देशातील पहिल्या क्रमांकाची सहकारी बँक म्हणून आज सारस्वत बँक ओळखली जाते. या बॅँकेच्या व्यवस्थापकीय संचालक या अत्यंत महत्त्वाच्या पदावर प्रथमच एक महिला विराजमान होत आहे. स्मिता संधाने हे ते नाव. भक्कम आर्थिक स्थिती असलेल्या निवडक सहकारी बँकांमध्ये समाविष्ट सारस्वत बँक येत्या वर्षांत स्थापनेचे १००वे वर्ष साजरे करत असताना संधाने यांची झालेली नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

संधाने या सारस्वत बँकेबरोबर गेल्या तब्बल ३५ वर्षांपासून आहेत. १९८२ मध्ये बँकेत रुजू झाल्यानंतर गेल्या वर्षी त्या बँकेच्या सहव्यवस्थापकीय संचालिका बनल्या. सारस्वत बँकेत त्या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणूनही राहिल्या आहेत. जागतिक वित्तीय क्षेत्रातील उल्लेखनीय अशा आघाडीच्या १०० मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश राहिला आहे. कंपनी सामाजिक दायित्व, जोखीम, लेखा परीक्षण आदी विषयांतील विविध समित्यांवरही त्या कार्यरत आहे. रोकडरहित व्यवहारांसाठी बँकांना तंत्रज्ञान मंच उपलब्ध करून देणाऱ्या ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एनपीसीआय) च्या संचालक मंडळावरही त्या प्रतिनिधित्व करतात.

सारस्वत बँकेत त्यांनी बँकेच्या विविध विभाग, शाखा तसेच परिमंडळांमध्ये विविध जबाबदाऱ्या निभावल्या आहेत. बँकेत घाऊक विभाग, नियोजन व लेखा तसेच जोखीम मालमत्ता विभागाचे प्रमुखपद त्यांनी हाताळले आहे. सार्वजनिक बँकांप्रमाणे सारस्वत बँकेला कधी वाढत्या अनुत्पादित कर्जाचा सामना करावा लागला नाही. मात्र सध्याची उद्योग, अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता संधाने यांचा विशेषत: या क्षेत्रातील अनुभव बँकेला नजीकच्या भविष्यात उपयोगात येण्याची शक्यता आहे. संधाने यांच्याच मार्गदर्शनाखाली बुडीत तीन बँकांचे सारस्वत बँकेतील विलीनीकरण यशस्वी ठरले आहे. यातील विशेष नाव घ्यावे लागेल ते मुंबईस्थित मराठा मंदिर सहकारी बँकेचे. सारस्वतच्या सहकार्याने तोटय़ातील बँका नफ्यात आणतानाच त्यांचा भार मुख्य बँकेवर येऊ न देण्याच्या कसोटीत त्या यशस्वी ठरल्या आहेत. ताब्यात घेतलेल्या कमकुवत बँकांमधील अधिकाधिक खात्यांची कर्जवसुली त्यांच्यामुळे शक्य झाली. बँकांना सध्या सर्वाधिक भेडसावणाऱ्या  वाढत्या अनुत्पादित मालमत्ता म्हणजेच बुडीत कर्जाला वाहिलेल्या ‘नॉन – परफॉर्मिग असेट्स’ (एनपीए) या पुस्तकाच्या त्या सहलेखिका आहेत.

मार्च २०१६ अखेर जवळपास ५२ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय गाठणाऱ्या व महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये अस्तित्व असलेल्या सारस्वत बँकेचे २०२१ पर्यंत एक लाख कोटी रुपयांचे व्यवसाय लक्ष्य आहे. बँकांमध्ये तरुणांना मोठय़ा संख्येने येण्यासाठी विशेष प्रशिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवणारे स्व. एकनाथ ठाकूर यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सारस्वत बँकेने खासगी बँक म्हणून प्रवास करण्याचे निश्चित केले होते. त्यांचे पुत्र गौतम ठाकूर हे त्यांचा वसा पुढे घेऊन जाण्यास सज्ज आहेत. संधाने यांच्या नियुक्तीने हे लक्ष्य दृष्टिक्षेपात येऊ शकते.

नाममुद्रेतील बदल, प्रभादेवीसारख्या मुंबईच्या हृदयातील सुसज्ज मुख्यालय याद्वारे सारस्वत बँकेचा तोंडवळा खासगी बँकेकडे यापूर्वीच वळला आहे. कोकणातील, मुंबईतील स्थानिकांना सारस्वत बँकेच्या रूपाने रोजगार उपलब्ध करून देणे, मुंबई हल्ल्यातील शहीद पोलिसांच्या पाल्यांना बँक सेवेत सहभागी करून घेणे आदी सामाजिक उपक्रम ही बँक राबविते. ठाकूर यांच्या इच्छेप्रमाणे यापुढील सारस्वत बँकेची भांडवली बाजाराकडील वाटचाल संधाने यांच्या कारकीर्दीत यशस्वी ठरू शकते.