप्त होतो. हे गायन काळानुसार टिकवून ठेवणे तर अवघडच. ध्रुपदानंतर आलेल्या ख्याल गायकीने अभिजाततेला लालित्याची झालर मिळवून दिली. लयीच्या विविधांगी आवर्तनात रागांचे अनेक रंग लीलया खेळत आपला नवा स्वरसंसार उभारणाऱ्या ख्यालाने आजही रसिकांचे चित्त आकर्षून घेतले आहे. अशा अवघड परिस्थितीतही ध्रुपदाची साथ न सोडता, त्यामध्ये नावीन्याची भर घालत, ते रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सईदुद्दीन डागर यांनी केले. पुढील पिढय़ांना या शैलीचे वेगळेपण समजावून सांगत, त्यांच्याकडून ही शैली जिवंत राहील, याची खात्री वाटेपर्यंत न थकता सईदुद्दीन काम करत राहिले. आर्थिक स्थैर्य मिळेल, या आशेवर जगत राहिले. ते त्यांच्या वाटय़ाला फारसे आलेच नाही. पण कलावंताचा मूळ धर्म न सोडता, सईदुद्दीन अखेपर्यंत स्वरांच्या दुनियेत रममाण राहिले. त्यांच्या निधनाने ध्रुपद कलावंतांची जबाबदारी आता अधिकच वाढली आहे.